>> गुरुनाथ तेंडुलकर
अर्जुन आपला हेका सोडणार नाही हे भगवान श्रीकृष्णांनी जाणलं. ज्या वेळी एखादी व्यक्ती डोळ्यांवर रंगीत चष्मा लावून जगाकडे पाहते त्या वेळी त्या व्यक्तीला सगळं जग त्याच रंगाचं दिसतं. दोष जगाचा नसतो. दोष त्या माणसाचाही नसतो. दोष रंगीत चष्म्याचाही नसतो. दोष कुणाचाच नसतो तरीही त्या माणसाला जग त्या विशिष्ट रंगाचंच आहे असं वाटतं. इथे अर्जुनानेदेखील एक रंगीत चष्मा डोळ्यांवर चढवला आहे आणि गमतीची गोष्ट अशी की, आपल्या डोळ्यांवर रंगीत चष्मा आहे याची त्याला जाणीवच नाही.
आपण सर्वसामान्य माणसंदेखील जीवनात असेच वागतो. आपल्यावर अनेक वर्षांचे अनेक पिढय़ांचे संस्कार झालेले असतात. आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून, समाजाकडून, नाटक-सिनेमांतून, कथा-कादंबऱयांसारख्या वेगवेगळ्या साहित्यातून आपल्या मनाची एक विशिष्ट घडण घडत असते. ही घडण म्हणजे एक रंगीत चष्माच असतो. या चष्म्यातून आपण जगातील सर्व घटनांकडे पाहतो आणि आपापल्या कुवतीनुसार त्या घटनांचे संदर्भ जाणण्याचा प्रयत्न करून अर्थ काढतो. त्यानुसारच आपलं वर्तन घडतं. ते वर्तन चूक आहे की बरोबर, याचा तार्किक विचारदेखील न करता आपणच कसे बरोबर आहोत, हे आपण स्वतलाच समजावतो. कुणी विरोध केला किंवा वेगळं मत मांडलं तर “तो मूर्ख आहे. त्याला काही कळत नाही’’ असं म्हणतो. निदान मनातल्या मनात तरी…
इथे कुरुक्षेत्रावर उपस्थित सैन्यातील आप्तेष्ट, सगेसोयरे, बंधु-बांधवांना पाहून अर्जुनाचा अचानक शक्तिपात झाला. त्याचं पौरुष्य हरवलं. त्याचं मूळचं क्षात्रतेज लोप पावलं. तो नपुंसक झाला. नामर्द झाला. अनेकांना ‘अर्जुन नपुंसक झाला, नामर्द झाला’ हे विधान आवडणार नाही, पण वस्तुस्थिती तशीच आहे. दुसऱया अध्यायातील तिसरा श्लोक आपण पुन्हा जाणून घेऊ या.
क्लैब्यं मा स्म गम पार्थ न एतत् उपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप ।। 2-3 ।।
जिज्ञासू वाचकांसाठी या श्लोकाचा मराठी वामन पंडितांचा समश्लोक, मोरोपंतांची आर्या आणि तुकाराम महाराजांची ओवी सांगतो…
पार्था षंढ नको होऊं तुज योग्यचि हे नव्हे ।
उठ टाकूनिया तुच्छ लंडीपण परंतपा ।। ( समश्लोकी)
उचित क्लीब्यत्व नव्हे निजशौर्याची नको करूं तूट ।
क्षुद्र मनोदौबल्या त्यजुनी पार्था परंतपा उठ ( आर्या )
नपुंसकपण न धरी मनी । तुज योग्य नव्हे जाणसी ।
क्षुद्र टाकी हृहयातुनी उठ त्वरित युद्धासी ।। (ओवी )
ज्ञानेश्वर माऊलींनीदेखील पहिल्या अध्यायात स्पष्ट शब्दांत म्हटलं आहे की,
तैसे अर्जुना तेथ जाहले । असतें पुरुषत्व गेलें ।
जें अंतकरण दिधले । कारुण्यासी ।।
या ठिकाणी अर्जुन मनाने पूर्ण खचला आहे, भ्रमित झाला आहे. घाबरलाही आहे. मनाच्या अशा अवस्थेत त्याच्या शरीराचीही अवस्था तशीच भरकटल्यासारखी झाली आहे. त्याचं अंग थरथरतंय, घशाला कोरड पडलीय, त्याला धड उभं राहणंदेखील शक्य होत नाहीये. अशा अवस्थेत कुणी कितीही प्रयत्न केला तरी अर्जुन युद्ध करू शकणारच नाही आणि त्याला जबरदस्तीने युद्धाला उभं केलं तर त्याचा पराभव निश्चितच आहे. म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी त्यावर मानसशास्त्राrय उपाययोजना करण्यास सुरुवात केली. माणसाचं मन सावरलं की, मनामागोमाग शरीराकडूनदेखील योग्य तो प्रतिसाद मिळवता येतो हे मानसशास्त्राrय सूत्र भगवंतांना ज्ञात होतं. अर्जुनाच्या जागी जर भीम असता तर… तर भीमाला काही सांगावंच लागलं नसतं. तो शोकाकुल झालाच नसता. त्याला “युद्ध कर’’ असं सांगण्याचीही गरज नव्हती. केवळ शत्रू समोर दिसताच तो त्वेषाने तुटून पडला असता.
