
राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाने 21 ते तब्बल 43 दिवसांचा खंड घेतला आहे. त्यामुळे उभी पिके करपून गेली आहेत. रत्नागिरीपासून सिंधुदुर्गात भात पिके पिवळी पडली आहेत. कोकणात अनेक ठिकाणी भात पिकावर करपा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. भात, कापूस, सोयाबीन, मका, ज्वारीच्या उत्पादनात 25 ते 60 टक्क्यांची घट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसाने दिलेली ओढ आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे राज्यात भीषण परिस्थिती आहे. सोलापूर जिह्यात तर दुष्काळाची पहिली कळ लागू झाली आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पीक परिस्थितीचे आकडेवारीसह सविस्तर सादरीकरण केले. त्यानुसार बहुतांश जिल्ह्यांत पावसाने ओढ दिल्याने शेतीच्या उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला असून बळीराजामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
नाशिकपासून वाशीमपर्यंत चिंतेचे वातावरण
नाशिक जिह्यात मालेगाव, येवला, चांदवड, बागलाण, नांदगाव, देवळा, निफाड, सिन्नर, तालुक्यातील पूर्व भागात 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्याने पिकांची वाढ खुंटलेली आहे. कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी पिके सुकू लागली आहेत. सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना लातूर, अमरावती, वाशीम जिल्ह्यातील कापूस, सोयाबीनची वाढ खुंटली आहे.
सोलापूरमध्ये ट्रिगर
सोलापूरमधील आठ तालुक्यांत पर्जन्यमानाची अत्यल्प (61 टक्के तूट) नोंद झाली आहे. दुष्काळाची पहिली कळ (ट्रिगर वन) लागू झाली आहे. पावसाच्या खंडामुळे सर्वच अकरा तालुक्यांमध्ये पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे.
अहिल्यानगरमध्ये टंचाईची परिस्थिती
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये टंचाईसदृश परिस्थिती आहे. जिह्यातील शेतकरी मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
ठाण्यापासून सिंधुदुर्गपर्यंत करपा रोगाचा प्रादुर्भाव
ठाणे जिल्ह्यात पावसाची उघडीप व ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी खोड किडीचा व सुरळीतील अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शहापूर तालुक्यात भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळला. अंबरनाथ तालुक्यात भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला.
पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात काही ठिकाणी पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रायगड जिह्यात म्हसळा तालुक्यात रारपाड जमिनीत भात खाचरातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. महाड, पेण, मुरुड, श्रीवर्धन व माणगाव तालुक्यात खोडकिडा, निळे भुंगेरे, सुरळीतील अळी, पाने गुंडाळणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव आढळला.
रत्नागिरीत कातळावरील भात लागवडीच्या बाबतीत पाण्याच्या कमतरतेमुळे भाताची पिके पिवळी पडली आहेत. गुहागरमध्ये भात पिकावर निळे भुंगेरे व करपा रोगाचा प्रादुर्भाव आहे. चिपळुणात पावसातील खंडामुळे नागली पिकावर करपा रोग व शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळला.
सिंधुदुर्ग जिह्यात देवगड, वैभववाडी व दोडामार्ग तालुक्यात भात नागली, नाचणी, कडधान्य व गळीत पिकांची वाढ खुंटली आहे. भात पिकाच्या फुटव्यांची वाढ कमी झाली असून भरड भागातील भात शेती पिवळी पडत आहे.



























































