लेख – शिक्षणातील काही गोड गैरसमज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विजय पांढरीपांडे

आपल्याकडील शिक्षण क्षेत्रात कोर्सेस आणि विषयांबाबत अनेक गोड गैरसमज आहेत. गणित आणि विज्ञान विषय घेणारे, मेडिकल-इंजिनीअरिंग आणि आयटीकडे जाणारे विद्यार्थी हुशार आणि कला-वाणिज्य शाखा निवडणारे कमी हुशार कशी एक अकारण विभागणी पालकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांनीच केली आहे. खरे तर हे आणि इतरही अनेक गैरसमज दूर करण्याची गरज आहे. कुठलेही शिक्षण शैक्षणिक शाखा, विषय श्रेष्ठ किंवा दुय्यम नाहीत.

शाळेत, कॉलेजात कोर्सेसची, विषयांची निवड करताना पूर्वापार चालत आलेला गोड गैरसमज आधार समजला जातो. गणित, सायन्स घेऊन इंजिनीअरिंग, मेडिकलकडे जाणारी मुले हुशार! त्यांच्या खालोखाल गुण मिळवणाऱ्यांनी कला, वाणिज्य घेऊन समाधान मानायचे! हा सपशेल चुकीचा समज आहे. अभ्यासाच्या सर्वच शाखा सारख्याच तोलामोलाच्या असतात. प्रावीण्य मिळविण्यासाठी खोलात जाऊन अभ्यास करायचा तर प्रत्येक विषयासाठी सारखीच मेहनत घ्यावी लागते.तितकाच वेळ द्यावा लागतो. सारखेच परिश्रम घ्यावे लागतात. पण दुर्दैवाने समाजात जसे जातीधर्माचे वर्ग निर्माण झाले, तसेच शिक्षण क्षेत्रातदेखील अशा पोलादी भिंतींनी बांधलेले भिन्न वर्ग तयार झाले.
जी मुले गणित, सायन्स घेऊन इंजिनीअरिंग-मेडिकलकडे जातात ती भारी हुशार, बाकी दुय्यम असा गैरसमज समाजात पसरला आहे. काही मुलांना यामुळे न्यूनगंड निर्माण होऊन त्रास होतो. शिक्षक, पालक सगळेच हा भेदभाव निर्माण करण्यात सहभागी असतात.

गणितात एकच उत्तर असते. सायन्समध्ये कृती ठरलेल्या असतात. पण कला, वाणिज्य, इतिहास यात एकाच विधानाचे, संकल्पनेचे वेगवेगळे अर्थ काढता येतात. गणिताची प्रमेये, समीकरणे, सायन्सची विधाने, व्याख्या, सूत्रे ही समजायला कठीण, किचकट, गुंतागुंतीची असतात हे खरे, पण ते काठिण्य इतर विषयांतदेखील असतेच. ग्रेस यांची कविता समजणे तितकेच कठीण. जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांतील प्रतिमांचे अर्थ लावून त्यांचे आकलन करणे तितकेच कठीण. पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या संकल्पना, भारतीय अध्यात्म, इतिहासातील वेगवेगळ्या युद्धाचे, जय-पराजय यांचे विश्लेषण हे वेगवेगळ्या अंगांनी बघितले तर विभिन्न निष्कर्ष निघू शकतात.

गणित, सायन्स हे पायरी पायरीने चढत जाण्यासारखे. तिथे इच्छित स्थळी पोहोचता येते कष्ट घेतले तर. महाभारत, गीता यांचे विश्लेषण समजायला, पचवायला तितकेच कठीण. म्हणूनच गीतेवर कितीतरी भाष्ये लिहिली गेली, वेगवेगळे अर्थ काढले गेले.

कला, इतिहास, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र यात समजलेले स्वतःच्या भाषेत, स्वतःचे आलं करीत लिहावे लागते. भाषेवर त्यासाठी प्रभुत्व हवे. विद्यान, गणिताची ठरलेली भाषा असते. सूत्रात, समीकरणात लिहिता येते. लेखन कौशल्य, संवाद कौशल्य याची कसोटी लागते आर्टस्, सोशल सायन्स अशा विषयांचे प्रश्न सोडवताना. तिथे भाषा कौशल्य, व्याकरण, विषयाची मुद्देसूद मांडणी, सारेच महत्त्वाचे असते. कठीणदेखील असते.

एक साधे उदाहरण घेऊ. माडगूळकरांची एक कविता (गीत) आहे. “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’’ मुळात हा एक इंग्रजी कवितेचा सुंदर अनुवाद आहे. त्यात दोन बदलांची गोष्ट तीन कडव्यात सांगितली आहे. आपण भावगीत म्हणून ते ऐकले आहे. पण किती जणांनी खोलात जाऊन त्याचा मूळ अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे? त्यात दडलेला वंशवाद, रंगभेद शोधण्याचा, त्या कवितेचे वेगळे परिमाण शोधण्याचा प्रयत्न केला आहे?

