ठसा – दुर्गा नेवरेकर

<<< श्रीप्रसाद पद्माकर मालाडकर >>>

दुर्गा नेवरेकर यांचा जन्म गोमंतकात मडकईत झाला. वडील राम रामचंद्र नेवरेकर विविध कलासंपन्न कलाकार, आई जानकी राम नेवरेकर गृहिणी होत्या. अनंत नेवरेकर, बाळकृष्ण नेवरेकर, रघुवीर नेवरेकर, दुर्गा नेवरेकर, मीरा नेवरेकर कामत, शिवराज नेवरेकर अशी सर्व भावंडे आहेत. दहा-अकरा वर्षांच्या असल्यापासून त्यांनी रामनाथ मटकर यांच्याकडे दहा वर्षे शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले. गिरगावमध्ये भटवाडीत आग्रा घराण्याचे पंडित गोविंदराव अग्नी राहत होते. ते दुसरे गुरू होते. तिसरे गुरू जयपूर घराण्याचे पंडित निवृत्तीबुवा सरनाईक आहेत.

सन 1961 मध्ये त्या आकाशवाणी मुंबई केंद्रात कोंकणी निवेदिका पदाद्वारे कार्यरत झाल्या. तेव्हा कोंकणी विभागात प्रभू, ब्रिगेन्झा, मनोहर माशेलकर, कमल मांजरेकर, वेणी माधव बोरकर, पुष्पा करमाळी हे कार्यक्रम अधिकारी त्यांच्या कार्यकाळात होते. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या ‘शीत कढी’, ‘आका बायले चौकेर’ अशा अनेक कार्यक्रमांत त्या नेहमी सहभागी असायच्या. त्यांच्या जीवश्चकंठश्च मैत्रीण विमल दळवी जोशी होत्या. मराठीत सहकारी कमलिनी विजयकर, नीला हिरामण देसाई, नीलम बबन प्रभू, करुणा यशवंत देव, मुक्ता भिडे, मीरा प्रभू सरैया, कुसुम रानडे, ललिता नेने वैद्य या त्यांच्या स्नेहांकित होत्या. कोंकणी वृत्तनिवेदक सर्वश्री जे. एल. गोम्झ, शैलेश रायकर होते. कोंकणी सुगम संगीताची स्वर परीक्षा अव्वल श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने दुर्गा नेवरेकर यांची ‘अकुल पिकुल जीव सजला हांव तुझी प्रिया’ (गीत ः हरदत्त खंडेपारकर, संगीत ः ललिता खांडेपारकर), ‘दर्याच्या ल्हारारी’ (गीत संगीत ः पारंपरिक) अशी अनेक कोकणी गाणी अविस्मरणीय ठरली.