
हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने आपली सुवर्ण कामगिरी कायम ठेवत आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला. फायनलमध्ये हिंदुस्थानने श्रीलंकेला 147 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करून सलग दुसरे आशियाई क्रीडा सुवर्णपदक पटकावले. या विजयामुळे यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानने पहिल्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. हिंदुस्थानने सुवर्ण, श्रीलंकेने रौप्य आणि पाकिस्तानने कांस्यपदक पटकावले.
स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या
कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंपून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थानच्या फलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे योग्य ठरवला. हिंदुस्थानने 20 षटकांत 3 फलंदाज गमावून 216 धावा केल्या, जी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील कोणत्याही संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे.
हिंदुस्थानची धडाकेबाज फटकेबाजी
शफाली वर्मा आणि स्मृती मानधाना यांनी 99 धावांच्या सलामी देत विजयाचा पाया रचला. शफानीचे अर्धशतक यावेळी फक्त दोन धावांनी हुकले. शफालीने 29 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. शफाली बाद झाली तरी स्मृतीने आपली फटकेबाजी सुरू ठेवली आणि अर्धशतकही पूर्ण केले. हरमनप्रीत काwर 19 धावांवर बाद झाली असली तरी स्मृतीला त्यानंतर रिचा घोषची चांगली साथ मिळाली. स्मृतीने यावेळी 45 चेंडूंत पाच चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 79 धावांची दमदार खेळी साकारली. स्मृती बाद झाली तरी रिचाने स्फोटक फलंदाजी सुरूच ठेवली. रिचा घोषने 22 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांसह 49 धावांची वेगवान खेळी केली. त्यामुळेच हिंदुस्थानला 216 धावांचा डोंगर उभारता आला.
फिरकीच्या तालावर श्रीलंकेला नाचवले
हिंदुस्थानने फिरकीच्या जोरावर श्रीलंकेचा फक्त 69 धावांत खुर्दा उडवला. हिंदुस्थानच्या 217 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना अचूक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणासमोर श्रीलंकेचा संघ पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
ऑफस्पिनर दीप्ती शर्मा हिंदुस्थानसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 4 षटकांत केवळ 6 धावा देऊन 3 विकेट्स घेतले. तुफानी फलंदाजी करणाऱ्या शफाली वर्माने गोलंदाजीत कहर केला. तिने 2 षटकांत फक्त 3 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. त्याचबरोबर श्री चरणी आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या.


























































