मुसलमानांनो, गरब्याला यायचे असेल तर बहिणी, मुलींना सोबत आणा! भाजप आमदाराच्या वक्तव्याने वाद उफाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवरात्रोत्सवातील मुस्लिमांच्या सहभागावरून भाजपचे आमदार रामेश्वर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळला आहे. ‘मुसलमान तरुणांना गरब्याला यायचे असेल तर त्यांनी आपली आई, बहिणी आणि मुलींना सोबत घेऊन यावे. एकटे येऊन हिंदू मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला सडेतोड उत्तर दिले जाईल,’ अशी धमकी शर्मा यांनी दिली आहे.

रामेश्वर शर्मा हे भोपाळच्या हुजूर मतदारसंघाचे आमदार आहेत. ‘पीटीआय’शी बोलताना त्यांनी गरब्यातील मुस्लिम तरुणांच्या सहभागावर भाष्य केले. ‘नवरात्र हा सनातन धर्मीयांचा उत्सव आहे. या उत्सवात आई जगदंबेची आराधना केली जाते. सनातनी हिंदू समाज सहकुटुंब यात सहभागी होतो. हे मनोरंजन नाही. भक्तीचा उत्सव आहे. मुस्लिमांना सनातन धर्माविषयी इतपंच प्रेम वाटत असेल तर त्यांनी सहकुटुंब यावे. मुस्लिम तरुणांनी आपल्या आई-वडिलांना, बहिणींना, मुलींना घेऊन यावे. फक्त गरबा बघायला येऊ नये. गरबा खेळून जगदंबेची आराधना करावी. प्रसादाचा लाभ घ्यावा आणि सनातन धर्माचा जयजयकारही करावा, असे शर्मा म्हणाले. शर्मा यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

…तर सडेतोड उत्तर देऊ!

शर्मा यांनी विश्वामित्रांचा दाखलाही दिला. ‘राक्षस यज्ञात वारंवार विघ्न आणायचे म्हणून विश्वामित्र दशरथाकडे मदत मागायला गेले होते. त्यावेळी दशरथाच्या सांगण्यावरून राम-लक्ष्मणाने यज्ञाचे रक्षण केले. राक्षसांचा वध केला. त्याचप्रमाणे हिंदू तरुण सनातनच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत. मुस्लिम तरुणांनी गरब्यात काही गैरप्रकार केल्यास हिंदू तरुण सडेतोड उत्तर देतील, असा इशाराही शर्मा यांनी दिला.

‘गरब्यात येऊन हिंदू मुलींची छेड काढाल, लव्ह जिहादसारखे प्रकार कराल तर हिंदू तरुण सनातनचे रक्षण करण्यास तयार आहेत.’