
सोलापूर जिह्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. माळशिरस तालुक्यातील वेळापूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला, तर अक्कलकोटमध्ये वीज पडून नामदेव उमाजी राठोड या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
सोलापुरात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी व मंगळवारी पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. सोलापूर शहरासह अक्कलकोट, माळशिरस, अकलूज, वेळापूर, करमाळा, मोहोळ, पंढरपूर या तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सोमवारी सायंकाळी वेळापूर शहरासह परिसरात अचानकपणे ढगफुटीसदृश पावसाला सुरुवात झाली. यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. अवघ्या काही वेळात सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर काही ठिकाणी पावसाचे पाणी वेगाने वाहात असल्याने भीती पसरली होती. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांचे नुकसान होत असतानाच ढगफुटीसदृश पावसाने पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
वीज पडून एकजण ठार
अक्कलकोट तालुक्यातही विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. जेऊरवाडी येथील शेतकरी उमाजी राठोड (वय 45) व इस्माईल शौकतअली मुल्ला (रा. कडबगाव) हे दोघे पावसात गौडगाव येथील शेताजवळील झाडाखाली थांबले होते. यावेळी वीज कोसळून नामदेव राठोड यांचा जागीच मृत्यू झाला, तर इस्माईल मुल्ला गंभीर जखमी आहेत.






























































