
>> प्रा. समीर जाधव [email protected]
संगीत, नृत्य, नाटय़ात्मकता या त्रिवेणी संगमातून सादर होणारी रामदासी कीर्तन पद्धती, संगीत, नृत्य व नाटय़ाची आवड असणाऱया तंजावर प्रदेशात मूळ धरून फोफावू लागली.
‘समर्थ संप्रदायाची ग्रंथसंपदा’ या मागील लेखात तंजावरमधील रामदासी संप्रदायातील कवींनी निर्माण केलेल्या अफाट ग्रंथसंपदेचा आढावा घेतला. आजच्या लेखात तंजावरमधील रामदासी कीर्तन परंपरेचा आढावा घेऊ. व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावरमध्ये मराठा सत्तेची स्थापना केल्यानंतर काही काळातच संत रामदासांनी तंजावर येथे मठाची स्थापना करून रामोपासनेची मुहूर्तमेढ रोवली. समर्थ संप्रदायाच्या सर्वच मठाधिपतींनी रामोपासनेच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी ‘कीर्तने’ सादर करण्यास सुरुवात केली. स्वतः समर्थांनी आपल्या कीर्तनात शास्त्राrय संगीत, गायन, नृत्य व नाटय़ या कलेच्या अंगांना स्थान दिले. ते स्वत संगीताचे मोठे जाणकार असल्यामुळे आपले कीर्तन संगीतप्रधान करण्याची त्यांना आवड होती व तशी त्यांची भूमिका होती. समर्थांनी संगीताबरोबरच कीर्तनाचे विषय, कीर्तनकाराविषयी अपेक्षा, श्रोता, कीर्तनाचा पूर्वरंग व उत्तररंग असा दोन भागांचा आकृतीबंध यासंबंधी मार्गदर्शन केलेले आहे. त्यामुळे संगीत, नृत्य, नाटय़ात्मकता या त्रिवेणी संगमातून सादर होणारी रामदासी कीर्तन पद्धती, संगीत, नृत्य व नाटय़ाची आवड असणाऱया तंजावर प्रदेशात मूळ धरून फोफावू लागली.
सुरुवातीच्या कालखंडात तंजावरकडे रामनवमीच्या काळात बालकांडावरील आख्याने, हनुमान जयंतीला हनुमान जन्म आणि दासनवमीला समर्थ चरित्रातील निर्वाणाचा भाग अशी कीर्तनोपयोगी आख्याने सादर केली जात होती. रामनवमीच्या नऊ दिवसांत बालकांडावरील 1) वाल्मीक चरित्र 2) दशरथप्रताप 3) दशरथ विवाह 4) श्रावण वध 5) ऋष्यशृंग मुनी 6) पायस वाटण 7) डोहाळे 8) वंशावळी 9) रामजन्म व 10 व्या दिवशी सीता कल्याण म्हणजे सीता स्वयंवर ही आख्याने रामनवमीच्या 10 दिवसांत सादर केली जात होती. इतर प्रसंगी क्षेत्र महात्म्य हादेखील आख्यानाचा विषय असायचा. महाराष्ट्रात मंगलाचरण, पूर्वरंग व उत्तररंग अशा तीन भागामधे रामदासी कीर्तन सादर होते. तर तंजावरला रामदासी मठामध्ये कीर्तनकार प्रारंभी समर्थांचे पाच अभंग म्हणतात. याला पंचपदी म्हणतात. म्हणजे पंचपदी, पूर्वरंग, उत्तररंग असे तंजावरी कीर्तनाचे स्वरूप आहे. दक्षिण भारतात कीर्तनाला हरिकथा, कालक्षेपम् या नावाने संबोधिले जाते. परमेश्वराच्या गुणगौरवाच्या कथा ऐकण्यात किंवा सांगण्यात वेळ घालविणे म्हणजे कालक्षेपम्. कथाकालक्षेपम या कीर्तन प्रकारात मनोरंजनात्मक शैलीत गायन, वादन, नृत्य, नाटय़ म्हणजे सोंगे सादर करणे इत्यादींची जोड देऊन आख्यान व निरूपण सादर केले जाते. हा प्रामुख्याने एकपात्री प्रयोग असतो व त्याला तबला, पेटी, टाळ इत्यादी वाद्यांची साथ असते. हरिकथा कालक्षेपम्मधे पंचपदी झाल्यावर निरूपणाला एखादा अभंग घेऊन त्या आधारे तत्त्व विवेचन करावयाचे व दुसऱया भागात कथेच्या आधारे तत्त्वाची पुष्टी करावयाची, पण निरूपणावर भर अधिक.
