
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या एलिमेंटरी व इंटरमीजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा उद्या, 28 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. प्रश्नपत्रिका आता परीक्षेच्या दिवशीच सुमारे साडेचार तासांपूर्वी केंद्र प्रमुखांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परिपत्रक नुकतेच महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत काढण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी एकटया केंद्रप्रमुखांवर ढकलण्यात आली आहे.
यंदा एलिमेंटरीसाठी महाराष्ट्रातून तब्बल 4,21,0 57 व इंटरमीजीएटसाठी 3,28,645 अशा 7 लाख 49 हजार 702 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रश्नपत्रिका फुटण्याची शक्यता असल्याने यंदा पद्धतीत बदल करण्यात आला आहे. मंडळाने 22 सप्टेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर प्रश्न शिक्षकांनी फळ्यावर लिहून द्यायचे आहेत असे निर्देश दिले होते. विद्यार्थी-पालक तसेच अन्य जणांचा विरोध बघता मंडळाने 24 सप्टेंबर रोजी सुधारित परिपत्रक काढले.
सकाळी 10.30 वाजता पेपर सुरू होणार. तो पेपर केंद्र प्रमुखाला सकाळी 6 वाजता लॉगिनवर उपलब्ध होणार. त्यासाठी त्यांना 6 वाजताच परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल. केंद्र प्रमुखांची संख्या कमी आणि परीक्षार्थी जास्त अशी स्थिती आहे. अन्य शिक्षकांनी मदत करावी असे आवाहन मंडळाने केले असले तरी केंद्र प्रमुखावर ताण येणार आहे. हे चुकीचे आहे.
– डॉ. माधव सूर्यवंशी, शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई























































