‘साबुदाणा रांगोळी’तून साकारला बाप्पा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणरायाची जशी अनेक रूपे आहेत त्याचप्रमाणे भक्तदेखील आपल्या लाडक्या बाप्पाला विविध कलांच्या माध्यमातून साकारताना पाहायला मिळतात. मुलुंडमध्ये देखील असाच भक्ती, कला आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला आहे. प्रसिद्ध कलाकार मोहनकुमार दोडेचा यांनी ‘साबुदाणा रांगोळी’पासून बाप्पा साकारला आहे.

मोहनकुमार दोडेचा हे 83 वर्षांचे असून त्यांनी गेल्या 66 वर्षांपासून साबुदाण्याचा वापर करून गणेशांची भव्य आणि आकर्षक रांगोळी साकारण्याची परंपरा जपली आहे. यंदा त्यांनी अंदाजे 7×8 फूट आकाराची भव्य रांगोळी तयार केली आहे. या रांगोळीसाठी त्यांनी सुमारे 40 किलो साबुदाणा आणि तब्बल 350 विविध रंगांच्या छटा वापरल्या आहेत. ही रांगोळी साकारण्यासाठी मोहनकुमार दोडेचा यांच्यासोबत भूपेश जोशी, दयाराम हिंदिसोटा, अर्चना पालन, भावना भानुशाली, भारत गोरी, दीपक रुपारेल, डॉ. चेतन, नवीन नाकर या कलाकारांनी विशेष मेहनत घेतली आहे. मोहनकुमार यांच्या या अनोख्या कलेला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार प्राप्त झाले असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्, लिंक बुक ऑफ रेकॉर्डस् आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांच्या कलेची नोंद झाली आहे.