लेख – संपूर्ण नक्षलमुक्ती खरंच होईल का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुभाषचंद्र सुराणा

सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडल्याने या चळवळीस धक्के बसू लागले आहेत. महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा पोलिसांनी समन्वय ठेवून, नियोजन करून, डावपेच आखून धाडसी कारवाया करीत टप्पाटप्प्यांनी माओवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे या दहशतीस आळा बसला आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आता अतिसंवेदनशील गटातून मुक्त झाला आहे. अर्थात संपूर्ण नक्षलमुक्ती खरंच होईल का, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला भविष्यातच मिळू शकेल.

केंद्र सरकारने देशातून नक्षलवाद संपविण्याची घोषणा केली होती. सूक्ष्म नियोजन, सखोल व्यूहरचना आणि ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना सरकारने केली त्यातून नक्षलमुक्तीचा संकल्प बऱ्यापैकी पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले आहे. नक्षल संघटनेचा वरिष्ठ कमांडर आणि व्यूहरचनाकार थिप्परी तिरुपती ऊर्फ देवजी तसेच संग्राम हे काही दिवसांपूर्वी 16 साथीदारांसह तेलंगणा पोलिसांसमोर शरण आले. देवजी हा फार घातकी नक्षल कमांडर होता. पीपल्स वॉर ग्रुपच्या माध्यमाने 1980 च्या दरम्यान त्याने गणपती, किसनजी, भूपती, देवजी, बसवराजू, कादरी, सत्यनारायण इत्यादींसह नक्षलवादी संघटनेची बाजू भक्कम केली.

गेल्या ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तब्बल 60 नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवली. त्यात नक्षल्यांचा पॉलिट ब्युरोचा सदस्य सोनू ऊर्फ भूपती याचाही समावेश होता. भूपतीच्या आत्मसमर्पणामुळे अनेक नक्षलवाद्यांना या चळवळीतून मुक्त व्हावे असे वाढू लागले. त्यामुळेच नक्षलमुक्त महाराष्ट्राच्या मोहिमेला मोठे बळ मिळाले. केंद्रीय समितीचा सदस्य मल्लाराजी रेड्डीने शरणागती स्वीकारली. त्यामुळेच नक्षलवाद्यांचा कणा मोडला गेला. एकेकाळी देशातील 10 राज्यांमध्ये 126 जिल्हे नक्षल प्रभावित होते. झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र राज्यांतील शेकडो माओवादी – नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे पेंद्र सरकारचे नक्षलवादी संघटनेचा नायनाट करण्याचे लक्ष्य 90 टक्के पूर्णत्वास गेले.

अनेक खुंखार माओवादी – नक्षली कारवाईत मारले गेल्याने त्यांचे कंबरडे मोडले. हे काम सीआरपीएफने गेल्या तीन वर्षांत करून दाखविले. सीआरपीएफ जवानांनी कठीण परिस्थितीत लढा देऊन माओवाद्यांचा गड उद्ध्वस्त केला. या लढाईत जवळपास दोन हजार सीआरपीएफ जवानांनी देशासाठी बलिदान केले. त्यांच्या शौर्याला व कार्याला लाखो प्रणाम! प. बस्तरच्या दंडकारण्यात गेल्या तीन दशकांपासून नक्षलवादी चळवळीचा कणा समजला जाणारा कुख्यात नक्षल नेता सुन्नम पापाराव यानेसुद्धा त्याच्या 17 सशस्त्र साथीदारांसह शरणागती पत्करली. पापाराव हा शेवटचा मोठा नक्षली कमांडर होता. अलीकडेच तेलंगणामध्ये छत्तीसगडमधील 700 हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने या चळवळीस मोठा धक्का बसला. सुकमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी स्वतः पापारावच्या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन हिंसाचाराचा मार्ग सोडा, आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारा आणि शरणागती पत्करा असे आवाहन त्यांच्या नातेवाईकांमार्फत केले. पापाराव हा शंभरहून अधिक गंभीर गुह्यांची नोंद असलेला सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. देवजी व पापारावनंतर नक्षलवादी चळवळीत आता फक्त मप्पाला लक्ष्मण ऊर्फ गणपती आणि मिशिर बेसरा हे दोनच नेते आत्मसमर्पण व्हायचे बाकी आहेत. गणपती याची तब्येत बिघडली असून तो भूमिगत आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी गणपतीस भावनिक आवाहन करताना म्हणाले की, त्याने स्वतः आत्मसमर्पण करावे. सरकार त्याच्या उत्तम उपचारांची आणि सुरक्षेची, पुनर्वसनाची पूर्ण हमी देते. त्याने लोकशाहीच्या मार्गावर यावे. गणपतीचा मुलगा श्रीनिवास राव हा सॉफ्टवेअर इंजिनीअर असून परदेशात नोकरी करीत आहे. 10-15 दिवसांपूर्वी 130 नक्षलवाद्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसमोर शरणागती स्वीकारली. त्या वेळी त्यांनी 31 एके-47 रायफल्स, 21 इन्सास रायफल, 20 एसएलआर रायफल, एक इन्सास एलएमडी रायफलसह दारूगोळा सुपूर्द केला. तेथील पोलीस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांनी सांगितल्याप्रमाणे नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करल्यावर आता तेलंगाणात नक्षलवाद्यांची कोणतीही राज्य समिती अस्तित्वात नाही. 124 आधुनिक शस्त्र्ाs आणि पाच हजारांपेक्षा अधिक काडतुसे जमा झालेली असून आता नक्षलवादी संघटना शेवटची घटका मोजत आहे. तेलंगणातील स्पेशल ‘इंटेलिजन्स गुप’च्या प्रमुख बी. सुमती यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे 590 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात माओवादी सर्वोच्च नेता देवजीचासुद्धा समावेश होता.

