
सहा दिवसांपूर्वी मंत्री अशोक वुईके यांनी भेट देऊनही आश्रमशाळांमधील दैन्यावस्था थांबलेली नाही. ग्रामस्थांनी धडक देत सुरगाणा तालुक्यातील पळसन येथील शासकीय आश्रमशाळेत सेंट्रल किचनमधून येणाऱ्या निकृष्ट जेवणाचा पर्दाफाश केला. कच्चा भात, कच्च्या पोळ्या आणि बेचव भाजी खाणे शक्य नसल्याने हे अन्न फेपून देत विद्यार्थी अर्धपोटी राहत असल्याचे निदर्शनास आले आहे.
आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांनी 16 सप्टेंबर रोजी सुरगाणा तालुक्यातील माणी आश्रमशाळेतील सेंट्रल किचनला भेट दिली. अर्धवट शिजवलेले अन्न, कच्च्या पोळ्या पाहून त्यांनी आदिवासी विकासचे अधिकारी व आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. माणी आश्रमशाळेला अचानक भेट देण्याचा फार्स केला. या आश्रमशाळांपेक्षा जनावरांचे गोठे बरे, असा संताप त्यांनी पाहणीवेळी व्यक्त केला होता. दुसऱ्या दिवशी मात्र घुमजाव करीत असे काही घडलेच नाही, त्रुटींबाबत सूचना दिल्या, असे सांगून प्रसारमाध्यमांसमोर सारवासारव केली. या दौऱ्यानंतरही आश्रमशाळांच्या कामकाजात सुधारणा झालेली नाही. त्याचा पर्दाफाश ग्रामस्थांनी केला आहे.
पळसन येथील शासकीय आश्रमशाळेला शिवसैनिक कृष्णा चौधरी, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ गवळी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अशोक गावीत यांच्यासह ग्रामस्थांनी भेट दिली. येथील सुमारे 750 विद्यार्थ्यांना माणी येथील सेंट्रल किचनमधून जेवणाचा पुरवठा केला जातो. या जेवणाची पाहणी करत या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या पंगतीत बसून जेवण केले. कच्च्या पोळ्या, कच्चा भात, अर्धवट शिजलेली भाजी, वरण हे खाणेच शक्य नसल्याने विद्यार्थी अर्धपोटी राहत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी गुलाब गवळी, राजू गवळी, उखाराम पवार, रामा पवार, दामू गवळी, हेमराज गायकवाड, मनोहर जाधव, नितीन दळवी, हंसराज वार्डे आदी ग्रामस्थ हजर होते.































































