
२२ सप्टेंबर २०२५.. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाणे मेट्रोची ट्रायल रन झाली आणि आता या मेट्रोने लवकरच प्रवास करायला मिळेल, अशी स्वप्ने ठाणेकरांनी रंगवली. या महिन्यात सुरू होईल.. चार महिन्यांनी सुरू होईल, आठ महिन्यांनी सुरू होईल, अशा आश्वासनांच्या पुड्या सुटल्या. पण मेट्रोच्या ट्रायल रनला एक वर्ष उलटून गेले. तरी ठाण्याची मेट्रो धावण्यासाठी अजून सत्ताधाऱ्यांना मुहूर्तच सापडत नसल्याने लाखो ठाणेकरांचा जीवमुठीत धरून धक्काबुक्की प्रवास सुरूच आहे. मेट्रोचे काम सुरू होऊन आठ वर्षे झाली. मेट्रो सुरू करण्यासाठी पुढच्या निवडणुकीची वाट पाहावी लागणार काय, असा संतप्त सवाल ठाणेकरांनी केला आहे.
ठाणे शहराची भविष्यातील लाईफलाईन असलेल्या मेट्रो मार्गिकेची वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्रायल रन घेतली. त्यावेळी फडणवीस आणि शिंदे मोठ्या थाटात आले आणि ठाणे मेट्रोच्या रॅकमध्ये बसले. त्यावेळी ठाण्याची ही मेट्रो ५ ते ६ महिन्यांत सुरू होईल, असे आश्वासनदेखील देण्यात आले. मात्र वर्ष उलटले तरी अद्याप मेट्रो धावलीच नसल्याने ठाणेकरांची निराशा झाली आहे.
पालिक्याची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून स्टंट
शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी मेट्रो चारची उभारणी केली जात आहे. परंतु चाचणीनंतर वर्ष उलटले. तरी ही मेट्रो धूळखात असल्याचे चित्र आहे. मागील नऊ महिन्यांपासून ही मेट्रो रुळांवर उभी असल्याने नागरिकांकडून टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ही स्टंटबाजी करण्यात आली होती का, असा सवाल विचारला जात आहे.
बाप्पा राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे!
मागील वर्षी या मेट्रो मार्गाची ट्रायल रन घेण्यात आली होती. मात्र वर्षभरानंतरही अपेक्षित प्रगती झालेली नाही. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज घोडबंदर येथील मानपाडा पोलीस स्टेशनसमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. बाप्पा राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे… ठाणेकरांना मेट्रोत बसू दे, या सरकारचे करायचे काय; खाली डोके वरती पाय, घोडबंदरकरांना ट्रॅफिकमुक्त प्रवास द्या, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. कार्यकर्त्यांनी चक्क मेट्रो मार्गाला पुष्प अर्पण करून, श्रीफळ वाढवून अनोखे आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, गटनेते अभिजित पवार यावेळी उपस्थित होते.
“ही टेस्ट होती. मग हारतुरे लावून एका उद्घाटनाच्या पद्धतीने कार्यक्रम का घेण्यात आला? हा प्रश्न आमच्या मनात आहे. तुम्ही फक्त आणि फक्त निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा कार्यक्रम घेतला होता. पुढच्या एक वर्षामध्ये ही मेट्रो चालू होणार नाही. जर खरोखरच ठाणे स्टेशनचे ट्रॅफिक कमी करायचे असेल तर ही मेट्रो वडाळ्यापर्यंतच नाही तर सीएसटीपर्यंत चालवा.”
मनोज प्रधान (जिल्हाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस)





























































