
गौरी-गणपतीचे विसर्जन करून कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या गणेशभक्तांची कोकण रेल्वे मार्गावर तब्बल पाच ते सहा तास रखडपट्टी होऊ लागली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून विशेष ट्रेनच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. त्यातच नियमित गाडय़ा उशिराने धावत आहेत. त्यामुळे मुंबईकर गणेशभक्तांसाठी परतीचा प्रवास डोकेदुखीचा ठरला असून रेल्वेच्या भोंगळ कारभारावर संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.
कोकणवासीय गणेशभक्तांच्या सोयीसाठी यंदा रेल्वेने 390 गणपती विशेष गाडय़ांचे नियोजन केले. यात मध्य रेल्वेच्या 262, पश्चिम रेल्वेच्या 64, कोकण रेल्वेच्या 58 आणि दक्षिण-मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाडय़ांचा समावेश आहे. गाडय़ांची संख्या वाढवण्यात आली, मात्र वेळापत्रकाचे नियोजन करण्यात रेल्वे प्रशासन ‘सपशेल फेल’ ठरल्याची प्रचीती मुंबईकर आणि ठाणेकरांना परतीच्या प्रवासात येत आहे. सात दिवसांच्या गणरायाचे विसर्जन केल्यानंतर गणेशभक्तांनी मुंबई आणि ठाण्याकडे परतीचा प्रवास सुरू केला. मात्र विशेष गाडय़ा पाच ते सहा तास उशिराने मुंबईत पोहोचत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गाडय़ा उशिराने पोहोचतात. त्यामुळे त्या गाडय़ांचा परतीचा प्रवास सुरुवातीलाच दीड ते दोन तासांच्या विलंबाने सुरू होतो. रत्नागिरीनंतर विशेष गाडय़ा रडतखडत चालवल्या जातात. हा मनस्ताप दरवर्षी सहन करावा लागत असल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
चौकशी प्रणालीवर चुकीची माहिती
‘नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम’वर विशेष गाडय़ांच्या वेळेबाबत चुकीची माहिती दाखवली जाते. सावंतवाडी येथून दीड तास उशिराने सुटणारी गाडी वैभववाडी स्थानकात ’ऑनटाईम’ येणार असल्याचे दाखवले. या चुकीच्या माहितीमुळे वेळेत रेल्वे स्थानक गाठलेल्या प्रवाशांना नंतर तासन्तास स्थानकात ताटकळत राहावे लागले. हा रेल्वेने कोकणवासीयांची थट्टा करण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया भांडुप येथील गणेश चमणकर यांनी दिली.
वेळेबाबत योग्य उद्घोषणांचीही बोंब
विशेष गाडय़ांच्या तिकिटासाठी 300 रुपये अधिक मोजूनही प्रत्येक टप्प्यावर घोर निराशा झाली, अशी नाराजी काळाचौकी येथील दिनेश भरणकर यांनी व्यक्त केली. रेल्वे स्थानकांत गाडय़ांच्या वेळेबाबत योग्य प्रकारे उद्घोषणाही करण्यात येत नसल्याची तक्रार अनेक प्रवाशांकडून केली जात आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या तोंडावर मध्य रेल्वेने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी एक्सप्रेसच्या 14 तासांच्या प्रवासावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.






























