‘साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे.’

असे एक सुंदर काव्यवचन आहे. हा असा आशय शोधताना साहित्याच्या विद्यार्थ्यांनादेखील गणिताच्या विद्यार्थ्यांइतकीच मेहनत घ्यावी लागते. सखोल अभ्यास करावा लागतो. मानवी स्वभाव, वर्तन समजून घेणारे मानसशास्त्रदेखील तितकेच गुंतागुंतीचे असते. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक केस वेगळी असते. तिथे विशिष्ट पुस्तकी ठोकताळे कामी येत नाहीत.

सध्याच्या युद्धाचेच उदाहरण घ्या. कुणीही छातीठोकपणे त्यामागची मूळ कारणे, भूमिका, त्यांचे दूरगामी परिणाम, कुणाचे काय फायदे-तोटे.. हे सांगू शकणार नाही. आपल्या प्रत्येकाच्या भूमिका बायएस्ड असू शकतात. हत्ती जसा सात आंधळ्यांना वेगवेगळा दिसतो, तसेच हे. मग या युद्धशास्त्राचा अभ्यास करणारे गणिती शास्त्रज्ञ यांच्यापेक्षा कमी दर्जाचे कसे काय ठरवायचे?

प्रतिष्ठा व पगार गणित, सायन्स घेऊन इंजिनीअरिंग, मेडिकल करणाऱ्यालाच जास्त मिळतो,आयटीवाल्यांची कॉलर जास्त ताठ हा एक गोड गैरसमज. पगार, उत्पन्न हे तुमच्या पदवी, श्रेणीवर अवलंबून नसते. अनेक न शिकलेली, कमी शिकलेली माणसे व्यापार-उद्योगात भरपूर पैसा कमावतात. सुप्रीम कोर्टातला वकील आधीच्या निकालावर स्टे आणण्यासाठी पाच मिनिटेच युक्तिवाद करतो. पण त्याची त्या कामाची फी आयटी, इंजिनीअरच्या मासिक पगारापेक्षा जास्त असते! पदवीधर नसलेला बिल्डर करोडोची कमाई करतो. त्याचीही समाजात तितकीच प्रतिष्ठा असते.

त्यामुळे पाल्य, पालक यांनी या संभ्रमातून बाहेर आले पाहिजे.गणित, सायन्सला श्रेष्ठत्व देऊन इतर विषयांना कमी, दुय्यम लेखणे थांबवले पाहिजे. कला, संगीत, नाटय़, साहित्य, तत्त्वज्ञान, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र हे इतर विषय तितकेच महत्त्वाचे, तितकेच कठीण आहेत. खोलात जाऊन अभ्यासायचे ठरवले तर!
आता तर नव्या शैक्षणिक धोरणामुळे विषय निवडीत स्वातंत्र्य आले आहे. लवचिकता आली आहे. त्याचाही विद्यार्थ्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे. एकाच विषयाचा, एकाच मार्गाचा, एकांगी ध्यास न घेता, आपल्या आवडत्या विषयासोबतच इतर सगळ्याच विषयांत रस घेतला पाहिजे. खरे तर बारावीपर्यंत आपल्याला बेसिक सगळे विषय थोड्याफार प्रमाणात समजलेले असतात. त्यानंतर मला काय आवडते, मला काय जमते, सोपे वाटते, मी काय करू शकतो (काय करू शकत नाही), काय केल्याने मला आनंद मिळणार आहे, असे प्रश्न स्वतःला विचारत आपला मार्ग आपणच शोधला पाहिजे. कुणा इतरांच्या नादी न लागता, प्रेशरखाली न येता आपली भूमिका तयार केली पाहिजे. हे करताना अमुक कठीण असते, ते सोपे असते, हेच चांगले असते, त्याला भाव नाही..अशा भ्रामक समजुतीतून बाहेर पडले पाहिजे. कोणताही मार्ग सोपा नसतो. कोणताही विषय कठीण नसतो. प्रत्येक ठिकाणी साधना, अभ्यास, परिश्रम करावेच लागतात ही खुणगाठ मनात बांधली पाहिजे. तरच आपला पुढचा प्रवास सुखाचा, सुसह्य होतो. एरवी खाचखळगे हे प्रत्येक वाटेवर असतातच हेही नीट ध्यानात ठेवले पाहिजे.

मी स्वतः गणित, सायन्सचा विद्यार्थी, इंजिनीअरिंगचा प्राध्यापक असून हे सगळे लिहितो आहे यातच सारेकाही आले!