दिल्ली डायरी – अध्यक्षपदाचा ‘हंगामी हंगाम’ किती काळ?

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

भाजपच्या अध्यक्षपदाचा पेच कायम असताना उपराष्ट्रपतीपदाचा नवा तिढा आता निर्माण झाला आहे. ‘सामाजिक संतुलनाच्या कसरतीच्या झोक्यावर सध्या भाजप झोके घेतो आहे. या नव्या नावांवर नागपूरकरांनी मोहोर उमटवली तरच त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे पेचात पेच आहे. वर्षभरानंतरही नड्डांचे हंगामीपद कायम आहे. पुढे अजून किती दिवस नड्डांचाहंगामी हंगामसुरू राहतो, ते समजेलच. मात्र वर्षभरात अध्यक्ष निवडल्याने भाजपच्या प्रतिमेस धक्का बसला आहे हे नक्की!

‘जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष’ अशी बिरुदावली मिरवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष अजूनही निवडता आलेला नाही. वर्ष उलटले तरी अध्यक्षपदाचा दिवाणखाना रिकामाच आहे. जे.पी. नड्डा हे हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. ‘कौन और कब बनेगा नया बीजेपी अध्यक्ष?’ या प्रश्नाची उत्तरे देता देता भाजप नेत्यांची त्रेधातिरपीट उडत आहे.

एकीकडे भाजपच्या अध्यक्षपदाचा पेच कायम असतानाच ‘घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे’ अशा पद्धतीने आता अनपेक्षितपणे उपराष्ट्रपतींच्या निवडीचाही नवा पेच सत्ताधारी पक्षापुढे निर्माण झाला आहे. भाजप अध्यक्षाची निवड अगोदर होईल की उपराष्ट्रपतींची, यावर सोशल मीडियात मीम्सना कोसी नदीला यावा तसा महापूर आला आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते त्यावर अध्यक्षपदाचाही उमेदवार अवलंबून असेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपच्या अध्यक्षपदाचा मुहूर्त मोदींच्या पंचाहत्तरीपूर्वी तरी लागतो की नाही? असा खोचक सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

मोदी-शहा व राष्ट्रीय स्वंयसेवक संघातील मतभेदांमुळे भाजपच्या अध्यक्षांची निवड लांबणीवर पडलेली आहे. दिल्लीकरांना सांगकाम्या अध्यक्ष हवा आहे, तर नागपूरकरांना भविष्यातील राजकारणाचा विचार करून पक्ष संघटन उभे करण्याची क्षमता असणारा व स्वतंत्र राजकीय प्रतिभा असणारा अध्यक्ष हवा आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी तणातणी कायम आहे. साहजिकच अध्यक्षपदी अजूनही कोणाची निवड झालेली नाही. नितीन गडकरी, राजनाथ सिंह, शिवराजसिंह चौहान ही संघाकडून शिफारस करण्यात आलेली नावे आहेत. मात्र ही सगळीच नावे महाशक्तीच्या डोळ्यांत खुपणारी आहेत. महाशक्तीने मनोहरलाल खट्टर, भूपेंद्र यादव, धमेंद्र प्रधान अशी नावे नागपूरला पाठविली आहेत. नागपूरकरांनी त्यावर फुली मारलेली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाचा पेच अधिकच गंभीर झाला आहे. सत्तेत असणारा सर्वशक्तिमान असा एक पक्ष आपला अध्यक्ष एक वर्षापासून निवडू शकत नाही ही खरोखरीच शोकांतिका आहे. भाजपमध्ये ‘ऑल इज नॉट वेल’ हेच या घडामोडी ध्वनित करत आहेत.

भाजपच्या अध्यक्षपदाचा पेच कायम असताना उपराष्ट्रपतीपदाचा नवा तिढा आता निर्माण झाला आहे. ‘सामाजिक संतुलना’च्या कसरतीच्या झोक्यावर सध्या भाजप झोके घेतो आहे. या नव्या नावांवर नागपूरकरांनी मोहोर उमटवली तरच त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे पेचात पेच आहे. वर्षभरानंतरही नड्डांचे ‘हंगामी’ पद कायम आहे. पुढे अजून किती दिवस नड्डांचा ‘हंगामी हंगाम’ सुरू राहतो, ते समजेलच. मात्र वर्षभरात अध्यक्ष न निवडल्याने भाजपच्या प्रतिमेस धक्का बसला आहे हे नक्की!

