
>> साधना गोरे, [email protected]
‘चुकतो तो माणूस’, ‘मी बोलून चुकलो’, ‘मुलगा जत्रेत चुकला’, ‘नव्या सुनेला सासरी आल्यावर चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं’, ‘त्याची नि माझी आज चुकामूक झाली’, ‘तो अगदीच चुकारतट्टू आहे’, ‘त्याच्याकडून चुकूनमाकून ते काम राहून गेलं’ इ. शब्दप्रयोगांच्या मुळाशी ‘चूक’ हा एकच शब्द आहे, पण यातील प्रत्येक शब्दप्रयोगात ‘चूक’ शब्दाचा अर्थ मात्र वेगवेगळा आहे. असे संदर्भानुसार अर्थ बदलणारे शब्द प्रत्येक भाषेत असतात. त्यामुळे एखादी भाषा शिकायची म्हणजे त्या शब्दाचे विविध संदर्भानुसार बदलणारे अर्थही शिकायचे असतात.
‘चूक’ शब्दाचे मूळ सांगताना कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, संस्कृतमधील ‘युच्छ्’ या शब्दापासून हा शब्द आला. नंतर तो ‘स्कु’, ‘चुक्क’ असा बदलत ‘चूक’ झाला. हा शब्द प्राकृतमध्ये ‘चुक्कइ’, हिंदीमध्ये ‘चुकना’, ओडियामध्ये ‘चुकाइबा’, पंजाबीत ‘चुकण्णा’, सिंधीमध्ये ‘चुकणूं’, गुजरातीमध्ये ‘चुकवुँ’ असा वापरला जातो. हा शब्द मराठीत ‘अपराध’, ‘दोष’, ‘प्रमाद’ या अर्थाने वापरला जातो, पण संदर्भानुसार या अर्थात किंचित बदल झालेले दिसतात.
एखाद्याकडून अनवधानाने चूक झाली असेल तर त्याला ‘चुकलामाकला’ म्हटलं जातं. वाट चुकलेला, भलतीकडे गेलेला, योग्य वेळी योग्य ठिकाणी उपस्थित नसलेल्यालाही ‘चुकलामाकला’ म्हणण्याची पद्धत आहे. ‘चुकलेमाकले पदरात घ्या अन् उरलेसुरले गुढीवर घ्या’ अशी एक म्हणसुद्धा आहे. म्हणजे आता सांभाळून घ्या व जे काही येणेदेणे निघेल ते पुढे वसूल करून घ्या. याच अर्थाने ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ असं म्हटलं जातं. हा शब्दप्रयोग प्रामुख्याने हिशेबात वापरला जात असे. हिशेबामध्ये कधी कधी नजरचुकीने भलताच आकडा पडण्याची शक्यता असते. त्यामुळे हिशेबाच्या शेवटी हा शेरा मारून ‘चूक असेल तर ती दुरुस्ती करून वाजवी हिशेब असेल तो धरणे’, अशी विनंती केली जाई. नंतर हा शब्दप्रयोग इतर संदर्भातही वापरला गेलेला दिसतो.
परस्परांची भेट व्हावी असे वाटत असताना ती होत नाही तेव्हा ‘चुकामूक झाली’ असं म्हणतात. इथे ‘चुकणे’ आणि ‘मुकणे’ अशी दोन क्रियापदे एकत्र वापरली जातात.
आपली चूक झाली असेल तर ती लगेच मान्य करावी, वाद घालत बसू नये, या अर्थाची एक म्हण आहे ती म्हणजे ‘चूक झाली पदरी घ्यावी, हुज्जत न करावी’. ‘चुकला फकीर मशिदीत शोधावा’ अशी एक म्हण आहे. फकिराचे वस्तीचे ठिकाण म्हणजे मशीद. तो गावात कुठं दिसला नाही तर मशिदीत सापडेलच. एखाद्याची सापडण्याची ठरावीक जागा कोणती असेल या अर्थाने ही म्हण वापरली जाते. त्यावरून ‘चुकला भाई परळला सापडेल’ असाही शब्दप्रयोग तयार झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत परळ-लालबागचे कामगार मोठय़ा प्रमाणात सहभागी होते. या भागांत कामगारांची वस्तीही मोठय़ा प्रमाणात होती. त्यामुळे समाजवादी लोकांनी इथे कामगारांच्या संस्था काढून काम केलं. म्हणून समाजवादी लोकांना उद्देशून हा शब्दप्रयोग वापरला जाई.
मराठीत ‘कामचुकार’, ‘चुकारतट्टू’ असे शब्द आहेत. कामाची टाळाटाळ करणाऱ्याला, जबाबदारी टाळणाऱ्या माणसाला उद्देशून हे शब्द वापरले जातात. ‘चूक झाली तर हरकत नाही, पण चुकारपणा करू नये’ अशी म्हणही आहे. चुकणं हा मनुष्यधर्मच आहे. त्यामुळे चुकीबद्दल कोणी दोष देणार नाही, पण काम टाळल्याबद्दल शिक्षा करणे जरूर आहे.
चूक ही अशी गोष्ट आहे की, ती कोणी जाणूनबुजून करत नाही. त्यामुळे कुणालाही आपल्या हातून चूक होणारच नाही याची खात्री बाळगता येत नाही. यावरून ‘चुकीविषयी कोणी चाखून रांधत नाही’ अशी म्हण आहे. म्हणजे कोणी स्वयंपाक करताना झालेला पदार्थ चाखून पाहत नाही, तेव्हा एखाद्या वेळी वाईट होऊ शकतो.
‘देऊन चुकलो’, ‘करून चुकलो’ असंही म्हटलं जातं. यामध्ये ‘देऊन किंवा करून चूक केली’ असा अर्थ होत नाही, तर ‘देऊन टाकले’, ‘बोलून गेला’ असा अर्थ आहे. इथे ‘चुकलो’ हा शब्द टाकणे, देणे, संपवणे या अर्थाने वापरला गेला आहे. उदा. ‘सावकाराचा पैसा चुकता केला’ या शब्दप्रयोगाविषयी कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, वैदिक संस्कृतमधील ‘चोष्कूय’ या शब्दापासून हा शब्द मराठीत आला. ‘चोक्कू’, ‘चुक्क’, ‘चूक’ असा त्याचा प्रवास झाला. वेदांमध्ये हा शब्द ‘देणे’ या अर्थी आहे. हिंदीमध्येही ‘देणे’ या अर्थाने ‘चुकता’ शब्द आहे.
लेखात चुकूनमाकून ‘चुकी’चा एखादा संदर्भ राहून तर गेला नाही ना?


























