यात संगीताचा व अभिनयाचा उपयोग करावयाचा आणि मूळ मुद्दा श्रोत्यांच्या मानवर ठसवायचा. हरिकथा कालक्षेपम्मचे असेच दोन भाग असतात, त्याला तामीळमध्ये ‘तलाई’ म्हणजे शीर्षभाग व उरलेल्या भागाला ‘उदल’ असे म्हणतात. कीर्तनकाराला तामीळनाडूत भागवतार म्हणतात. भागवतारला संगीत येणे आवश्यक. संगीताचे अविभाज्य अंग म्हणजे ‘ताल.’ त्याशिवाय कथेत रंगच येत नाही. तंजावरकडे कीर्तनोपयोगी आख्यानकाव्ये ‘निरूपणात्मक आख्यान’ म्हणून ओळखली जातात. हा आख्यानप्रकार तंजावरकडे विशेषत्वाने समृद्ध पावला. तिकडील मंदिर संस्कृतीमुळे व तंजावरच्या भोसले घराण्यामुळे जे स्वत साहित्यरचनाकार व धार्मिक प्रवृत्तीचे होते, त्यांनी उदार मनाने सर्वच कलांना आश्रय व उत्तेजन दिल्यामुळे कीर्तनोपयोगी आख्यानकाव्ये निर्माण झाली. तंजावरमधील रामदासी मठाचे कार्य समर्थांच्या मार्गदर्शनानुसार व आखून दिलेल्या पद्धतीनुसार चालत असे आणि आजही ते तसेच चालते. या मठांच्या उद्दिष्टापैकी प्रमुख व महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे संप्रदायाबाहेरील जनसामान्यांना भक्तीच्या मार्गावर आणण्यासाठी सातत्याने हरिकथा सादर करावयाची.
भीमस्वामी शहापूरकर हे प्रख्यात कीर्तनकार होते व आपल्या कीर्तनातून प्रतापराजेंना रामरायाचा साक्षात्कार, रामरायाचे अस्तित्व त्यांनी दाखवून दिले होते. तेथूनच प्रतापराजे समर्थ संप्रदायाचे अनुयायी झालेत. हरिकथा सातत्याने सादर करण्यामुळे तामीळनाडू प्रांतात अन्यत्रही म्हणजे मठाव्यतिरिक्त इतर ठिकाणी हरिकथेचे सादरीकरण व्हावयास लागले व आज 350 वर्षांनंतरही ही हरिकथा सातत्याने सादर होतेच आहे. रामदासी कीर्तन पद्धतीतील मूळ आकृतीबंध कायम ठेवीत काही स्थानिक विशेषत्वांची जोड त्याला मिळत गेली. त्यामुळे रामदासी परंपरेत रूढ असलेला ‘कीर्तन’ हा शब्द मागे पडून ‘हरिकथा कालक्षेपम’ हे नाव तंजावरकडे रूढ झाले. श्रीकृष्ण भागवतारांना हिंदुस्थानी व कर्नाटकी रागदारीचे उत्तम ज्ञान होते. त्याचबरोबर संस्कृत, तेलगु, तामीळ, कन्नड, मराठी व हिंदी भाषा त्यांनी आत्मसात केल्या. भरतनाटय़म् व अभिनयकलेचे शिक्षण अप्पादुराई यांच्याकडून घेतले. अशा सर्व विद्या व भाषानिपुण होऊन त्यांनी आपल्या हरिकथेच्या कार्यक्रमात शील-अश्लीलतेच्या मर्यादांचे भान ठेवून, नृत्य व नाटय़ाभिनयाचा उपयोग ‘राधाकल्याणम’ या आपल्या कालक्षेपम्च्या पहिल्या प्रयोगात केला. तो खूपच लोकप्रिय व समाजमान्य झाल्यामुळे तामीळ प्रांतात ‘आधुनिक हरिकथेचे पितामह’ म्हणून श्रीकृष्णभागवतारांचा गौरव उल्लेख केला गेला आहे. समर्थ व भीमस्वामींपासून तंजावरने उचललेली ही कीर्तनाची वीणा तंजावरी भागवतारांनी व रामदासी मठपतींनी आजदेखील खाली ठेवलेली नाही.
(या लेखातील काही अंश हा ‘कावेरी खोऱयातील समर्थ संप्रदाय’ या पुस्तकातील आहे.) (लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)




























































