मुद्दा – समाज म्हणून आपण कमी पडत आहोत का?

>> प्रिया भोसले

नुकतीच  वसईत एक भयंकर घटना घडली. भररस्त्यात एका तरुणीची तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केली. जोवर तिचा जीव जात नाही तोवर तिच्यावर लोखंडी शस्त्राने घाव घालत होता. दिवसाढवळय़ा त्या तरुणीची हत्या होत असताना एका व्यक्तीचा अपवाद सोडला तर आसपास असणाऱ्या कुणालाही तरुणीचे प्राण वाचवण्यासाठी पुढे यावे वाटले नाही, जे जास्त वेदनादायी आहे. वृत्तपत्रांना ‘माणुसकी हादरली’सारखी हेडलाईनही देता येणार नाही इतकी लोक निष्ठूर वागली आहेत. यावरून इतकेच कळते, मुलींवर प्राणघातक हल्ले होणे समाजाने शांतपणे स्वीकारले आहे आणि हे भयावह असले तरी सत्य आहे. प्रत्यक्ष गुन्हा घडतानाही सहजतेने वावरणारी माणसे आणि कायदे असूनही अशा वाढत जाणाऱ्या घटना समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत ते नेमके प्रतिबिंबित करत आहे. म्हणायला फक्त काळ पुढे चाललाय, पण लोकांच्या मानसिकतेत परिवर्तनाचा अंश दिसत नाही.

स्त्रीने प्रेम करू नये, त्या हक्काला तिलांजली द्यावी. जिवाची काळजी असेल तर जीवनसाथी निवडीचा अधिकार तिने वापरू नये आणि त्याविरुद्ध ‘ब्र’ही काढू नये. पण तो प्रमाद तिच्याकडून झालाच तर नात्यातून स्वतःच्या इच्छेने बाहेर पडू नये. यापैकी काही जमले नाही तर नकार पचवायची पुरुषी मानसिकता नाही हे तिने लक्षात ठेवायला हवे. नाहीतर तिचे तुकडे तुकडे केले जातील किंवा भररस्त्यात तिच्यावर हल्ला होऊन वेदनादायी मृत्यू येऊ शकतो. आजही स्त्रियांच्या कपडय़ांवरून देशाची संस्कृती ठरवणाऱ्या विचारांची मुळे दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत चाललीय. मुलींना प्रेम करण्याचे अधिकार नाहीत. तो अधिकार तिने वापरलाच तर तिने तिच्या कर्माची फळे भोगावीत असेही विचार करणाऱयांचे प्रमाण कमी नाही. संस्कृतीसारखे गोंडस नाव देऊन स्त्रीचे दैवतीकरण करून मंदिरातल्या मूर्ती बनून राहणाऱ्या देवासारखी अवस्था करून ठेवलेली आहे.

विकृत पुरुषी मानसिकतेच्या बळी जाणाऱ्या असंख्य स्त्रिया बघूनही समाजाचे डोळे उघडत नाही हे आपले दुर्दैव. कालच्या घटनेचे साक्षीदार असणारे लोकही मुलीच्या मृत्यूला त्या खुनी मुलाइतकीच जबाबदार आहेत. न पटणाऱ्या मुद्दय़ावर सोशल मीडियावर तावातावाने मते मांडणारी, वेळोवेळी परस्परांचा निषेध व्यक्त करणारे लोक ती घटना घडत असताना तिथे फक्त बघ्याची भूमिका घेताना बघून वाटते आता निषेध फक्त लिखाणापुरताच उरलाय. वेळ आल्यावर त्यातले काहीही उपयोगी पडत नाही. सध्या आपण अशा समाजात राहतो जिथे काही लाईक्ससाठी जीव वाचवण्याऐवजी जीव जातानाचे चित्रण करण्यात लोक पुढे असतात. हे चित्र विदारक आहे.

या सगळय़ात मुलींच्या पालकांची अवस्था मात्र दयनीय आहे.  मुलीला करीअरसाठी बाहेरचे अवकाश उपलब्ध करून देताना तिच्या चिंतेने जीव मुठीत घेऊन जगण्याचा संघर्ष त्यांचा रोजचा झालाय. मुलीचे प्रेमप्रकरण असेल तर पुढे जाऊन त्याची परिणीती कोणत्याही भयंकर घटनेत होऊ नये म्हणून अस्वस्थ असणारे अनेक पालक अवतीभवती आढळतील. प्रेमात पडलेल्या मुलींची तरी काय चूक?

प्रेमात पडताना मुलाचे विचार, त्याची मानसिकता सुरुवातीला लक्षात येत नाही आणि प्रथमदर्शनी विकृतीची सुतराम कल्पना नसल्यामुळे पुढे आपल्याला कशाचा सामना करावा लागेल याचीही खात्री नसल्यामुळे प्रेमासारख्या सुंदर भावनेला भीतीची किनार लाभली आहे. सध्याच्या अमानुष क्रौर्याच्या घटना पाहता वाटते स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीचा हक्क मिळण्यापेक्षा फक्त माणूस म्हणून जगायचा तरी अधिकार मिळावा. मोकळा श्वास घेता यावा. निसर्गतः मिळालेली प्रेमाची भावना जोपासताना त्याला भीतीचा स्पर्श असू नये.

आपला समाज स्त्री आणि पुरुष मिळून तयार होतो. दोघे एकमेकांना पूरक आहेत. तरीही मुलांचे कंडिशनिंग फार वेगळे होत असते. अशात मुलांना वाढवताना ‘‘तू मुलगा आहेस’’ या वाक्यापेक्षा ‘‘तू आधी माणूस आहेस’’ बदलून पारंपरिक विचारांना छेद देत प्रवाहाविरुद्ध खंबीरपणे उभे केले तर हा समाज स्त्री-पुरुष समानतेच्या आणि माणुसकीच्या पातळीवर टिकेल. अन्यथा शतकानुशतके चालत आलेली सामाजिक विषमता अधिक उग्र रूप धारण करेल.

या पुढे ती अस्वस्थता अजून किती काळ मूकदर्शी बनून बघत राहील हा प्रश्न समाजमनाला भेडसावतो आहे.

[email protected]