क्रिकेटनामा – विश्वचषकाचं काय होणार?

संजय कऱ्हाडे

टी-ट्वेंटीचा आदळआपट आजपासून सुरू होतेय. अन् माझी खात्री आहे, गंपू गंभीर धास्तावलेला असेल! ‘वन डे मालिका गमावल्यानंतर आता टी ट्वेंटी मालिकाही हरलो तर,’ या प्रश्नाने त्याला भंडावून सोडलं असणार. पण त्याच्याच धरसोड वृत्तीमुळे आज वन डे क्रिकेटमध्ये आपली तश्रीफ लाल झाली आहे. पाच सामन्यांची ही मालिका वर्ल्ड कपच्या अनुषंगाने महत्त्वाची!

अर्थात, टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा प्रत्यक्षात मात्र अनेक प्रश्न ठाकून उभी राहिली आहे. स्पर्धेत बांगलादेश सहभागी होणार की नाही, झाला तर सामने कुठे खेळणार, अशा विवंचना आहेत. हिंदू अल्पसंख्याकांचं बांगलादेशमध्ये खच्चीकरण होत असल्याची आरोळी मोठी झाल्यानंतर जनाचा काwल राखण्यासाठी आपल्या बोर्डाने मुस्तफिजुरला आयपीएलमधून बाहेर काढलं. मग खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करून त्यांचे सामने हिंदुस्थानातून श्रीलंकेत हलवावेत अशी मागणी बांगलादेशने केली. पाक बोर्डनेसुद्धा ‘बेगाना अब्दुल’ बनून या वादात आपलं थोबाड घुसवलं अन् स्वतःला दिवाना सिद्ध केलं. खरं तर हा ‘बेगाना अब्दुल’ त्याचे सारे सामने श्रीलंकेत खेळणार आहे! असो. अखेरच्या क्षणी सामने स्थलांतरित करणं अवघड असल्याचं आणि देशातली सुरक्षा पुरेपूर अन् योग्य असल्यामुळे तुमचा अंतिम निर्णय 21 जानेवारीपर्यंत कळवा असं आपण सांगितलं होतं. बांगलादेशचं उत्तर आज अपेक्षित आहे. त्यांचा नकार आल्यास स्कॉटलंडच्या संघाला आमंत्रित केलं जाणार आहे!

दरम्यान, बांगलादेशच्या धोरणामुळे लिटन दास, मोईन उल हक, यासर अलीसारख्या खेळाडूंची स्पॉन्सरशिप सॅन्सपेरील ग्रीनलँड (एस.जी.) आणि सरीन स्पोर्ट्स (एस.एस.) या हिंदुस्थानी पंपन्यांनी स्थगित केली आहे. खेळाडू आणि एकूण बांगलादेश क्रिकेटचं आर्थिक नुकसान पाहता बांगलादेश आपल्या अटी मागे घेईल अशी आशा आहे. मात्र बांग्लादेशातल्या सत्तापालटानंतर हिंदुस्थानने बेगम हसीनाला आश्रय दिला आणि दोन देशांदरम्यांचे संबंध बिघडले होते. त्यात बांगलादेशच्या नव्या राज्याला क्रिकेट अन् खेळाडूंबद्दल फारशी कणव असल्याचा काही पुरावा समोर आलेला नाही! हिंदुस्थान आपला मित्र देश असल्याचा स्पष्ट दाखलाही नव्या सरकारने दिलेला नाही. पर्यायाने एकूण सामंजस्य विळीवर चढण्याची शक्यता आहे. शिवाय, दरिद्री पाकिस्तान चीनच्या प्रभावाखाली आणि साथीने या वादात फूस लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात श्रीलंकेसह काही आशियाई देशांवर चीनचं वाढत जाणारं अधिपत्य! पाकचा प्रयत्न समजणं अवघड नाही!

एकटा बांगलादेश सहभागी न झाल्याने स्पर्धा धोक्यात येणार नाही, परंतु अमेरिकेचा संघ श्रीलंकेत तयारी करतोय आणि त्यांच्या संघात काही मूळचे पाक खेळाडू आहेत. पैकी, अली खानचा व्हिसा हिंदुस्थानने नाकारल्याचा दावा केला गेलाय, पण व्हिसाची प्रक्रिया कार्यरत असल्याचं आपले अधिकारी म्हणतायत. अलीशिवाय आणखीही काही खेळाडू अमेरिकेप्रमाणेच संयुक्त अमिरात, पॅनडा, इटली, नेदरलँड्स, ओमानच्या संघात आहेत. त्यांच्या बाबतीत काय निर्णय होणार? झिम्बाब्वेचा कर्णधार आहे पाकिस्तानात जन्मलेला सिपंदर रझा. त्याचा व्हिसा नाकारला तर स्पर्धेला रामराम म्हणायचं झिम्बाब्वेने ठरवलंय!

शाहीर अनंत फंदी म्हणतात…
बिकट वाट वहिवाट नसावी,
धोपट मार्गा सोडू नको;
‘क्रिकेटमधी’ ऐस आपला,
उगाच भटकत फिरू नको…
देव सर्वांचें बरें करों!