ठाण्याच्या मोघरपाड्यातील प्रकल्पग्रस्तांना दिलासा, मेट्रो कारशेडसाठी जमीन देणाऱ्यांना मालकी हक्काने विकसित भूखंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई मेट्रो मार्ग 4, 4 अ व 10 या प्रकल्पांच्या एकात्मिक कार शेड डेपोकरिता जमीन दिलेल्या ठाण्याच्या मोघरपाडय़ातील 198 शेतकऱ्यांना मालकी हक्काने विकसित भूखंड देण्यास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

मोघरपाडय़ातील प्रकल्पबाधित 198 शेतकऱ्यांना 22.5 टक्के व 12.5 टक्के विकसित भूखंड वाटप होणार आहे. यात 168 शेतकरी आणि 31 अतिक्रमणधारीत शेतकऱ्यांचा समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वडाळा ते कासारवडवली ठाणे या मेट्रो -4 प्रकल्पास निकडीचा सार्वजनिक प्रकल्प व महत्त्वपूर्ण नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. हा मार्ग पुढे गायमुखपर्यंत वाढवण्यात आला आहे. या मेट्रो मार्गिका 4, 4 अ, 10 व 11 यांच्यासाठी मोघरपाडय़ातील एकूण 211.76 हेक्टर जमिनीपैकी 174.01 जमीन एमएमआरडीएला मिळाली आहे.

खारच्या रामकृष्ण नगरचा समूह पुनर्विकास

मुंबईतील खार पश्चिम येथील रामकृष्ण नगरमधील म्हाडाच्या इमारतींचा समूह पुनर्विकास (क्लस्टर) करण्यास व त्यासाठी विकासक नियुक्ती करण्यास आज मान्यता दिली. रामकृष्ण नगर गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीचे क्षेत्रफळ 25,523.90 चौरस मीटर आहे. त्यामध्ये एकूण 19 इमारती आहेत. 1985 च्या दरम्यान त्या बांधण्यात आल्या आहेत. या 19 इमारतींपैकी तीन इमारती असलेले भूखंड म्हाडामार्फत रामकृष्ण नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेस मालकी तत्त्वावर वितरीत केले आहेत. यातील भूखंड क्रमांक 18 व कार्यालयीन इमारतीच्या भूखंडाचे क्षेत्र वगळून उर्वरित भूखंडावर विकासकाची नियुक्ती करून क्लस्टर पुनर्विकास केला जाणार आहे. हा प्रकल्प जलदगतीने राबविण्यासाठी गृहनिर्माण विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यासही मंजुरी देण्यात आली.

कृषी विभागाची सुधारित पदरचना रद्द, फेरप्रस्ताव सादर करण्यास मंजुरी

कृषी विभागातील पदरचनेचा सुधारित आकृतीबंध आज रद्द करण्यात आला. 2009 मधील स्थितीला अनुसरून ही पदरचना केली गेली होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि संघटनांनी तिला विरोध केला होता. त्यामुळे फेरप्रस्ताव सादर करण्यास मंजुरी दिली. राज्यातील निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि यात कृषी विभागावर असलेली क्षेत्रीय स्तरावरील महत्त्वाची जबाबदारी यांचा विचार करता हा कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध रद्द करण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने सादर केला. त्यामुळे 2009 चा मंजूर आकृतीबंध सध्या कायम राहणार आहे.

धुळ्यात परिवहन कार्यालयासाठी मैदानाचे आरक्षण रद्द

धुळे महानगरपालिका हद्दीत प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी देवपूर येथे असलेले क्रीडांगण आणि बगीच्याचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. देवपूर येथील सर्व्हे क्र. 103 या जमिनीवरील काही भागावर क्रीडांगण व बगीचा यांचे आरक्षण आहे. यातील 2 हेक्टर 885 आर क्षेत्राची मालकी धुळ्याचे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे आहे. या जागेवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहन तपासणी, वाहन नोंदणी व लायसन्स चाचणी आदी कामे केली जातात. या ठिकाणी तपासणी पथकासाठी व अन्य इमारतीचे बांधकाम सुरू असून त्याकरिता सुमारे 94 लाख 50 हजार रुपये खर्च करण्यात आलेला आहे. त्यामुळे क्रीडांगण व बगीचा यांचे आरक्षण वगळून हे क्षेत्र सार्वजनिक निमसार्वजनिक या वापर विभागात समाविष्ट करण्यासाठी परिवहन विभागाने महापालिकेला विनंती केली होती. त्यासंदर्भात सादर प्रस्तावाला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.