पण अर्जुनासारख्या बुद्धिमान, भावनाशील आणि ऋजू मनाच्या रुग्णावर उपाययोजना करताना अत्यंत सावधपणे करायला हवी हे भगवंतांनी जाणलं आणि म्हणाले,
न तु एव अहम् जातु न आसम् त्वम् न इमे जनाधिपाः
च च एव न भविष्याम सर्वे वयम् अत परम् ।।12।।
देहिनोस्मिन यथा देहे कौमारम् यौवनम् जरा ।
तथा देहान्तर प्राप्तिधीर तत्र न मुह्यति ।।13।।
मात्रास्पर्शाः तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः ।
आगमापियिन अनित्याः तान् तितिक्षस्व भारत ।।14।।
यं हि न व्यथयन्ति एते पुरुषम् पुरुषर्षभ
समदुःखसुखम् धीरम् अमृतत्वाय कल्पते ।।15।।
न असत् दिद्यते भाव न अभाव विद्यते सत
उभयोः अपि दृष्ट अन्त तु अनयोः तत्वदर्शिभि ।।16।।
अविनाशि तु तत् विद्धी येन सर्वम् इदम् ततम्
विनाशम् अव्ययस्य अस्य न कश्चित् कर्तुम् अर्हति ।।17।।
भावार्थ : हे अर्जुना, मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे समोर दिसणारे राजेमहाराजे नव्हते असं नाही. आपण सर्वच जण फार पूर्वीपासूनच अस्तित्वात होतो आणि पुढेही असणार आहोत. ज्या प्रकारे प्रत्येक प्राणिमात्राच्या शरीराला बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व येते, त्याच प्रकारे पुढे मृत्यू होऊन या शरीरापासून मुक्ती मिळते आणि पुन्हा नव्या जन्मात नवीन शरीर प्राप्त होते. तिथे पुन्हा बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व हे चक्र सुरूच राहते. त्यामुळे ज्ञानी पुरुषांना या शरीराचा मोह उत्पन्न होत नाही. हे अर्जुना, जसं थंडी आणि उष्णता या दोन्हीपासून माणसाच्या शरीराला सुख किंवा दुःख प्राप्त होतं, पण थंडी किंवा गरमी दोन्ही कायमची नसतात. या दोन्ही अवस्था अनित्य आहेत. म्हणून योगी पुरुष त्या दोन्ही तितक्याच संयमाने सहन करतात. हे संयमी जीवनच त्यांना पुढे मोक्षापर्यंत घेऊन जाते. हे कुंतिपुत्रा, तू सत् आणि असत् या दोहोंतील फरक जाणून घे. असत् वस्तू जरी दिसल्या तरी त्यांना अस्तित्व नसतं आणि सत् वस्तू जरी आपल्या इंद्रियांना जाणवल्या नाहीत तरी त्यांचं अस्तित्व असतंच असतं. म्हणूनच या जगातील सत् आणि असत् दोन्हीतील भेद तत्त्वज्ञानी पुरुषांनी जाणला आहे. तूही तो जाणून घे. हे संपूर्ण जग अशा अविनाशी तत्त्वाने बनलेलं आहे की, कुणीही त्याचा नाश करू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अनाकलनीय तत्त्वज्ञान अशा प्रकारे सांगताहेत की, जे त्याच्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडचं आहे.
आत्मा, परमात्मा, जिवात्मा, ब्रह्म, माया…ज्या गोष्टी आपल्यासारख्या सर्वसामान्य बुद्धीच्या माणसांच्या ज्ञानेंद्रियांच्या पलीकडल्या आहेत. आपण केवळ पाच ज्ञानेंद्रियांना आकळणाऱया गोष्टी जाणू शकतो. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत काही प्रमाणात विकसित झालेली असतात. डोळ्यांनी आपण बघतो, कानांनी ऐकतो, नाकाने गंधाचं ज्ञान होतं, जिभेने पदार्थाची चव कळते आणि त्वचेने स्पर्शातील फरक जाणवतो. यापलीकडे सर्वसामान्य माणसं जात नाहीत, जाऊ शकत नाहीत.
अर्जुन तर आता सर्वसामान्यांपेक्षाही हीन अवस्थेला पोहोचला आहे. त्याचं डोकं ठिकाणावर नाही. अशा वेळी आत्मा, परमात्मा वगैरेंसारख्या विषयांवर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावण्याचा प्रयत्न करताहेत. आपण जे काही सांगतोय ते सगळं अर्जुनाच्या डोक्यावरून जाणार आहे याची भगवंतांना पूर्ण कल्पना असूनही ते त्याला समजावणीच्या सुरात सांगताहेत. कारण…
हे कारण आपण पुढील लेखातून जाणून घेऊ.
।। श्री कृष्णार्पणमस्तु ।।
[email protected]