नक्षली चळवळीचा खात्मा करण्यासाठी केलेल्या सुरक्षा यंत्रणांच्या कारवायांमध्ये सीपीआय माओवादी केंद्रीय समिती सदस्यांसह 500 हून अधिक नक्षलवादी चकमकीत मारले गेले. या संघटनेचा सर्वोच्च नेता नंगाला केशवराव ऊर्फ बसवराजू आणि माडवी हिडमाच्या मृत्यूमुळे नक्षली चळवळीची ऐतिहासिक पीछेहाट झाली.

नक्षलवाद्यांनी गेल्या पाच दशकांत केलेल्या हिंसाचारामुळे देशाचे भयंकर आर्थिक व सामाजिक मोठे नुकसान झाले. या हिंसक संघर्षात 2004 पासून 31 मार्च 2025 पर्यंतच्या कालावधीत जवळपास नऊ हजार लोकांची हत्या झाली. ही जीवहानी फार मोठी आहे. याच कालावधीत जवळपास दोन हजार सुरक्षा दलाच्या जवानांनी प्राण गमावले. देशातील नक्षलवाद्यांच्या अखत्यारीतील गावातील पूल, रस्ते, रेल्वेमार्ग आणि वीजवाहिन्यांचे लाखो-करोडो रुपयांचे नुकसान झाले. गावातील पायाभूत सुविधांचेसुद्धा नुकसान झाले. आदिवासी समाजाच्या प्रगतीच्या वाटेवर त्यांनी सुरुंग पेरले. फसव्या क्रांतीची स्वप्ने दाखवून निरपराध नागरिकांचे प्राण घेतले. तरुण वयातील मुलामुलींच्या हातात शस्त्र देऊन त्यांना शिक्षण व प्रगतीपासून वंचित केले.

सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडल्याने या चळवळीस धक्के बसू लागले आहेत. महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा पोलिसांनी समन्वय ठेवून, नियोजन करून, डावपेच आखून धाडसी कारवाया करीत टप्पाटप्प्यांनी माओवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे या दहशतीस आळा बसला आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आता अतिसंवेदनशील गटातून मुक्त झाला आहे. अर्थात संपूर्ण नक्षलमुक्ती खरंच होईल का, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला भविष्यातच मिळू शकेल. चंद्रपूर, गडचिरोलीत आता अब्जावधी रुपयांची गुंतवणूक होऊन नवे उद्योगधंदे उभारले जाऊ लागल्याने तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ लागले आहे. शिक्षण, आरोग्य सेवा, पायाभूत विकासाचे कार्य या क्षेत्रातून सरकारी योजनेमुळे होऊ लागले आहे.