
मूळ आकाराचे घर जेवढे असेल त्याआधारावरच पुनर्विकासात नवीन फ्लॅट मिळेल. सरसकट एकाच आकाराचे नवीन घर सर्व सभासदांना मिळू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
पुनर्विकासात सर्व सदस्यांना एकाच आकाराचे घर व पुनर्विकास होईपर्यंत ट्रांझिट भाडे द्यावे, असे आदेश उप निबंधकांनी टिळकनगर निशिगंधा को-ऑप. हाऊसिंग सोसायटीला (प्रस्तावित) दिले. त्याविरोधात या सोसायटीने अॅड. संजीव सावंत यांच्यामार्फत याचिका दाखल केली. हे आदेश सोसायटीला बंधनकारक नाहीत. सभासदांनी असा अर्ज केल्यास नियमानुसारच त्याचा विचार करायला हवा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सर्व सभासदांचे घर एकाच आकारचे असेल तरच सर्व सभासदांना पुनर्विकासात एकाच आकाराचे घर व पुनर्विकास होईपर्यंत ट्रांझिट भाडे मिळू शकेल. मात्र घरांचा आकार वेगवेगळा असल्यास त्याआधारावरच सभासदांना नवीन फ्लॅट व ट्रांझिट भाडे मिळेल, असा निर्वाळा देत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.
पुनर्विकास तत्काळ सुरू करा
गेली अनेक वर्षे या इमारतीचा पुनर्विकास रखडला आहे. तेव्हा पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने म्हाडाला द्यावेत, अशी विनंती अॅड. सावंत यांनी केली. ती मान्य करत हा पुनर्विकास तातडीने सुरू करण्याचे निर्देश न्यायालयाने म्हाडाला दिले.
काय आहे प्रकरण?
या सोसायटीचे एकूण 63 सदस्य आहेत. 2007 पासून पुनर्विकासासाठी ही सोसायटी प्रयत्न करत आहेत. अखेर एका विकासकामार्फत सोसायटीने हा पुनर्विकास करण्याचा ठराव केला. काही सभासदांनी उपनिबंधकांकडे तक्रार करत सर्व सभासदांना पुनर्विकासात समान घर देण्याची मागणी केली. ही मागणी उपनिबंधकांनी मान्य केली. असे आदेश देण्याचे उपनिबंधकांना अधिकारच नाहीत, असा दावा करत सोसायटीने न्यायालयाचे दार ठोठावले.

























































