
राजकारणात खासदार, आमदार व इतर नेत्यांचे पक्षांतर कायम चर्चेत राहिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पक्षांतरामुळे देशातील राजकारणाला वेगळेच वळण लागले. वर्ष 2022 ते 2026 या कालावधीत देशभरातून निवडून गेलेल्या तब्बल 111 खासदार आणि आमदारांनी पक्षांतर केले आहे. ‘असोसिएशन फॉर डेमोव्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संस्थेने जाहीर केलेल्या एका अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे. या 111 पैकी 26 टक्के लोकप्रतिनिधींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे या अहवालातून उघडकीस आले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या या पक्षांतरामुळे काही राज्यांमध्ये सत्तांतर झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा प्रामुख्याने समावेश आहे.़
‘एडीआर’ आणि ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ या संस्थांनी संयुक्तपणे 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आकडेवारीचे विश्लेषण करून हा अहवाल सादर केला आहे. या काळात 26 लोकसभा खासदार, 7 राज्यसभा खासदार आणि 78 आमदारांनी पक्षांतर केले आहे. या पक्षांतरामध्ये नागालँडमधील एनपीएफमध्ये झालेले विलीनीकरण आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधील बंडखोरीचाही उल्लेख आहे. तृणमूलचे 20 लोकसभा खासदार बंडखोरी करून ‘एनसीपीआय’ या पक्षात सामील झाले होते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटल्याचादेखील उल्लेख अहवालात आहे.
7 खासदार, 22 आमदार भाजपमध्ये
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 29 लोकप्रतिनिधींमध्ये राज्यसभेतील 7 खासदार तसेच 22 आमदारांचा समावेश आहे. लोकसभेतील एकही खासदार थेट भाजपमध्ये गेलेला नाही, असे या अहवालात म्हटले आहे. राज्यसभेतील या 7 खासदारांमध्ये ‘आप’मधून भाजपमध्ये गेलेल्या खासदारांचा समावेश आहे. तर गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मणिपूर, कर्नाटक या राज्यांतील आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
या पक्षांना पक्षांतराचा सर्वाधिक फटका
पक्षांतराचा सर्वाधिक फटका तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसला बसला आहे. तृणमूलचे 20, काँग्रेसचे 19, बीआरएसचे 9, आप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आणि शिवसेनेच्या 6 खासदारांनी मूळ पक्षासोबत बंडखोरी केली.



























































