
वेळ सकाळी साडेसातची. इंद्रायणी एक्स्प्रेसने कर्जत स्थानक सोडले आणि गाडी पुण्याच्या दिशेने रवाना झाली. काही क्षणातच एका डब्यातील यश फुंदे या तीन वर्षांच्या चिमुकल्याला अचानक १०२ पर्यंत ताप येत त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याचे डोळेही बंद झाले. शरीर ताठरले. यशची आई कमालीची घाबरली. काय करावे हे तिला सुचेना. मात्र त्याच एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका दक्ष प्रवाशाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित चेन ओढली आणि गाडी थांबली. हा प्रवासी जणू देवदूत म्हणूनच धावला. त्याने गाडी थांबताच चिमुकल्याला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. यशला वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. मदतीसाठी धावणाऱ्या प्रवाशावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
उल्हासनगर येथे राहणाऱ्या प्रतिभा फुंदे आपल्या यश या मुलाला घेऊन शुक्रवारी पुण्यात जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांनी इंद्रायणी एक्स्प्रेस पकडली. पुण्याहून नंतर त्या आपल्या सासरी पाथर्डी येथे जाणार होत्या. कर्जत रेल्वे स्थानक सोडताच मुलाला अस्वस्थ झाल्यासारखे वाटू लागले. त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला. याच डब्यातून कर्जतमधील रहिवासी भूषण हजारे हेदेखील प्रवास करत होते. यशची अवस्था पाहताच त्यांनी प्रतिभा फुंदे यांना काही काळजी करू नका, मी गाडीची चेन ओढतो, असे सांगून लगेच ट्रेनची चेन खेचली. पुढे घाट रस्त्याचा परिसर सुरू होणार होता. तिथे कोणतीही मदत मिळणे अशक्य होते. हे लक्षात आल्याने हजारे यांनी कर्जत रेल्वे स्थानकानजीक एक्स्प्रेस थांबताच भूषण हजारे यांनी यश व त्याच्या आईला सुखरूप खाली आणले.
हजारे यांनी दोन रूळ ओलांडत यश व त्याच्या आईला गुंडगे या गावातील सोमजाई मंदिराजवळ आणले. दरम्यान त्यांनी आपले सहकारी राहुल गुप्ता यांना स्वतःची कार घेऊन तातडीने पोहोचण्याची विनंती केली. तसेच त्यांनी कर्जतचे स्थानिक नगरसेवक महेंद्र चंदने यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांना सर्व परिस्थिती सांगितली.
नगरसेवकांनीदेखील लगेच डॉक्टरांशी चर्चा करून उपचाराची पूर्वतयारी करण्याची विनंती केली. दरम्यान यशला लगेच कारमधून डॉक्टर जैन यांच्या खासगी रुग्णालयात अॅडमिट केले. तेथे त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.
…आणि मातेच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले
अत्यंत कठीण प्रसंगी कर्जतमधील भूषण हजारे यांनी जी मदत केली ती आम्ही कदापि विसरू शकणार नाही. त्यांच्या रूपाने जणू देवच भेटला त्यामुळे यशला जीवदान मिळाले. आता त्याची प्रकृती ठीक आहे. त्याला डिस्चार्जही मिळाला असल्याचे सांगत प्रतिभा फुंदे यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.



























































