ऐन गर्दीच्या वेळी खोपोली लोकल तासभर ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन गर्दीच्या वेळी संध्याकाळी खोपोली–मुंबई सीएसएमटी लोकलमध्ये पळसदरी-कर्जतदरम्यान मोठा तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे लोकल तब्बल एक तास ठप्प झाली व शेकडो प्रवाशांचे हाल झाले. अंधार पडल्याने अनेक प्रवाशांनी जीव धोक्यात घालून मोबाईल टॉर्चच्या उजेडात रेल्वे रुळांवरूनच पायपीट करीत कर्जत गाठले. खोपोली स्थानकातून सायंकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी मुंबई सीएसएमटीकडे रवाना झालेली लोकल पळसदरी-कर्जत स्थानकादरम्यान अचानक थांबली. तपासणीदरम्यान मोटरमनला एमआरआय पाईपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. बराच उशीर होऊनही ट्रेन सुरू होत नसल्याने प्रवाशांनी रेल्वे रुळांवर उतरून मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात तंगडतोड करून कर्जत स्थानक गाठले. रेल्वे तांत्रिक पथकाने घटनास्थळी पोहोचून बिघाड दूर केल्यानंतर सुमारे एक तासाने सात वाजून वीस मिनिटांनी लोकल पुन्हा सुरू करण्यात आली.