
<< बी. व्ही. जोंधळे
[email protected]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे 14 ऑक्टोबर, 1956 रोजी घेतलेल्या बौद्ध धम्मदीक्षेस यंदा 70 वर्षे पूर्ण झाली. धम्मचक्र परिवर्तन दिन 20 ऑक्टोबर रोजी आहे. त्यानिमित्त…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा दाहक अनुभव त्यांच्या बालवयातच घेतला होता. बहिष्कृतांची मानखंडना, त्यांचे हीन-दीन लाचार जिणे तर ते आयुष्यभर पाहत आले. म्हणूनच ज्या हिंदू धर्म रूढी-प्रथा-परंपरेने अस्पृश्यांना जनावरापेक्षाही हीन दर्जाची वागणूक दिली, त्या अमानुष प्रथा-परंपरांविरोधी बंड करून सामाजिक समतेचा पुरस्कार करणारे लढेसुद्धा त्यांनी उभारले. हिंदू धर्मशास्त्राची परखड नि बुद्धिनिष्ठ चिकित्सा करताना त्यांनी हिंदू धर्मग्रंथांवर कठोर वैचारिक हल्लेसुद्धा केले, पण हे सारे करताना हिंदू समाजाविषयी त्यांच्या मनात द्वेष नव्हता, तर अस्पृश्यांना मानवतेचे हक्क – माणुसकी नाकारणाऱ्या प्रथा, परंपरांवर राग होता.
आम्ही जर हिंदू आहोत तर आम्हाला सर्वांसारखीच बरोबरीची वागणूक मिळावी हे सिद्ध करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या महाडच्या चवदार तळ्यावर पाण्यास स्पर्श करून पाणी पिण्याचा सत्याग्रह मार्च 1927 मध्ये केला, त्या महाड सत्याग्रही लढय़ाचे सध्या शताब्दी वर्ष सुरू आहे (2026-27). स्त्राr-शूद्रांचा उपमर्द करणाऱ्या मनुस्मृतीचे दहनसुद्धा महाड सत्याग्रहाच्या वेळीच बाबासाहेबांनी महाड मुक्कामी केले होते. पुढे 1930 मध्ये समतेच्या प्रस्थापनेसाठीच त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रहसुद्धा केला; पण या दोन्ही सत्याग्रहांच्या वेळी सवर्ण समाज धर्ममार्तंडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व अस्पृश्य बांधवांची गळाभेट न घेता त्यांचे स्वागत दगडधोंड्यांनी केले. अस्पृश्यांना पोटाशी न कवटाळता त्यांना अमानुष मारहाण करून त्यांच्या अन्नात माती कालविली. महाड व नाशिकच्या दीर्घ सत्याग्रही लढ्यानंतर बाबासाहेबांना हे कळून चुकले की, सनातनी हिंदू धर्म व प्रथा-परंपरांच्या भिंतीवर सामाजिक न्यायाची मागणी करण्यासाठी डोके आपटून घेण्यात काही फायदा नाही. हे जाणूनच 1935 साली येवला मुक्कामी त्यांनी धर्मांतराची घोषणा करताना निक्षून सांगितले की, ‘‘मी जरी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही.’’ बाबासाहेबांनी आपली ही भीमप्रतिज्ञा खरी करून दाखविताना 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर मुक्कामी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बुद्ध धम्माचा स्वीकार केला. बाबासाहेबांनी 1935 साली धर्मांतराची घोषणा करून प्रत्यक्षात ते स्वप्न 21 वर्षांनी 1956 साली साकार केले.
