मुंबईत ‘ऑक्टोबर हीट’च्या झळा, सप्टेंबर संपण्याआधीच तापमानात अचानक वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाने दडी मारल्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांत अचानक तापमानात मोठी वाढ झाली आहे. सप्टेंबर संपण्याआधीच ‘ऑक्टोबर हीट’च्या झळा जाणवू लागल्या आहेत. सकाळपासूनच उन्हाचा रखरखाट हैराण करीत आहे. पुढील आठवडाभरात तापमानात आणखी वाढ होईल आणि तापमान थेट 33 ते 34 अंशांच्या पुढे जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

देशाच्या काही भागांतून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. याचदरम्यान हवामानात संमिश्र बदल होत आहेत. त्याचा परिणाम मुंबईच्या वातावरणावर झाला आहे. गेले चार-पाच दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शहराच्या तापमानात अचानक वाढ झाली आहे. सप्टेंबर महिना संपण्यास काही दिवस बाकी असतानाच ऑक्टोबरमधील उष्णतेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याकडील नोंदीनुसार रविवारी कमाल आणि किमान तापमानात अचानक दोन ते तीन अंशांची मोठी वाढ झाली. सांताक्रुझमध्ये कमाल 32.1 आणि किमान 26 अंश तापमान नोंद झाले, तर कुलाब्यात कमाल 33.2 आणि किमान 27.2 अंश तापमान होते. सकाळच्या तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे उन्हाचा त्रास अधिक जाणवत असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले.

यंदा ऑक्टोबरमध्ये उष्णतेचे तीव्र चटके

यंदा ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या तीन आठवड्यांत उष्णतेचे तीव्र चटके सहन करावे लागणार आहेत. हवामान खात्याने 2 ते 8 ऑक्टोबर, 9 ते 15 ऑक्टोबर आणि 16 ते 22 ऑक्टोबर या तीन कालावधींसाठी कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. 2 ऑक्टोबरनंतर पावसाचा प्रभाव कमी होत जाऊन तापमानाचा पारा पुन्हा चढण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर कमाल तापमान अधिक राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.