
मुंबई विद्यापीठ संलग्नित माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये चतुर्थ वर्ष कला शाखा (Psychology Honours) अभ्यासक्रमासाठी एका विद्यार्थिनीने वेळेत प्रवेश घेऊन शुल्क भरले, परंतु या विद्यार्थिनीने विद्यापीठ पूर्व प्रवेश अर्ज अपूर्ण भरल्याने विद्यापीठाकडून तिचा प्रवेश रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनीच्या मदतीसाठी युवासेना सरसावली असून या विद्यार्थिनीचा प्रवेश रद्द न करता पूर्व प्रवेश अर्ज दुरुस्ती करण्यास संधी देऊन शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचवावे, अशी मागणी करण्यात आली.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे आलेल्या तक्रारीची दखल घेऊन युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर आणि कॉलेज कक्ष पदाधिकारी दुर्गेश वैद्य यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या विद्यार्थिनीने वेळेत म्हणजे जुलै 2026 मध्ये संपूर्ण शुल्क भरून प्रवेश घेतला. विद्यापीठाची पूर्व प्रवेश अर्ज लिंक 12 ऑगस्टला बंद करण्यात आली आणि विद्यार्थिनीला प्रवेश रद्द करण्याचे आदेश 9 सप्टेंबरला देण्यात आले. प्रवेश पूर्व अर्ज पूर्ण भरला नव्हता तर प्रवेश का देण्यात आला? विद्यापीठ प्रशासनाला सदर प्रवेश प्रक्रियेत त्रुटी आढळून आल्या होत्या तर एका महिन्याने विद्यार्थिनीस प्रवेश रद्द करण्याचे आदेश का दिले? असे सवाल युवासेनेच्या वतीने उपस्थित करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीपासून वाचवा
जेवढे विद्यार्थी असतील त्यांना त्यांचे पूर्व प्रवेश अर्ज दुरुस्ती करण्यास सहकार्य करावे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीपासून वाचवावे, अशी आग्रही मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाद मागू. तिथेही चालढकल झाल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे प्रदीप सावंत यांनी सांगितले.





























































