
<< वर्णिका काकडे
मावळी बोलीभाषा ही महाराष्ट्रातील पुणे जिह्यातील मावळ प्रदेशात आणि घाटमाथ्यावरील काही परिसरात बोलली जाणारी मराठी भाषेची एक महत्त्वाची उपबोली आहे. ही बोली प्रामुख्याने पुणे जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे यांसारख्या तालुक्यांमध्ये आणि घाटमाथ्यावरील आदिवासी व स्थानिक भागांत बोलली जाते.
या बोलीवर डांगणी प्रभाव दिसून येतो. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि अकोले यांसारख्या परिसरातील आदिवासी भागांत बोलली जाणाऱ्या ‘डांगाणी’ बोलीभाषेत मावळी बोलीचे बरेच साम्य आढळते. या भाषेच्या लहेजा आणि स्वरूपात वैविध्य दिसून येते. ही भाषा अत्यंत रुबाबदार, खडबडीत पण आदरयुक्त लहेज्मयाची मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैनिकांच्या (मावळे) काळात या बोलीभाषेला आणि या प्रदेशाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले होते. या बोलीला ऐतिहासिक वारसा आहे. जुन्या काळात या भागातील बहुजन समाजात ही बोली मोठ्या प्रमाणावर बोलली जात असे.
महाराष्ट्रात सुमारे साठहून अधिक बोलीभाषा बोलल्या जातात. त्यातील सुमारे वीस बोली भाषा या मराठी आणि तिच्या विविध रुपाशी संबंधित आहेत. तर इतर चाळीस बोलीभाषा या भटके, विमुक्त, आणि आदिवासी व इतर समाजाशी संबंधित आहेत. असे निरीक्षण अलिकडे ‘पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया’ने केलेल्या पहाणीत नोंदवले आहे.
1961 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील बोलींची संख्या 65 इतकी आहे. मात्र ही संख्या 75च्या पुढे जाऊ शकते. कोकणीच्या सुमारे 20 बोली आढळतात, तर भिल्ली भाषेच्या 36 बोली समजल्या जातात. खानदेशात जवळजवळ 21 बोलीभाषा आढळतात. या सर्व बोलींवर अहिराणीचा पगडा जाणवतो. वरील सर्व आकडे काटेकोर नसून सर्वसाधारण आहेत. महाराष्ट्रात 47 आदिवासी जमाती असून त्यांच्या स्वतंत्र बोलीभाषा आहेत. 25टक्के आदिवासी भाषा मराठीला जवळच्या बोलीभाषा आहेत. त्या मराठी माणसाला ऐकून समजतात. खरं तर सर्व प्रकारच्या बोली या स्वतंत्र भाषाच आहेत. बोली व भाषा हे वर्गीकरण योग्य नव्हे. डांगी, पावरी, राठवी, वंजारी, वडारी, गोंडी, कोरकू, कोलामी, बंजारा, मथवाडी, झाडी, ठाकरांची खिवारी, या बोली सर्वसामान्य मराठी माणसाला समजायला अवघड वाटतात.
(लेखक ज्येष्ठ विचारवंत आहेत)




























































