रॅगिंगप्रकरणी सहा विद्यार्थी निलंबित; वसतिगृहातून हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jamkhed-halgaon-agriculture-college-six-students-suspended-expelled-from-hostel-for-ragging-juniors-probe-report

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून रॅगिंग व मारहाण केल्याच्या प्रकरणात महाविद्यालय प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार सहा विद्यार्थी दोषी आढळले असून, त्यांना एका सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांची वसतिगृहातून कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या तीन विद्यार्थ्यांसोबत 7 सप्टेंबर रोजी रात्री रॅगिंगचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला होता. रात्री काही वरिष्ठ विद्यार्थ्यांनी फिर्यादी वेदान्त तळुले व त्यांच्या दोन मित्रांना आपल्या खोलीत बोलावून घेतले. विद्यार्थ्यांना रांगेत उभे करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. याबाबत फिर्यादी विद्यार्थ्याने रेक्टरला घटनेची माहिती दिली. रेक्टरने वरिष्ठ विद्यार्थ्यांना समज देऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर रेक्टरकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून दुसऱया दिवशी (दि. 8) मध्यरात्री 12.15 वाजता वरिष्ठ विद्यार्थ्यांनी फिर्यादीच्या खोलीचा दरवाजा तोडून विद्यार्थ्याला मारहाण केली. या घटनेत विद्यार्थी जखमी झाला. याबाबत जखमी विद्यार्थ्याने जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रेक्टर व प्राचार्यांच्या मदतीने संबंधित वरिष्ठ विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर चार विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पाच सदस्यीय चौकशी समिती

या गंभीर घटनेनंतर महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सोनवणे यांनी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त केली होती. समितीने चौकशी करून आपला अहवाल महाविद्यालय प्रशासनाकडे सादर केला. या अहवालात पोलीस तक्रारीतील चार विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी, तसेच अन्य तीन विद्यार्थी असे एकूण सहा विद्यार्थी दोषी आढळले. त्यानुसार महाविद्यालय प्रशासनाने सहाही विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. दोषी विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी निलंबित, वसतिगृहातून कायमस्वरूपी काढून टाकण्यात आले असून, प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला आहे, अशी माहिती प्राचार्य दत्तात्रय सोनवणे यांनी दिली.