बाबासाहेब तथागतांच्या विचाराने इतके झपाटले होते की, त्यांनी कसलाही गाजावाजा न करता बुद्ध तत्त्वज्ञानाचा भारतीय संविधानात अंतर्भाव केला. संविधानाच्या प्रिअॅम्बलमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या तत्त्वत्रयींचा त्यांनी समावेश केला तो बुद्ध विचारातूनच! 15 ऑगस्ट 1947 ला देश जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा देशाचे नाव हिंदुस्थान ठेवावे, अशी एक मागणी पुढे आली होती. असे जर झाले असते तर देशातील अन्य धर्मीयांना दुय्यम स्थानी राहावे लागले असते. देशात अलगतावाद प्रबळ झाला असता. बाबासाहेबांनी म्हणूनच घटनेच्या कलम नंबर 1 अन्वये देशास ‘भारत’ हे नाव दिले. बाबासाहेबांनी बुद्ध तत्त्वज्ञानाशी सुसंगत असे संविधान लिहिताना देशाचा जो राष्ट्रध्वज स्वीकारला तो तिरंगा. राष्ट्रध्वजातील भगवा रंग म्हणजे ‘भंतेजींचे चीवर’, पांढरा रंग म्हणजे ‘अत्त दीप भव’ आणि ‘हिरवा रंग’ म्हणजे समृद्धीचे द्योतक. राष्ट्रध्वजावरील अशोकचक्र, कमळ हे राष्ट्रीय फूल, राजमुद्रेसाठी अशोकाचे चार सिंह, लोकसभेच्या सभागृहाला दिलेले ‘अशोका हॉल’ हे नाव, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या बैठकीच्या स्थानामागे कोरलेल्या धम्मपदातील गाथा ही सारी प्रतीके त्यांनी बुद्ध धम्मातून घेतली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाला दिलेल्या बुद्ध धम्मामुळे धर्मांतरित बौद्ध समाजाचे आत्मभान जागे झाले. अंधश्रद्धा, कर्मकांडांचा त्याने त्याग केला. बौद्ध समाजाची प्रगती केवळ आरक्षणामुळे झाली नाही, तर शिक्षणाबरोबरच मानवी प्रगतीच्या आड येणाऱ्या प्रथा, परंपरा, अंधश्रद्धेस त्याने नकार दिल्यामुळे झाली हे नाकारता येत नाही. पण प्रश्न असा आहे की, सनातनी हिंदू मानसिकतेवर बाबासाहेबांच्या बुद्ध धम्म स्वीकाराचा काही सकारात्मक इष्ट परिणाम झाला काय? दलित, शोषित, पीडित व बौद्ध समाजाकडे बघण्याची जातीय मनोवृत्ती बदलली आहे काय? तर ती बदलली आहे, असे म्हणता येत नाही.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अडीच हजार वर्षांपूर्वी भारतातच जन्मून लोप पावलेल्या बुद्ध धम्माचे चक्र 70 वर्षांपूर्वी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर मुक्कामी फिरवून गतिमान केले. स्त्री-शूद्र अतिशूद्रांच्या मुक्तीसाठी संघर्ष छेडणाऱ्या महात्मा जोतिबा फुलेंचे यंदा द्विशताब्दी जन्मवर्ष साजरे होत आहे आणि याचबरोबर सामाजिक समतेच्या प्रस्थापनेसाठी महाडच्या चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाचेसुद्धा शताब्दी वर्ष सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्म स्वीकार, राजर्षी शाहू महाराजांची कृतिशील सामाजिक परिवर्तनाची दृष्टी, म. फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री- शूद्रांच्या मुक्तीसाठी केलेले संघर्ष हा साराच इतिहास सामाजिक समतेच्या संदर्भात प्रेरणादायी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेनिमित्त या सर्वच सामाजिक समतेच्या लढ्यांचे पुनः पुन्हा स्मरण करून सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या मानवी मूल्यांच्या कटिबद्धतेसाठी आपण सर्वच जण प्रयत्नशील होऊ या हाच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा संदेश ठरावा, असे वाटते.
बुद्ध धम्माचा प्रभाव
बाबासाहेबांच्या मनावर बुद्ध धम्माचा प्रभाव फार पूर्वीच पडला होता. त्यांनी म्हणूनच 1945 मध्ये स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुंबईतील महाविद्यालयाचे नाव ‘सिद्धार्थ महाविद्यालय’ असे ठेवले. धम्मविचारांची पाठराखण करण्यासाठी त्यांनी संस्थेचे ब्रीदवाक्य ठेवले ते ‘प्रज्ञा – शील – करुणा’. छत्रपती संभाजीनगरच्या महाविद्यालयाचे नाव त्यांनी मिलिंद महाविद्यालय ठेवले, तर परिसराला ‘नागसेनवन’ असे नाव दिले. शिवाय पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे बोधचिन्ह स्वीकारले ते सम्राट अशोकाने अनुप्रवर्तित केलेल्या धम्मचक्राचे. बाबासाहेबांनी विकत घेतलेल्या ‘मेनकावा’ या इमारतीचे नाव त्यांनी ‘बुद्धभवन’ तर ‘अल्बर्ट बिल्डिंग’चे नामांतर त्यांनी ‘आनंद भवन’ केले. त्यांनी स्वतःच्या मुद्रणालयास ‘बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस’ असे नाव दिले. धर्मांतरापूर्वीच त्यांनी बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. बाबासाहेबांच्या धम्म प्रवासातील या साऱ्या घटना म्हणजे आपण बुद्ध धम्म स्वीकारणार आहोत याची त्यांनी दिलेली पावतीच होती.

























































