कल्ट सिनेमा – अभिरुचीची नवी उतरंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सोहम पिंगळीकर, [email protected]

कल्ट कधी नाकारलेल्या चित्रपटाला प्रतिष्ठित कलेच्या जवळ आणतो, तर कधी त्याची कथित निकृष्टताच त्याच्या आकर्षणाचं कारण बनते. ही कल्ट संस्कृती प्रस्थापित अभिरुचीला आव्हान देत स्वतही अभिरुचीची नवी उतरंड निर्माण करू शकते.

‘ओम-दर-ब-दर’ म्हणजे ‘Indian Cinema on drugs’ असं या सिनेमाचं वर्णन केलं जातं. कमल स्वरूप यांनी 1988 मध्ये बनवलेल्या या सिनेमाला 1989 मध्ये फिल्मफेअरचा समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला. तरीही भारतात तो व्यावसायिक चित्रपटगृहांतून प्रदर्शित होण्यासाठी 2014 साल उजाडावं लागलं. एका बाजूला समीक्षकांची मान्यता, तर दुसऱया बाजूला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची मर्यादित संधी. पुढे हाच सिनेमा इंडी फिल्ममेकर्स आणि आर्ट हाऊस प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला आणि त्याला कल्ट क्लासिक म्हटलं जाऊ लागलं, पण नेमकं कशामुळे?

या सिनेमाची कथा सांगणं अवघड आहे. ओम या किशोरवयीन मुलाच्या आयुष्यातील विसंगत प्रसंगांचं कोलाज अशी त्याची रचना आहे. कथानकाला सुरुवात-मध्य-शेवट अशा सरळ रेषेत बांधण्याऐवजी विक्षिप्त कुटुंब, ताईचं प्रेम, रोजमेरी मार्लोचा शाप, विडंबनात्मक गाणी, हिऱयांनी भरलेले बूट, बेडूक पकडण्यासाठी सुरू असलेली धावाधाव आणि पौराणिक संदर्भ यांतून हा सिनेमा अतिवास्तववादी सृष्टी उभी करतो.

‘ओम-दर-ब-दर’ला सुरुवातीला व्यावसायिक चित्रपटगृहांतून प्रदर्शित होण्याची संधी मिळाली नाही तरी सीडी, व्हीसीडी, फिल्म फेस्टिव्हल्स आणि फिल्म क्लब्समधून तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहिला. पुढे इंटरनेटवरील चर्चा आणि नव्या पिढीतील चित्रपटकर्त्यांनी दिलेले संदर्भ यांमुळे त्याच्याकडे पुन्हा लक्ष गेलं. अनुराग कश्यपच्या देव डीमधील ‘इमोशनल अत्याचार’ या गाण्याच्या संदर्भात ‘ओम-दर-ब-दर’मधील ‘मेरी जान’चा उल्लेख केला जातो. अशा संदर्भांमुळे नव्या प्रेक्षकांना या तुलनेने अपरिचित चित्रपटापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळाला. मात्र, एखाद्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने चित्रपटाचा उल्लेख केला म्हणून त्याला कल्ट दर्जा मिळतो, असं नाही. चित्रपटाचा पुनर्शोध हा त्याच्या वैशिष्टय़ांइतकाच त्याला शोधणाऱया, प्रसारित करणाऱया आणि त्याचं महत्त्व इतरांपर्यंत पोहोचवणाऱया लोकांचाही प्रवास असतो.

हिंदी लोकप्रिय चित्रपटातील गाणी, कौटुंबिक मेलोड्रामा, प्रेमकथा आणि धार्मिक देखाव्यांसारख्या परिचित रूपांचा वापर करूनही ‘ओम-दर-ब-दर’ त्यांचे पारंपरिक अर्थ उलथवून टाकतो, पण प्रयोगशील असणं किंवा प्रेक्षकांना न समजणं, एवढय़ाने एखादा चित्रपट कल्ट होत नाही. अनेक दुर्बोध चित्रपट विस्मृतीत जातात. काही मोजक्यांच्याच भोवती प्रेक्षक पुन: पुन्हा परततात. ‘ओम-दर-ब-दर’च्या बाबतीत त्याची दुर्बोधता ही केवळ अडचण न राहता आकर्षणाचा भाग बनली. प्रत्येक दृश्याचा एकच निश्चित अर्थ न मिळाल्यामुळे त्याचं पुनर्वाचन शक्य होतं. हा सिनेमा केवळ कथेसाठी नव्हे, तर त्याच्या तंत्रासाठी, संकेतांसाठी आणि संदर्भांसाठीही पाहिला जाऊ लागला. त्यांचा अर्थ शोधणं आणि त्याविषयी इतरांशी चर्चा करणं हा चित्रपट पाहण्याच्या अनुभवाचाच भाग बनला. अशा प्रकारे चित्रपटाची वेगळी शैली आणि त्याच्याभोवती तयार होणारी प्रेक्षक-संस्कृती एकमेकांना बळ देतात. त्याच्या वैशिष्टय़ांमुळे प्रेक्षक आकर्षित होतात; तर प्रेक्षकांच्या चर्चांमुळे त्या वैशिष्टय़ांना नवं सांस्कृतिक मूल्य मिळतं.

