पुन्हा गांधी सत्याग्रह; 1 नोव्हेंबरला मुंबईत हातात तिरंगा आणि संविधान घेऊन पदयात्रा काढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवून ‘लोकशाही वाचवा’ या मागणीसाठी देशभरातील जनता रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीही 1 नोव्हेंबर रोजी हातात तिरंगा आणि संविधान घेऊन पदयात्रा काढत सत्याग्रह करण्याची घोषणा केली आहे.

मतचोरी आणि एसआयआर प्रक्रियेतील गोंधळावरून देशभरात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात सुरू असलेली आंदोलने पोलीस बळाचा वापर करून दडपण्याचे प्रयत्न केंद्रातील सत्ताधारी भाजपकडून सुरू आहेत. गेल्या आठवडय़ात ऑगस्ट क्रांती मैदानावरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना तुषार गांधी यांना ताब्यात घेण्यात आले होते. तुषार गांधी यांनी पुन्हा एकदा 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता महापालिका मुख्यालय ते मंत्रालय असा सत्याग्रह करण्याची घोषणा ‘एक्स’ पोस्ट करत केली आहे. हा आपला वैयक्तिक सत्याग्रह असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पोलीस परवानगी मागणार नाही

मला ठाऊक आहे की हा एक प्रतिबंधित परिसर आहे, परंतु मला असे नियम मान्य नाहीत. मी कोणतीही परवानगी मागत नाही; सविनय कायदेभंग करताना परवानगी मागितली जात नाही, अशी एक पोस्ट करत तुषार गांधी यांनी या आधीच या आंदोलनाला पोलीस परवानगी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती सरकारविरुद्ध आंदोलन करते, तेव्हा तिने सरकार जिथे आहे तिथेच आंदोलन केले पाहिजे. ज्यांना असे वाटते की लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी लढा देणे आवश्यक आहे, त्यांचे स्वागत आहे.

महापालिका मुख्यालय ते मंत्रालय

  • या पदयात्रेला महापालिका मुख्यालयासमोरील फिरोजशहा मेहता यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होईल.
  • हुतात्मा चौकातून पुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जाईल.
  • तिथून पुढे पंडित नेहरूंच्या पुतळा आणि शेवटी मंत्रालयाशेजारील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी पदयात्रा संपेल.