
>> साधना गोरे, [email protected]
आपली शाळा आणि तिथले शिक्षक यांना आपल्या मनात एक अढळ स्थान असतं. शाळेत असताना काही शिक्षक आपल्याला आवडत नसले तरी मोठं झाल्यावर आपल्याला त्यांच्या वागण्याचं कारण कळतं आणि नाही कळलं तरी आपल्याला त्यांच्याविषयी आपुलकीच वाटते. तर आपल्या शाळेतल्या बऱ्याच शिक्षकांचं एक अक्षर फार लाडपं असतं ते म्हणजे ‘ढ’. हा ढगाचा ‘ढ’ नव्हे. एखादी गोष्ट कितीही वेळा समजावून एखाद्या विद्यार्थ्याला समजत नसेल तेव्हा ‘‘तू अगदी ‘ढ’ आहेस’’ असं शिक्षक म्हणतात. आमच्या शाळेतले एक शिक्षक चिडले की, उपरोधिक बोलायचे. त्या बोलण्यातलं त्यांचं एक ठरलेलं वाक्य होतं. ‘‘तुम्ही अगदी *** आहात.’’ त्यांच्या या तीन फुल्या म्हणजे गाढव. तर या लेखात आपण ‘ढ’ आणि गाढव या प्राण्याचा संबंध पाहणार आहोत.
बदल, परिवर्तन हा निसर्गाचाच स्थायीभाव आहे. काळाबरोबर परिवर्तन ही अपरिहार्य गोष्ट मानली जाते. तसंच एखाद्या मनुष्याचा काहीच बौद्धिक विकास होत नसेल म्हणजे त्याच्या आकलनात काहीच वाढ होत नसेल तर अशा माणसाला मूर्ख किंवा मंदबुद्धी म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये घुबडाला आणि प्राण्यांमध्ये गाढवाला अशा मंदबुद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे. कारण घुबड आपल्या मोठाल्या डोळ्यांनी नुसतं एकटक पाहत राहतं, तर गाढव विशेषतः तट्टू (गाढवाची एक जात) कुठंही अडून उभं राहतं. यावरून कुणाचं काहीच न ऐकणाऱ्या, आपलंच खरं करणाऱ्या व्यक्तीला अडेलतट्टू म्हटलं जातं. म्हणून मूर्ख या अर्थानं ‘ढ’ म्हणताना तो ‘गाढव’ या शब्दाचा संक्षेप आहे की काय? ‘गाढव’मधील प्रमुख वर्ण ‘ढ’ याच्या उच्चारालाच सर्व शब्दाचा अर्थ प्राप्त झाला आहे काय? अशा शंका कृ. पां. कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या आहेत.
हिंदी भाषेतही मूर्ख, अडाणी या अर्थाने ‘ढक्कन’ हा शब्द प्रचलित आहे. यातील ढक्कनच्या अर्थाकडे दुर्लक्ष करून फक्त सुरुवातीच्या वर्णाकडे म्हणजे ‘ढ’कडे लक्ष दिलं तर मराठीत गाढव या अर्थाने ‘ढ’ म्हणणं आणि हिंदीत त्याच अर्थाने ढक्कन म्हणणं यात खूप साम्य आहे आणि म्हणून त्यात एक गंमतही आहे.
अजूनही ‘ढ’ आणि गाढव यांचा संबंध स्पष्ट होत नाही ना? आता थोडी वेगळी माहिती समजून घेऊ या. मराठी, हिंदी, संस्कृत या भाषांची देवनागरी लिपी असो की उत्तरेकडील बंगाली, गुजराती, गुरुमुखी (पंजाबी) आणि आसामी किंवा दक्षिणेकडील कन्नड, तेलुगू, तामीळ, मल्याळम आणि सिंहली किंवा तिबेटी, थाई, खमेर (पंबोडिया), जावानीज (इंडोनेशिया) आणि ब्रह्मदेशी (म्यानमार) या लिप्यांवर प्राचीन ब्राह्मी लिपीचा कमीअधिक प्रभाव आहे. ब्राह्मी लिपीपासून देवनागरी लिपी विकसित होईपर्यंत मध्ये विविध टप्पे आहेत. ब्राह्मी-गुप्त-सिद्धम-नागरी -देवनागरी या क्रमाने हा लिप्यांचा विकास दाखवता येईल. प्राच्य विद्याचे अभ्यासक गौरीशंकर ओझा यांनी सवाशे वर्षांपूर्वी ब्राह्मी लिपीचा व्यवस्थित अभ्यास करून तिचे वाचन करण्यात यश मिळवले होते.
अडीच ते तीन हजार वर्षे जुन्या ब्राह्मी लिपीच्या वर्णांमध्ये बरेच बदल होऊन देवनागरी आणि इतर लिप्या तयार झाल्या. मात्र त्यातील ‘ढ’ हा वर्ण अजिबात बदलला नाही. सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी हा ‘ढ’ जसा होता, अगदी तेच रूप आजही आहे. त्यामुळे हा ‘ढ’ भाषा वैज्ञानिकांसाठी एक अभ्यासाचा विषय होऊन राहिला आहे. त्यामुळे कितीही शिकवून, सांगून ज्या व्यक्तीमध्ये काहीही बदल होत नाही त्याला ‘ढ’ म्हणण्याची प्रथा पडली असावी. अडाणी, अशिक्षित, मूर्ख या अर्थानेही ‘ढ’ म्हणण्याची पद्धत आहे.
‘ढ’ आणि मूर्खपणा यांचं नातं हा निव्वळ योगायोग नाही. ‘मूर्ख’ शब्दाच्या मुळाशी संस्कृतमधील ‘मूढ’ शब्द आहे. हा ‘मूढ’ शब्द तयार झाला आहे संस्कृतमधील ‘मुह्’ या धातूपासून. या ‘मुह्’ धातूपासूनच मोह, मोहक, मोहन, मोहिनी इ. शब्द तयार झाले आहेत. आपटे शब्दकोशात मोह म्हणजे ममता, माया, मतिभ्रम, अज्ञान, प्रेमाचा अतिरेक, मोह उत्पन्न करणारे, मुग्ध असे अर्थ दिलेले आहेत. सारांश, ‘मूढ’ आणि ‘मोह’ हे शब्द एकाच ‘मुह्’ या धातूपासून तयार झालेले आहेत. ‘मोह’ शब्दाचे वरील अर्थ हे विवेक, बुद्धी आणि ज्ञान यांच्या विपरीत आहेत. म्हणजे एका अर्थाने ते मूढपणाशी, मूर्खपणाशी संबंधित आहेत, असं म्हणता येईल.
‘ढ’ केव्हा ढगाचा आणि केव्हा गाढवाचा हे तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही *** नाही आहात!





























































