
कोस्टल रोडवर भरधाव बीएमडब्ल्यू कारला झालेल्या भीषण अपघाताने बेदरकार ड्रायव्हिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी-लिंकवर वेगमर्यादा ओलांडून बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच महिन्यांत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) बेदरकार ड्रायव्हिंग करणाऱ्या 2,200 वाहनचालकांवर कारवाई केली. सुसाट धावणाऱ्या गाड्यांमुळे अपघातांचा धोका वाढल्याने आरटीओच्या विशेष पथकांनी ही कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाचे काम करण्यात आले. कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी-लिंकमुळे मुंबईकरांचा दक्षिण मुंबईकडील प्रवास सुकर झाला. मात्र या मार्गांवर सध्या अनेक वाहनचालकांकडून सुसाट वेगाने गाडी चालवण्याचे प्रकार घडत आहेत. त्यांच्या बेदरकार ड्रायव्हिंगमुळे जीवघेण्या अपघातांचा धोका वाढल्याने आरटीओने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत ताडदेव आरटीओच्या विशेष पथकांनी वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या 2,200 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. अनेक वाहनचालक रात्रीच्या वेळी आणि सुट्टय़ांच्या दिवशी वेगमर्यादेचे उल्लंघन करून सुसाट गाड्या पळवत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आरटीओची विशेष भरारी पथके तैनात करून कठोर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
स्पीड गन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
कोस्टल रोड आणि सी-लिंकवर वाहनांचा वेग मोजण्यासाठी आधुनिक ‘इंटरसेप्टर व्हेईकल्स’ आणि ‘स्पीड गन’चा वापर करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या गाडय़ांचे फोटो आणि नंबर प्लेट्स तत्काळ स्पॅन करून त्यांच्यावर ई-चलन जारी केले जात असल्याचे आरटीओच्या अधिकाऱयांनी सांगितले.
पाच महिन्यांत चालकांवर कारवाई
महिना प्रकरणे
एप्रिल 567
मे 482
जून 477
जुलै 304
ऑगस्ट 370
एकूण 2200






























































