गुरुत्वीय लहरींच्या संशोधनात हिंदुस्थानी शास्त्रज्ञ

60
  • मेधा पालकर

जास्तीत जास्त तिघा शास्त्रज्ञांना नोबेल देण्याच्या परंपरेबाबत नव्याने विचार करायला हवा. गुरुत्वीय लहरींच्या शोधासाठी तीनपेक्षा अधिक शास्त्रज्ञांची निवड केली गेली असती तर त्यात हिंदुस्थानी शास्त्रज्ञांचा नक्की समावेश असता असे मत या संशोधनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या पुणे आयुकातील शास्त्रज्ञ डॉ. संजीव धुरंधर यांनी व्यक्त केले आहे.

तकातील सर्वात मोठा शोध मानल्या गेलेल्या गुरुत्वीय लहरींच्या निरीक्षणाला यंदाचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले. रेनर वाईस, बॅरी सी. बॅरीश आणि किप. एस. थॉर्न या तिघा शास्त्रज्ञांना लेझर इंटरफेरॉमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झवॅटरीच्या (लायगो) निर्मितीसाठी आणि गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध केल्याबद्दल रॉयल स्विडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे नोबेल जाहीर करण्यात आले. गुरुत्वीय लहरींच्या शोधामध्ये हिंदुस्थानी शास्त्रज्ञांचे थेट आणि महत्त्वाचे योगदान असल्यामुळे हिंदुस्थानी शास्त्रज्ञानांचाही सन्मान झाला आहे. गुरुत्वीय लहरींवर गेली २१ वर्षे काम करणाऱ्या पुणे आयुकातील शास्त्रज्ञ डॉ. संजीव धुरंधर यांचे मोलाचे योगदान आहे.

हिंदुस्थानसह जगभरातील वीसपेक्षा अधिक देशांतील एक हजार शास्त्रज्ञांचा गुरुत्वीय लहरींच्या शोधामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे नोबेल पारितोषिकाने त्यांचाही एकप्रकारे सन्मान झाला आहे. पुण्यातील आयुकामधील प्रा. संजीव धुरंधर यांच्या गटाने समांतरपणे गुरुत्वीय लहरींच्या विश्लेषणाचे तंत्र १९८० च्या दशकापासून विकसित केले. वाळवंटातून सुई शोधावी इतकी किचकट प्रक्रिया असणाऱ्या गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व हिंदुस्थानच्या शास्त्रज्ञांच्या या तंत्रामुळे सिद्ध होऊ शकले.
गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध करताना पृथ्वीच्या आकारात झालेला अणू केंद्रकापेक्षा हजार पटींनी लहान बदल टिपण्याची किमया जगभरातील अनेक शास्त्रज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच साकारू शकली. या शोधामध्ये गुरुत्वीय लहरी पकडणाऱ्या अमेरिकेच्या लायगो वेधशाळांचे जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व हिंदुस्थानी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या विश्लेषणाच्या तंत्राचेही आहे. नोबेल पारितोषिक जर तिघांपेक्षा अधिक जणांना दिले गेले असते, तर कदाचित आज त्यात हिंदुस्थानी शास्त्रज्ञांचाही समावेश असता असे प्रा. संजीव धुरंधर सांगतात.

प्रा. धुरंधर यांनी मोजक्या सहकारी शास्त्रज्ञांसोबत १९८० च्या दशकात हिंदुस्थानात गुरुत्वीय लहरींच्या संशोधनाचा पाया रचला. लायगोसारख्या अतिशय संवेदनशील यंत्रणेमधून गुरुत्वीय लहर गेली तरी तिचे अस्तित्व सिद्ध करणे कठीण काम होते. मात्र धुरंधर यांच्या गटाने भौतिकशास्त्र, गणित आणि सांख्यिकीच्या माध्यमातून लायगोकडून येणाऱ्या माहितीतून गुरुत्वीय लहर आणि त्याद्वारे तिच्या उगमाचा अंदाज बांधणारे मॉडेल बनवले. हिंदुस्थानी शास्त्रज्ञांच्या या कामामुळेच गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व जगाला समजू शकले.

प्रा. धुरंधर म्हणाले, तिघा अमेरिकी शास्त्रज्ञांनी या विषयाचा पाया रचला आणि गुरुत्वीय लहरींच्या शोधासाठी आवश्यक अत्याधुनिक यंत्रणा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. नोबेलसाठी त्यांची झालेली निवड अतिशय योग्य आहे, मात्र आजचे विज्ञान हे मेगा प्रोजेक्टचे आहे. जिथे जगभरातील अनेक देशांचे शास्त्रज्ञ एकत्र येऊन संशोधन करतात. नवीन शोध लागताना अशा सर्वांचे योगदान तितकेच महत्त्वाचे असते. जास्तीत जास्त तिघा शास्त्रज्ञांना नोबेल देण्याच्या परंपरेबाबत नव्याने विचार करायला हवा. गुरुत्वीय लहरींच्या शोधासाठी तीनपेक्षा अधिक शास्त्रज्ञांची निवड केली गेली असती तर त्यात हिंदुस्थानी शास्त्रज्ञांचा नक्की समावेश असता.

यंदाच्या नोबेलमुळे हिंदुस्थानी शास्त्रज्ञ कोणत्या दर्जाचे काम करीत आहेत याची जाणीव जगालाही होईल. नोबेलमुळे आगामी लायगो-इंडिया प्रकल्पाचे महत्त्व सरकार आणि नागरिकांना समजेल, या विषयाकडे अधिकाधिक विद्यार्थी आकर्षित होतील, असेही प्रा. धुरंधर यांनी सांगितले.

गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाविषयी अचूक भाष्य करता येणार
गुरुत्वीय लहरींबाबतच्या संशोधनानंतर लवकरच प्रा. संजीव धुरंधर यांचा नवीन प्रबंध प्रसिद्ध होत आहे. गुरुत्वीय लहरींचे सिग्नल अचूक शोधू शकेल अशा ‘काय स्क्वेअर मेथड’चा तौलनिक अभ्यास करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासाला अधिक गती मिळून लायगो वेधशाळेची क्षमताही वाढणार आहे. या प्रबंधासाठी अतिशय काठीण्य पातळीवरील गणिती आणि भौमितिक सूत्रांचा उपयोग करण्यात आला असून त्यायोगे गुरुत्वीय लहरींच्या एकूण अस्तित्वाविषयी अचूक भाष्य करणे शक्य होऊ शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या