
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लवकरच जाहीर होणार असली, तरी सहकारात पक्षीय राजकारण नको. यापूर्वी जिह्यात कधीही सहकारात पक्षाच्या चिन्हावर निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे पक्षीय भावनेने बँकेकडे पाहू नये, असा टोला राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना लगावला.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सहकारतपस्वी गुलाबराव पाटील जयंतीनिमित्त पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आमदार पाटील म्हणाले, जिह्यात सहकाराचे मोठे जाळे आहे. स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, गुलाबराव पाटील यांनी सहकार वाढविले. मात्र, त्यामध्ये पक्षीय राजकारण कधीही केले नाही. त्यामुळे सहकारात पक्षीय राजकारण कुणीही करू नये.
जिह्यात दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. तासगाव आणि खानापूर तालुक्यातील काहीसा पाऊस झाला. उर्वरित भागात पाऊस झालेला नाही. पिकांची परिस्थिती भयावह बनत चालली आहे. कोयना आणि वारणा धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. सद्यःस्थितीत पिकांना पाण्याची गरज असताना उपसाबंदी लादली आहे. पिकांची परिस्थिती लक्षात घेऊन उपसाबंदी मागे घेण्यात यावी. भात, सोयाबीन करपू लागले आहेत. कोयनेतील 67 टीएमसी पाणीसाठा वीजनिर्मितीला वापरला जातो. सध्याची परिस्थिती लक्षात घेता वीजनिर्मिती कमी करून करपणाऱया पिकांना जीवनदान द्यावे, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. राज्यात उन्हाच्या चटक्यांनी पिके कोमेजली आहेत, त्यामुळे तत्काळ पंचनामेही करण्याची गरज आहे. याबाबतची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली.
मळीमिश्रित पाणी सोडणाऱया कारखान्यांवर कारवाई करा
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग बदलला असून, मळीमिश्रित पाणी आले आहे. त्याचे काही जणांकडून राजकारण केले जाते. मात्र, नेमक्या कोणत्या कारखान्यांकडून पाणी सोडले जाते, याची पडताळणी करून संबंधित कारखान्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली.






























































