
>> अमोल पालेकर
दीड दिवसापूर्वीच त्याचा फोन आला होता… माझ्या नवीन नाटकाच्या प्रयोगाला येऊ शकलो नाही म्हणून पुढच्या प्रयोगाला नक्की येईन रे, असे हक्काने सांगणारा माझा धाकटा भाऊ आज अचानक निघून गेला. या धक्क्यातून मी अजूनही सावरू शकलेलो नाही. सकाळी बातमी कळाली तेव्हा संपूर्ण शरीर सुन्न झाले. अत्यंत बलदंड, रोज नियमित व्यायाम करणारा आणि तब्येतीची काटेकोर काळजी घेणारा माणूस इतक्या अचानक आपल्यातून निघून जाईल, यावर मन विश्वासच ठेवायला तयार नाही.
नानाची आणि माझी ओळख, आमची घट्ट दोस्ती कित्येक दशकांची होती. छबिलदासच्या प्रायोगिक रंगभूमीवर जेव्हा नाना ‘पाहिजे जातीचे’ हे नाटक करत होता, तेव्हा मी त्याला पहिल्यांदा काम करताना पाहिले. तिथून सुरू झालेली आमची मैत्री नंतर प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिराच्या पायऱयांवर तासन्तास गप्पा मारण्यापर्यंत बहरत गेली. तो सगळा काळ आजही माझ्या डोळय़ांसमोर जशाच्या तसा उभा राहतो.
नाना हा केवळ मोठा नट नव्हता, तर तो एक अतिशय गुणी आणि स्वतःला सतत तासत राहणारा कलावंत होता. प्रत्येक भूमिकेत काहीतरी नवीन शोधण्याची त्याची धडपड असायची. अभिनयाच्या पलीकडे जाऊन विचार केला, तर तो मनाचा अत्यंत दिलदार आणि श्रीमंत माणूस होता.
माझा चित्रपट ‘थोडासा रुमानी हो जाये’ या चित्रपटात त्याने अक्षरशः माझ्याशी भांडून ती भूमिका स्वतःहून मागून घेतली होती. त्यानंतर ज्या तळमळीने, निष्ठेने आणि चिकाटीने त्याने स्वतःला अंतर्बाह्य बदलले, ते काम खरोखर अविस्मरणीय होते. मी जेव्हा जेव्हा हाक मारली, तेव्हा नाना माझ्या पाठीशी एखाद्या धाकटय़ा भावासारखा ठामपणे उभा राहिला.
त्याचा स्वभाव इतका आपुलकीचा होता की, फोन केला की ‘राम राम’ने सुरुवात करायचा आणि बोलणे संपताना ‘दुरूनच पाया पडतो रे’ असे हक्काने म्हणायचा. माझ्या ‘ऐवज’ या आत्मकथनाच्या प्रकाशन सोहळय़ाला तो स्वतः उपस्थित होता. संपूर्ण पुस्तक नीट वाचून त्याने फोनवरून भरभरून दाद दिली होती आणि शेवटी तोच आपुलकीचा निरोप घेतला होता.
माझ्यासारख्याचे जाणे लोक समजू शकतात; पण इतका तंदुरुस्त माणूस असा अकस्मात जावा, हे मनाला पटतच नाही. तो निघून गेल्याने मी आतून पूर्णपणे तुटल्यासारखा झालो आहे.





























































