>> प्रशांत गौतम
समुद्राच्या पोटात अनेक रहस्ये दडलेली आहेत असे म्हणतात. जगभरात अशा समुद्राच्या तळाशी शास्त्रज्ञ, शोधकर्ते हे काही ना काही मोहिमा राबवत असतात. या मोहिमांमध्ये अनेकदा अनोखे असे शोध त्यांना लागतात. कधी एखादा नव्या प्रजातीचा समुद्री जीव सापडतो, कधी एखादी वनस्पती, खडकांचा, धातूचा एखादा नवा प्रकार, तर कधी समुद्रात बुडालेल्या काही अजब गोष्टी त्यांच्या हाताला लागतात. समुद्रात बुडालेली जहाजे शोधणे हेदेखील काही लोकांचे आवडते काम असते. एक मोठी टीम बनवून ते असा उद्योग करीत असतात. अशाच एका शोधकर्त्यांच्या टीमला भूमध्य समुद्रात 600 वर्षांपूर्वी बुडालेले एक चाचांचे अर्थात समुद्री लुटारूंचे जहाज सापडले आहे. स्पेन आणि मोरोक्कोच्या दरम्यान 2700 फूट खोल समुद्रात या पथकाला हे जहाज सापडले. हे जहाज त्या काळातील कुप्रसिद्ध अशा बार्बरी नावाने ओळखल्या जाणाऱया समुद्री चाचांचे असावे असा अंदाज बांधला जात आहे. जहाजावर अनेक दुर्मिळ गोष्टींचा खजिना पथकाला मिळाला आहे. यामध्ये सोन्याच्या कलाकृती, दुर्मिळ असे आय ग्लासेस, आभूषणे आणि विविध देशांतील मातीच्या भांडय़ांचा समावेश आहे. त्या काळात हे समुद्री चाचे किनारपट्टीवरील वस्त्यांवर हल्ले करत असत आणि तिथल्या लोकांना लुबाडत असत.
या जहाजात दुर्मिळ वस्तूंसोबत चार मोठय़ा तोफा, 10 फिरत्या बंदुका आणि मोठय़ा प्रमाणावर कस्तुरी सापडली आहे. या जोडीला बेल्जियम अथवा जर्मनीमध्ये बनवण्यात आलेल्या काचेच्या दारूच्या बाटल्या आणि तुर्कस्तानातील चहादेखील मिळाला आहे. फ्लोरिडास्थित कंपनी Odyssey Marine Exploration (OME) ने या 45 फूट लांब जहाजाचा शोध लावला आहे. या पथकाने यापूर्वी 300पेक्षा जास्त जहाजांचे भग्नावशेष समुद्रात शोधण्यात यश मिळवले आहे. मात्र बार्बरी चाचांशी संबंधित असे जहाज त्यांना पहिल्यांदाच शोधण्यात यश आले आहे. हे जहाज 18व्या शतकात बुडाल्याचा अंदाज बांधला जात आहे.