10 ऑक्टोबरच्या आंदोलनाला झुरळांना अद्यापि परवानगी नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जंतर मंतरवर शुक्रवार, 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्याइ काॅक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाला अद्याप परवानगी मिळालेली नाही. मात्र, सीजेपी आंदोलनावर ठाम असून देशातील अन्य विद्यार्थी संघटनांनीही त्यास पाठिंबा जाहीर केला आहे. ‘हे आंदोलन फक्त घोटाळेबाज ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊन थांबणार नाही. निवडणूक प्रक्रियेत पूर्ण सुधारणा होईपर्यंत ते सुरू राहील,’ असे सीजेपीने आज स्पष्ट केले.

सीजेपीसह सर्व विद्यार्थी संघटनांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची माहिती दिली. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, आम आदमी पक्ष विद्यार्थी संघटना, असोसिएशन ऑफ स्टुडंट्स फॉर अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स या संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. ‘हा लढा सोपा नाही. तो प्रदीर्घ काळ चालू शकतो. त्यासाठी तयारी करा. रेल्वे आणि विमानाची तिकिटे बुक करा, असे आवाहन सीजेपीचे सह-संयोजक सौरव दास यांनी विद्यार्थ्यांना केले. दिल्ली पोलिसांना आम्ही आंदोलनाची रीतसर सूचना दिली आहे. पोलीस आम्हाला सहकार्य करतील, अशी अपेक्षा दास यांनी व्यक्त केली.

‘या’ मागण्यांवर तडजोड नाही!

  • ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करा.
  • एसआयआर स्थगित करून त्यासंबंधी स्वतंत्र चौकशी करा. आगामी निवडणुका पुढे ढकला.
  • जानेवारी 2025 ची मतदार यादी पूर्ववत करा.
  • निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचा 2023 चा कायदा रद्द करून विश्वासार्ह निवड प्रक्रिया लागू करा.

इंडिया आघाडीच्या आंदोलनाला पाठिंबा

‘इंडिया’ आघाडीच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. ‘विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि विरोधकांच्या निदर्शनांचा उद्देश एकच आहे. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. हिंदुस्थानी जनता विरुद्ध भाजप असा हा संघर्ष आहे, असे आयसाच्या अध्यक्ष नेहा बोरा यांनी स्पष्ट केले.

बंगळुरूत आज ‘चप्पल’ दाखवणार

बंगळुरू येथील फ्रीडम पार्कमध्ये गुरुवारी सीजेपी ‘चप्पल’ आंदोलन करणार आहे. सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन होईल. सुरुवातीला एसआयआरवर ‘लोक अदालत’ होईल. त्यानंतर चप्पल आंदोलन होईल. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, सह-संयोजक सौरव दास आणि प्रवत्ते आशुतोष रांका यांच्यासह अभिनेते प्रकाश राज आंदोलनात सहभागी होणार आहेत.