
मध्य रेल्वे प्रशासनाने छटपूजेनिमित्त महाराष्ट्राबाहेरील राज्यांसाठी 418 विशेष मेल-एक्स्प्रेस गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. परराज्यांसाठी विशेष गाड्या सोडण्यात तत्परता दाखवली जात असताना लोकल ट्रेनच्या प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावरून प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे.
कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार करून प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
छठपूजेनिमित्त विशेष गाड्या सोडण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो; परंतु त्याचवेळी दररोज 10 लाखांहून अधिक प्रवास करणाऱ्या कसारा-कर्जत विभागातील नियमित प्रवाशांवर होणाऱ्या अन्यायाचा कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना तीव्र शब्दांत निषेध करत आहे, असे संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले. एकीकडे उत्सवासाठी 418 गाड्या सोडायला रेल्वेकडे इंजिन, डबे, कर्मचारी आणि मार्ग उपलब्ध होतो; मात्र रोजचे प्रवासी असलेले नोकरदार, विद्यार्थी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईक आदी प्रवाशांसाठी 10-12 वाढीव लोकल सोडायला रेल्वेची मानसिकता नाही. ही सरळसरळ दुटप्पी आणि महाराष्ट्रातील प्रवाशांवर अन्याय करणारी भूमिका आहे, असा आरोप घनघाव यांनी केला आहे.
कसारा, कर्जतसाठी 16 वर्षांत एकही वाढीव लोकल नाही
रेल्वे प्रशासनाने 2010 पासून कसारा आणि कर्जत मार्गावर एकही वाढीव लोकल दिलेली नाही; मात्र विशेष ट्रेनच्या नावाखाली मागील 16 वर्षांत जवळजवळ 100 पेक्षा जास्त मेल-एक्सप्रेस वाढविण्यात आल्या आहेत. दरवर्षी विशेष ट्रेनच्या नावाखाली मेल एक्सप्रेस वाढविल्या जातात याकडे प्रवासी संघटनेने लक्ष वेधले आहे.
वाढीव लोकलसाठी आंदोलनाचा इशारा
कसारा आणि कर्जत विभागातील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरू होऊन 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. ते काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागतील. तोपर्यंत वाट न पाहता वेळीच सकाळी कसारा ते सीएसएमटी आणि संध्याकाळी सीएसएमटी ते कसारा, कर्जतदरम्यान किमान 12 वाढीव लोकल सुरू कराव्यात, अशी मागणीही प्रवासी संघटनेने केली आहे. रेल्वे प्रशासनाने 1 नोव्हेंबरपर्यंत लोकल वाढवल्या नाहीत तर सनदशीर मार्गाने 1 डिसेंबरला आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.




























































