
कांजूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम ठेवली आहे. मंडळाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ’झाडे लावा, झाडे जगवा आणि आपले आयुष्य व भविष्य वाचावा’ असा संदेश देणारा देखावा उभारण्यात आला आहे. या निसर्गरम्य देखाव्यात मोरावर बसलेल्या गणराजाची मूर्ती आकर्षणाचे केंद्रबिंदू बनली असून बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक मोठया संख्येने गर्दी करत आहेत.
कांजूर गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 55 वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाकडून दरवर्षी सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले जातात. मंडळाने आतापर्यंत समाजात एकोपा, जागृती, राष्ट्रीय भावना असे विविध देखावे उभारले आहेत. त्याचबरोबर सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रमांच्या माध्यमातून विभागातील नागरिकांना सेवेचा लाभ दिला आहे. यंदा मंडळाच्या वतीने निसर्गाच्या सानिध्यातील देखावा उभारला आहे असून पशु, पक्षांसह जंगलातील वन्यजीवांना संरक्षण करा आणि झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिला आहे.


























































