निमित्त – संस्कृती आणि परंपरांचे जतन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सीमा श्रीराम मोडक

आपल्या संस्कृतीत प्रेम हे काही देऊन दर्शवले जात नाही, तर त्याग आणि समर्पणातून दाखवले जाते. कोणताही सण, उत्सव अथवा परंपरा कुटुंबाभिमुख, समाजाभिमुख असावे ही आपली संस्कृती. अशी संस्कृती जपण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.

सध्या सगळ्या `डे’चं खूपच पीक आलंय. अर्थात दरवर्षीच ते येतं. सध्याचा काळ हा मार्केटिंगचा. मार्केटिंगचे गणित अशा `डे’ संस्कृतीसाठी अगदी पोषक ठरणारे मात्र त्याचा बळी ठरत कशाचेही अनुकरण होऊ याबाबत आपण ठाम राहायला हवे. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करताना त्यातील चांगले-वाईट काय निवडावे हे आपली संस्कृतीच आपल्याला शिकवते. आपल्या संस्कृतीचं, आहार, विहार, विचारांचं, आपली भगवद्गीता आणि इतर ग्रंथांचं, आध्यात्मिक संस्कृतीचं अनुकरण इतर देशातील लोक करताना आढळतात.

खरंतर भारतीय संस्कृती आणि आपले विविध सण-उत्सव हे शास्त्रीयदृष्टय़ा आध्यात्मिक झालर लावून आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक सुरू केले असावेत असं मला वाटतं. आपला प्रत्येक सण, उत्सव हा सगळ्यांना भरभरून आनंद देणारा असतो. त्यात कोणालाही ताणतणाव, भीती असूया निर्माण करणारा नसतो. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तरुण-तरुणींच्या आई-वडिलांना भीती असू शकते, तर काही युवती भीतीमुळे घराबाहेर पडणे टाळतात. कॉलेजमध्ये काही वेळेस या दिवशी तणावाचं किंवा वादाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. पण आपल्या संस्कृतीत लग्नापूर्वी मुली मनापासून चांगला जोडीदार मिळावा म्हणून हरितालिकेची पूजा करतात. त्यांच्या आयादेखील त्यांना पूजा, उपवास करायला अगदी आनंदाने सांगतात.

या निमित्ताने घरातील मंडळी जणू काही त्या मुलीला विश्वासात घेऊन सांगतात की, तिच्या लग्नाची काळजी त्यांना आहे. उपवासातून मनावर संयम ठेवण्याचा संस्कार तिला दिला जातो. पूजा करताना निसर्गातील विविध झाडावेलींची नावे तिला कळतात. नकळतपणे देण्याची वृत्ती तयार होते. पूजेला आलेल्या महिलांकडून संस्कृतीची ओळख होऊन त्यांचे जतन करण्याची मानसिकता तयार होते. माहीत नसलेल्या पण भविष्यात होणाऱ्या जोडीदारासाठी उपवास आणि पूजा करण्याची आपली संस्कृती महान आहे. याच वयात उपवास करून साथीदारासाठी त्याग करण्याची संस्कृती, संस्कार आपल्या संस्कृतीत दिले जातात.

अगदी याप्रमाणेच विवाहित महिला आपल्या साथीदारासाठी वटपौर्णिमेचा उपवास करून, वडाच्या झाडाची पूजा करतात. यामुळे निसर्गाच्या सानिध्यात येऊन वडाच्या झाडाचे महत्त्व समजून आणि सर्वच वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून वृक्षारोपण करण्याचा संस्कार रुजवला जातो. हरितालिका किंवा वटपौर्णिमा यांसारख्या सणांमुळे महिला एकमेकांच्या सहवासात येतात. ओळखी होतात; सुखदुःखाच्या गप्पा होऊन आपलेपणा वाढतो. विचारांची देवाण-घेवाण होऊन असे सण उत्सव उत्साहात साजरे होतात. आपले कोणतेही सण आणि उत्सव कोणाला न कळता एकांतात साजरे होत नाहीत हे अतिशय महत्त्वाचे आहे.

आपल्या संस्कृतीत प्रेम हे काही देऊन दर्शवले जात नाही, तर त्याग आणि समर्पणातून दाखवले जाते. तसेच या प्रेमातून कोणालाही भीती, ताण-तणाव असूया निर्माण होत नाही. संपूर्ण कुटुंब आणि समाजात चैतन्याचे वातावरण निर्माण होते.

म्हणूनच व्हॅलेंटाईन डे साजरा करताना आपल्या सणांचे, उत्सवाचे आणि त्यासोबत असणाऱ्या परंपरा स्वागत करा. त्यांना कमी लेखू नका. मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी, प्रेम अखंड राहण्यासाठी आपल्या संस्कृतीतील परंपरांचा, रितीरिवाजांचा आपण आदर करायला हवा. हे उत्सव, ही संस्कृती साजरी करायला हवी, जतन करायला हवी.

(लेखिका नंदुरबार येथील डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत.)