>> जे. डी. पराडकर
कास पठारावरील सौंदर्याच्या तुलनेत कोकणची पठारंदेखील आपलं महत्त्व अधोरेखित करतात. सध्या कोकणातील पठारं विविध रंगांच्या रानफुलांनी बहरलेली असल्याचे पाहायला मिळतात. वाऱ्याच्या मंद झुळकांवर आनंदाने डोलणारी रानफुले पाहिली की, निसर्गाच्या सौंदर्याची खरी अनुभूती येते.
उन्हाळ्यात आपले भेसूर रूप दाखवणारे उंच आणि भलेमोठे कातळ रात्रीच्या वेळी भीतीदायकच वाटतात. माणसाच्या मनात उमटणाऱ्या विविध आकृत्या या विशाल कातळांकडे पाहताच त्यावरदेखील उमटत असल्याचा भास होऊ लागतो. कातळ उभा असो अथवा विस्तीर्ण पसरलेला, त्याचा कठीणपणा नजरेलाही जाणवतो. रखरखीत उन्हात कुरूप दिसणाऱया या कातळांनाही कधीतरी सजावसं वाटतं. अशी संधी या कातळांना वर्षातून एकदाच मिळते. पाऊस कमी होऊन ऊन पडू लागताच हिरवेगार असणारे कातळ सडे आनंदित होतात. त्यांना होणारा आनंद म्हणजेच विविध आकारांची आणि रंगांची लहानमोठी रानफुले.
निसर्गामध्ये असणारी कमालीची ताकद यानिमित्ताने दिसून येते आणि सृष्टी या भूतलावरील खरा जादूगार असल्याची अनुभूती येऊ लागते. श्रावण महिन्यापासून सुरू झालेला हा रानफुलांचा हंगाम पुढे आश्विन महिन्यापर्यंत कायम असतो. हे तीन मराठी महिने हिंदू संस्कृतीत व्रतवैकल्ये आणि विविध सणांचे असल्याने सृष्टी मानवाला असंख्य फुले उपलब्ध करून मानवापुढे कृतज्ञता व्यक्त करत असते. सध्या सर्वत्र कोकणातील पठारं विविध रंगांच्या रानफुलांनी बहरलेली असल्याचे पाहायला मिळते.
उन्हाळ्यात रखरखीत भासणारे हे सगळे पावसाळ्यात मात्र कात टाकू लागतात. कोकणातील सड्यांवरील कातळ जांभा असल्याने तो काळ्या कातळाच्या तुलनेत नरम असतो. या जांभ्या दगडाचा उपयोग घरबांधणीसाठी केला जात असल्याने अनेक ठिकाणी सडय़ांवर जांभ्या दगडाच्या उत्खननासाठी खाणी लावल्या जातात. या उत्खननामुळे सडय़ांवरील पावसाळ्यातले हे सौंदर्य काहीसे बाधित होऊ लागले आहे.
ऊन-पावसाच्या खेळांतून पडणारे इंद्रधनुष्य, त्याच्या जोडीने डोंगररांगांमधून दाटून येणारे दाट धुके, त्यातूनच अवचितपणे पडणारे सोनेरी ऊन… अशा निसर्गाच्या मुक्त उधळणीमध्ये सह्याद्रीच्या कुशीपासून थेट समुद्र किनारपट्टीच्या विविध भागांतील कातळ परिसर विविधांगी रंगीबेरंगी फुलांनी खुलला आहे. एरवी काळा तुळतुळीत, काहीसा भेसूर आणि कोरडा दिसणारा कातळ परिसर सध्या आकर्षक फुलांनी असा काही खुलून गेला आहे की, पाहणाऱयाच्या नजरेचे पारणे फिटावे. सहा-सात इंच उंचीच्या इवल्याशा रोपटय़ांवर फुललेल्या फुलांनी खुललेले निसर्गसौंदर्य मनामध्ये साठविण्यासाठी पर्यटकांची पावले त्याकडे वळली नाहीत तर नवलच.
प्रत्येक पठाराचं महत्त्व जरी भिन्न असलं तरी कास पठारावरील सौंदर्याच्या तुलनेत कोकणची पठारंदेखील आपलं महत्त्व अधोरेखित करत आहेत. कोकणातील प्रत्येक पठारावरील कातळावर पावसात आणि विशेषत: श्रावण महिन्यात फुलणारी रानफुलं भिन्न प्रकारची आहेत. निसर्गाच्या या सौंदर्याला बाधित न करता पर्यटनदृष्टय़ा त्याचे महत्त्व वाढविणे प्रशासनाला अद्याप न जमल्याने कोकणचे हे सडे अप्रतिम सौंदर्याने नटूनदेखील पर्यटकांपासून मात्र वंचित राहात आहेत. ठिकठिकाणी उंचावून कोसळणारे धबधबे आणि त्याच्या जोडीने निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल नजरेचे पारणे फेडते. गेल्या काही दिवसांपासून कातळ परिसर मात्र रंगीबेरंगी फुलांनी साजशृंगार केल्यासारखा सजला आहे. अशाच प्रकारची सहा-सात इंच उंचीच्या इवल्याशा रोपटय़ांना निळय़ाशार रंगाच्या फुलांसह अन्य फुले आली आहेत. आता फुलांना बहर आला असून निळ्या-जांभळ्या-पांढऱया रंगाच्या या फुलांचे सौंदर्यही चांगले खुलले आहे. इंद्रधनुष्यातील रंगांप्रमाणे सप्तरंगांची फुले माळरानांवर आपले अधिराज्य गाजवत आहेत. खरं तर कोकणच्या माळरानांवर फुलणारी ही रानफुले म्हणजे निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांना एक सुवर्णसंधीच मानली पाहिजे. यातील असंख्य फुलांचे अजूनही नामकरण होणे बाकी असेल. कोकणच्या माळरानावर सध्या सीतेची वेणी, द्रौपदीची वेणी, सोनवेल, कर्टूल, सोनतळ, शेरवड, कुडा, कोरंटी, गायरी, गोवीळ, गांधारी, कोंडानी, भेंद्री, हळुदा, तेरडा, दूधवेल, नावळी, हरणतोंडी, कळलावी, रानहळद, कवळा, घाणेरी, रानमोडी, कोसमोस, कारवी (ही नऊ वर्षांतून एकदा फुलते) डिकेमाळी, टोपली, सोनकी, गवळण, कुमुदिनी, गंधारी, अग्निशिखा यांसह अनेक प्रकारची रानफुले बहरलेली पाहायला मिळत आहेत. कोकणात येणाऱया पर्यटकांसाठी निसर्गसौंदर्याच्या अभ्यासाची ही एक अनोखी पर्वणी ठरत आहे.