
माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर आता राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जनतेच्या ज्या प्रश्नांचा आवाज सरकारी कार्यालयांपर्यंत पोहोचत नाही, त्यांचा आवाज बनण्यासाठी राजकारणात येत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, कोणत्याही राजकीय पक्षात काम न करता थेट जनतेसोबत काम करण्याचा त्यांचा मानस आहे. उत्तर प्रदेशपासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिव्या मित्तल यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून आपल्या निर्णयाची माहिती दिली. गेल्या महिन्यात IAS पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढे काय करायचे, याचा विचार करण्यासाठी वेळ घेतल्याचे त्यांनी सांगितले. गावात मंजूर होऊनही न बांधलेली शाळा, जमीन मंजूर होऊनही प्रत्यक्ष ताब्यात न मिळणे, खराब रस्त्यांमुळे होणारे अपघात आणि पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर निर्माण होणारे प्रश्न याकडे त्यांनी लक्ष वेधले. या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी राजकारणात येत असल्याचे दिव्या मित्तल यांनी म्हटले. आजच्या विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राजकारणात केवळ नेता बदलण्याऐवजी राजकारण करण्याची पद्धत बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. उत्तर प्रदेश ही आपली कर्मभूमी असून तेथूनच या नव्या प्रवासाची सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
View this post on Instagram
भाजपा नेत्यांवर साधला निशाणा
व्हिडीओमध्ये दिव्या मित्तल यांनी केणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही. पण त्यांनी भाजप सदस्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. राहुल गांधींना भेटल्यानंतर दिव्या मित्तलने राजीनामा दिला होता, असा भाजप नेते प्रशांत उमराव यांनी आरोप केला होता. इतर अनेक भाजप समर्थकांनीही दिव्या यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, जर त्यांनी राजकारणात प्रवेश केला तर जुनी भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येतील. मित्तल यांनी यावरही प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या की, एका प्रमुख पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने लिहिले आहे की, त्या दुसऱ्या प्रमुख पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याला भेटल्या होत्या. वास्तविक पाहता, ती भेट कधीच झाली नव्हती. हे लिहिणाऱ्यालाही माहीत होते.
सत्य मांडायचे नव्हते तर त्यांचा हेतू फक्त मला घाबरवण्याचा होता. प्रश्न विचारायला पुढे आलेल्या स्त्रीला पहिल्याच दिवशी घाबरवले जाते. हे लोक हेच करतात. एफआयआर दाखल करून कोणालातरी घाबरवणे, ट्रोल करणे, जेणेकरून सामान्य आणि चांगले लोक राजकारणात येऊ नयेत आणि त्यांचे राजकारण असेच चालू राहावे, असा टोला मित्तल यांनी लगावला. मी घाबरणार नाही, मी फक्त प्रश्न विचारेन. जेणेकरून एक लहान मुलगी तिच्या मनातील प्रश्न विचारू शकेल आणि तिला रात्रीच्या अंधाराची भीती वाटू नये, असेही मित्तल यांनी सांगितले.
कोण आहेत दिव्या मित्तल
दिव्या मित्तल या 2013 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांनी IIT दिल्लीमधून शिक्षण घेतले असून IIM बंगळुरूमधून MBA केले आहे. IAS होण्यापूर्वी त्यांनी लंडनमध्ये फायनान्स क्षेत्रात काम केले. प्रशासकीय सेवेत त्यांनी संत कबीर नगर आणि मिर्झापूरच्या जिल्हाधिकारी म्हणून काम केले. तसेच गोंडा येथे मुख्य विकास अधिकारी, उत्तर प्रदेश राज्य औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि बरेली विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली. 31 ऑगस्ट रोजी त्यांनी राजीनामा दिला होता. आता त्या कोणत्याही पक्षात प्रवेश न करता जनतेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

























































