
<< जी. के. पवार
शेअर बाजारात पैसे गुंतवताना सर्वाधिक चर्चा होते ती वाढणाऱ्या भावांची, मिळणाऱ्या नफ्याची आणि योग्य संधीची. मात्र या सगळ्यामागे आवश्यक असलेली अभ्यासाची तयारी, निर्णयातील संयम आणि स्वतच्या भावनांवरील नियंत्रण अनेकदा दुर्लक्षित राहते. डॉ. सुधीर राशिंगकर यांचे ‘बेंजामिन ग्रॅहम आणि वॉरन बफे यांचे गुंतवणूक मंत्र‘ हे पुस्तक गुंतवणुकीच्या याच मूलभूत बाजूंकडे वाचकाचे लक्ष वेधते. दोन प्रभावशाली गुंतवणूक विचारवंतांच्या जीवनप्रवासाची आणि कार्यपद्धतीची मराठीतून ओळख करून देणे, हा पुस्तकाचा प्रमुख उद्देश आहे.
आठ प्रकरणांत विभागलेल्या या पुस्तकाची मांडणी चरित्र, तत्त्वज्ञान आणि व्यवहारातील उदाहरणे अशा तीन अंगांनी पुढे जाते. सुरुवातीच्या प्रकरणांत बेंजामिन ग्रॅहम यांचा जीवनप्रवास, त्यांची गुंतवणूक धोरणे आणि मूल्याधिष्ठित गुंतवणुकीची तत्त्वे येतात. त्यानंतर वॉरन बफे यांच्या वाटचालीचा, व्यवसाय निवडण्याच्या निकषांचा आणि व्यवस्थापनविषयक दृष्टिकोनाचा परिचय होतो. गुरू-शिष्यांच्या विचारांतील समान धागे आणि वेगळेपणा उलगडणारे प्रकरण या मांडणीला जोड देते, तर बफे यांच्या सामाजिक कार्यावरील शेवटचे प्रकरण पुस्तकाचा आशय अधिक व्यापक करते.
शेअरच्या किमतीमागे असलेला व्यवसाय समजून घेण्याचा आग्रह हे या पुस्तकाचे प्रमुख बलस्थान आहे. बाजारभाव आणि व्यवसायाचे वास्तविक मूल्य यांतील फरक, ‘मार्जिन ऑफ सेफ्टी‘, गुंतवणूक आणि सट्टेबाजी यांतील भेद अशा संकल्पना लेखकाने सोप्या शब्दांत समजावण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रॅहम यांची ‘मिस्टर मार्केट’ ही संकल्पना बाजारातील भावनिक चढउतार समजून घेण्यासाठी उपयोगी ठरते. ग्रॅहम आणि बफे यांच्या विचारांतील नाते हा पुस्तकातील विशेष लक्षवेधी भाग आहे. वास्तविक मूल्याच्या तुलनेत कमी किमतीत उपलब्ध असलेल्या व्यवसायांचा शोध घेण्यावर ग्रॅहम यांचा भर होता; तर उत्कृष्ट व्यवसाय योग्य किमतीत घेऊन दीर्घकाळ त्यात सहभागी राहण्याला बफे यांनी अधिक महत्त्व दिले, अशी भिन्नता लेखक मांडतो.
पुस्तकातील व्यावसायिक उदाहरणे तात्त्विक चर्चेला अनुभवाची जोड देतात. ‘नेब्रास्का फर्निचर मार्ट’च्या रोझ ब्लूमकिन यांची कथा, ‘सीज कॅण्डी’च्या माध्यमातून स्पष्ट केलेले ब्रॅण्डचे महत्त्व आणि भागधारकांना लिहिलेल्या पत्रांतील निवडक विचार यांमुळे वाचनात रस निर्माण होतो. प्रामाणिक व्यवस्थापन, ग्राहकांचा विश्वास, भांडवलाचा सुयोग्य वापर आणि व्यवसायाची दीर्घकालीन कमाईक्षमता यांचा विचार येथे येतो. त्यामुळे पुस्तकाचा काही भाग उद्योजक आणि व्यवस्थापनाचे विद्यार्थी यांनाही विचार करायला लावणारा आहे.
‘उदार मनाचा वॉरन बफे’ हे शेवटचे प्रकरण संपत्तीच्या सामाजिक उपयोगाची चर्चा करते. दानशूरता, शिक्षण, आरोग्य आणि समाजकल्याणासाठी संपत्ती वापरण्याच्या भूमिकेला लेखकाने स्थान दिले आहे. त्यामुळे आर्थिक यशाचे मोजमाप करताना सामाजिक जबाबदारीचाही विचार व्हावा, असा सूर पुस्तकात उमटतो.
बेंजामिन ग्रॅहम आणि वॉरन बफे यांचे गुंतवणूक मंत्र
लेखक ः डॉ. सुधीर राशिंगकर
प्रकाशक ः साकेत प्रकाशन
पृष्ठ संख्या ः 111
मूल्य ः 200 रु.




























































