
>> सोनाली कुलकर्णी
नाना सरांबद्दल आज सकाळी ऐकलं आणि अजूनही काहीच समजत नाही. ही बातमी आतपर्यंत पोचली आहे, असे अजूनही वाटत नाही. नानांसोबत मी तीन चित्रपट केले. ‘टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह’, ‘देऊळ’ आणि ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे.’ नाना सहकलाकारांना प्रचंड ऊर्जा देणारे कलाकार होते. छोटय़ा छोट्या गोष्टींवरून आमचे मस्त वाद व्हायचे, भरपूर भांडणं व्हायची. आमची काही तर आयकॉनिक भांडणं होती. पण आज त्या भांडणांची आठवण झाली तरी हसू येतं. कारण त्या सगळय़ांच्या पलीकडे नानांचे जे माझ्यावर जे उदंड प्रेम केलं, ते इतकं मोठं होतं की ती भांडणं कुठेच टिकत नाहीत. नानांचे माणसांवर प्रचंड प्रेम होतं. साहित्यावर प्रेम होतं. आणि जगातल्या प्रत्येक शेतकऱयावर प्रेम होतं. त्यांच्यात एक विलक्षण माणूस होता. त्यांचा एक आवडता प्रश्न होता-‘काय वाचतीयस सध्या?’ आणि त्यांना टीव्ही सीरियल्स बघण्याचंही एक वेड होतं. त्यांना स्वयंपाक करायलाही आवडायचे.
मी पहिल्यांदा त्यांना लांबून पाहिलं होतं, डॉ. जब्बार पटेल एका डॉक्युमेंटरीचं शूटिंग करत होते-कुसुमाग्रजांवरची. त्यात नाना ‘ओथेल्लो’ साकारत होते. त्या शूटिंगला मी एनसीपीएमध्ये उपस्थित होते. तेव्हा लांबून पाहिलेला तो कलाकार पुढे माझ्या आयुष्यातला इतका जवळचा माणूस होईल, असं वाटलं नव्हतं. मी त्यांना विचारलं होतं-लोक म्हणतात तुम्ही तापट आहात, शिव्या देता, खरंच का? ते म्हणाले, ‘मी जेव्हा लहान होतो तेव्हा हिंदी इंडस्ट्रीमध्ये नाव कमवताना माझ्याकडे रूप नव्हतं, नाव नव्हतं, कुटुंबाची पार्श्वभूमी नव्हती. मी एका सामान्य मराठी कुटुंबातून आलेला माणूस होतो. मग या सगळय़ांच्या समोर कसा टिकणार? लोक फिल्मी वागायचे. त्यांच्यासमोर टिकून राहायचं असेल तर मला स्वतःभोवती काही आवरणं तयार करावी लागली असतील.’ कदाचित तीच आवरणं होती.
मला असं वाटतं की, नानांनी आयुष्यात खूप टीका सहन केली. त्यांच्यावर चिडण्याचे, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्याचे अनेक मुद्दे आपल्याला मिळाले. पण त्यांनी जगावर जे प्रेम केलं, माणसांवर जे प्रेम केलं, त्यांच्यात दातृत्व होतं. त्याचं कौतुक पदरात पाडून घेतलं नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या प्रेमाची, आपल्या मायेची, आपल्या चांगुलपणाची परतफेड कधी मागितली नाही.
नाना, तुम्ही गेलात, पण तुम्ही केलेलं प्रेम, उभं केलेलं काम आणि माणसांमध्ये पेरलेली माणुसकी कधीच जाणार नाही.





























































