कोरठण खंडोबा मंदिराच्या कळसावर वीज कोसळली, सीसीटीव्ही, संगणकासह विद्युत उपकरणे जळाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या मंदिराच्या मुख्य कळसावर सोमवारी (दि. 21) रात्री झालेल्या जोरदार पावसादरम्यान वीज कोसळली. या घटनेत मंदिराचा मुख्य पितळी कळस काळा पडला आहे.

वीज थेट मंदिराच्या मुख्य कळसावर कोसळल्याने मंदिरातील विद्युत यंत्रणेलाही मोठा फटका बसला. मंदिरातील वीजवाहक तारा जळाल्या असून, सीसीटीव्ही कॅमेरे, कॅमेऱ्यांचे संगणक, फ्रिज तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक व विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती माध्यमांना देताना कोरठण खंडोबा देवस्थानच्या अध्यक्षा शालिनी घुले, सचिव चंद्रभान ठुबे यांनी मंदिराच्या कळसाला तडा गेल्याचे तसेच सीसीटीव्ही, संगणक व इतर विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले. दरम्यान, झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी स्थानिक महसूल अधिकाऱयांशी संपर्क साधण्यात आला असल्याचे कोरठण खंडोबा देवस्थानचे सचिव चंद्रभान ठुबे यांनी सांगितले.

कोरठण खंडोबा देवस्थान हे राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, येथे वर्षभर मोठय़ा संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिराच्या मुख्य कळसावरच वीज कोसळल्याने भाविकांमध्येही या घटनेची चर्चा झाली.