इथे कल्ट सिनेमाचा एक विरोधाभास समोर येतो. ‘ओम-दर-ब-दर’सारखा चित्रपट मुख्य प्रवाहातील सिनेमाच्या प्रस्थापित निकषांना आव्हान देतो. व्यावसायिक यश, सहज समजणारं कथानक किंवा मोठा प्रेक्षक वर्ग यांनाच सिनेमाच्या महत्त्वाचे निकष मानण्याची गरज नाही, हे तो दाखवून देतो. या अर्थाने कल्ट सिनेमा प्रस्थापित चित्रपट-कॅननला पर्याय निर्माण करू शकतो. ज्या चित्रपटांना त्यांच्या काळात पुरेशी जागा मिळाली नाही, त्यांना नव्याने पाहण्याची संधी देऊ शकतो.

पण या पर्यायातूनच नवी उतरंड तयार होण्याची शक्यताही असते. कमल स्वरूप यांनी कला चित्रपटाच्या वर्तुळात व्यावसायिक सिनेमाकडे कमीपणाने पाहण्याच्या आणि चित्रपटांना ‘मासेस’ व ‘क्लासेस’ अशा विभागांत मांडण्याच्या वृत्तीवर टीका केली होती. ही टीका ‘ओम-दर-ब-दर’च्या कल्ट प्रतिष्ठेकडे पाहताना महत्त्वाची ठरते. दुर्बोध चित्रपट समजून घेण्याची क्षमता हीच श्रेष्ठ अभिरुचीची खूण मानली जाऊ लागली, तर सामान्य प्रेक्षक आणि जाणकार प्रेक्षक यांच्यात भेद निर्माण होऊ शकतो. मुख्य प्रवाहाला नाकारणारा चित्रपट मग स्वतच सांस्कृतिक प्रतिष्ठेचं प्रतीक बनतो. त्याचं कौतुक करणं हे केवळ चित्रपटाविषयीचं प्रेम न राहता आपण इतरांपेक्षा वेगळे आणि अधिक जाणकार आहोत, हे दाखवण्याचं साधनही बनू शकतं.

मग ‘ओम-दर-ब-दर’ कल्ट का झाला? याचं उत्तर त्याच्या अतर्क्य शैलीत आणि मुख्य प्रवाहातील संकेत मोडण्याच्या क्षमतेत आहे; पण त्याच्या वेगळेपणाला महत्त्व देणाऱया प्रेक्षकांनी, चित्रपटकर्त्यांनी आणि सांस्कृतिक वर्तुळांनी त्याचा स्वीकार करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र, कल्ट होण्यासाठी कलात्मक प्रतिष्ठा मिळवणं ही एकमेव वाट नाही.

सामान्य प्रेक्षकांना दुर्बोध वाटणारा ‘ओम-दर-ब-दर’ आर्ट हाऊसचा प्रेक्षक जवळ करतो; तर याच्या उलट, तथाकथित उच्चभ्रू अभिरुचीला टाकाऊ वाटणाऱया बी-ग्रेड सिनेमांभोवतीही कल्ट निर्माण होऊ शकतो. रामसे बंधूंच्या भयपटांचं उदाहरण यासाठी महत्त्वाचं आहे. ‘ओम-दर-ब-दर’च्या बाबतीत प्रयोगशीलता आणि दुर्बोधता कलात्मक प्रतिष्ठेची खूण बनू शकते; तर रामसे बंधूंच्या सिनेमांच्या बाबतीत प्रतिष्ठित अभिरुचीने नाकारलेली अतिरंजित शैली, स्वस्त निर्मिती मूल्यं आणि भयपटांचा भडकपणा हेच आकर्षणाचा भाग बनतात. एका बाबतीत नाकारलेल्या सिनेमाला कलात्मक प्रतिष्ठा मिळते, तर दुसऱया बाबतीत त्याला नाकारण्यास कारणीभूत ठरलेल्या गुणांचाच उत्सव साजरा होतो. तरी दोन्ही प्रकारच्या सिनेमांची आवड वैयक्तिक पसंतीपलीकडे जाऊन सांस्कृतिक ओळखीचा भाग बनू शकते – कधी प्रयोगशील सिनेमाची जाण असल्याचं प्रतीक म्हणून, तर कधी प्रस्थापित अभिरुचीच्या निकषांना धुडकावून लावण्याचा मार्ग म्हणून.

कल्ट संस्कृती प्रस्थापित अभिरुचीला आव्हान देते; पण त्याच वेळी स्वतचे संदर्भ, आवडी आणि प्रतिष्ठेची चिन्हंही निर्माण करते. ‘ओम-दर-ब-दर’ आणि रामसे बंधूंच्या सिनेमांमधील विरोधाभास हेच दाखवतो : कल्ट कधी नाकारलेल्या चित्रपटाला प्रतिष्ठित कलेच्या जवळ आणतो, तर कधी त्याची कथित निकृष्टताच त्याच्या आकर्षणाचं कारण बनते. त्यामुळे कल्ट सिनेमा केवळ चित्रपटाची किंमत कोण ठरवतं आणि कोणत्या निकषांवर ठरवतं? हा प्रश्न उपस्थित करत नाही; तो स्वतही अभिरुचीची नवी उतरंड निर्माण करू शकतो.