पडताळणीवरून खडे बोल!

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीची फेरपडताळणी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे बिहारमध्ये जनतेत तीव्र नाराजी आहे. जनतेची नाराजी संसदेच्या अधिवेशनातही उमटत आहे. याच मुद्दय़ावरून संसदेच्या पहिल्या आठवडय़ात कामकाजदेखील चालू शकले नाही. सामान्यतः निवडणूक आयोग जास्तीत जास्त लोकांना मतदार यादीत सामील करून त्यांना जास्तीत जास्त मतदानासाठी उद्युक्त करत असतो. मात्र ज्ञानेश पुमार मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यापासून निवडणूक आयोगाने मतदार यादीतून नावे कशी वगळली जातील, यासाठी मोहीम हाती घेतली आहे. बिहारमध्ये पन्नास लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली गेल्याने सर्वच राजकीय पक्षांत नाराजी आहे. विरोधी पक्षांनी तर यावर रणपंदन उठवले आहे. मात्र भाजपचाच सहकारी पक्ष असलेल्या नितीशबाबूंच्या संयुक्त जनता दलानेही निवडणूक आयोगावर आता सडपून टीका करायला सुरुवात केली आहे. जेडीयूचे खासदार गिरीधारी यादव यांनी लोकसभेत निवडणूक आयोगावर कठोर भाषेत टीका करताना भाजपला योग्य तो इशारा दिला आहे. बिहारमध्ये नितीश कुमारांना सत्तेतून बेदखल करून त्यांच्याच कुबड्या घेऊन भाजपचा मुख्यमंत्री बसविण्याचा डाव आहे. नितीशबाबूही भाजपची तिरपागडी चाल ओळखून आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भलेही नितीश कुमार असले तरी निवडणुकीनंतर बिहारमध्ये काहीही घडू शकते. त्यामुळे बिहारमधले आपले मूल्य व उपद्रव मूल्य कायम राखण्यासाठी नितीशबाबूंनी आता भाजपला दमात घ्यायला सुरुवात केली आहे. मतदार यादीतील घोळावरून गिरीधारी यांनी लोकसभेत जे खडे बोल सुनावले ते बेजोड होते.

मोदींचा ‘विक्रम

नरेंद्र मोदी यांनी सलग 4 हजार 78 दिवस पंतप्रधानपद भूषवून इंदिरा गांधी यांचा ‘विक्रम’ मागे टाकला. एरवी मोदीसाहेब मायदेशी असते तर त्याचा मोठा जल्लोष व उत्सव साजरा केला गेला असता. मात्र संसदेचे अधिवेशन सुरू असतानाही सध्या ते विदेश दौऱ्यावर आहेत. वयाच्या पंचाहत्तरीनंतर संबंधित नेत्याला सक्तीने सार्वजनिक जीवनातून निवृत्त करून ‘मार्गदर्शक मंडळी’त टाकण्याचा भाजपमध्ये प्रघात सुरू झाला तो नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच. मोदींनी आपले ‘गुरू’ लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशींना पहिल्यांदा या मार्गदर्शक मंडळीत टाकून त्यांना ‘गुरुदक्षिणा’ दिली ! प्रत्यक्षात आता नरेंद्र मोदीच सप्टेंबरमध्ये वयाची पंचाहत्तरी पूर्ण करत आहेत. सप्टेंबरनंतर मोदी पंतप्रधानपदी राहतात की नाही, याविषयी राजकीय वर्तुळात मोठे तर्कवितर्क ऐकायला मिळतात. मोदींनी सन्मानाने पायउतार व्हावे यासाठी संघाने त्यांना सुचविल्याचेही कानावर पडते. रेशीमबागेत मोदींच्या उपस्थितीत त्यांचा ‘रिटायरमेंट प्लॅन’ ठरविला गेल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात काय घडते हे पाहण्यासाठी सप्टेंबरपर्यंत थांबावे लागेल. मोदी रिटायर झालेच तरी सलग सर्वाधिक दिवस पंतप्रधान म्हणून काम करण्याचा विक्रम आपल्या नावावर कोरला गेला हे किमान समाधान तरी त्यांच्या ठायी असेल.