
>> दिलीप ठाकूर
गेल्याच वर्षीची गोष्ट, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाल्यानिमित्त पुणे शहरात अशोक सराफ यांच्या सत्काराच्या वेळेस असरानींची खास उपस्थिती होती. तेव्हा त्यांनी केलेले भाषण म्हणजे धमाल किस्से आणि कोटय़ा यांची हास्याची कारंजीच होती. विनोदी कलाकार या असरानी यांच्या प्रतिमेला साजेसे असे ते दिलखुलास मनसोक्त बोलणे होते. बोलण्यातील त्यांची ऊर्जा आणि श्रोत्यांना आपलेसे करून घेण्याची कला दाद द्यावी अशी. चित्रपटसृष्टीतील दीर्घकालीन अनुभवातून घडलेले हे व्यक्तिमत्त्व आहे याचा तो सकारात्मक प्रत्यय होता.
असरानींनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले तो काळ पुणे येथील चित्रपट व दूरदर्शन अभिनय प्रशिक्षण संस्थेतून अभिनयाची पदरी घेऊन चित्रपटसृष्टीत येण्याचा होता. शत्रुघ्न सिन्हा, डॅनी डेन्झोप्पा, नवीन निश्चल, जया भादुरी, विजय अरोरा, अनिल धवन यांच्याबरोबर असरानींनी तेथेच अभिनय प्रशिक्षण घेतले. एक शॉर्ट फिल्मदेखील बनवली. मुंबईत येऊन काही चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांसाठी त्यांच्या ट्रायलचे आयोजनही केले, पण फार काही साध्य झाले नाही. पण दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जी यांचा पिच्छा मात्र असरानींनी पुरवला. ह्रषिकेश मुखर्जी ‘गुड्डी’ (1971) मधील भूमिकेसाठी जया भादुरींना करारबद्ध करण्यासाठी पुणे येथील चित्रपट व दूरदर्शन अभिनय प्रशिक्षण संस्थेत गेले तेव्हा असरानींशी त्यांची पहिली भेट झाली होती आणि जया भादुरी कॅन्टीनमध्ये आहेत हे असरानींनी त्यांना सांगितले. ह्रषिकेश मुखर्जी जया भादुरींना भेटण्यासाठी गेले असता गुलजार यांच्याकडून असरानींना समजले की, ‘गुड्डी’ या चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका मिळू शकते. तशी ती मिळाली आणि असरानी त्यानंतर ह्रषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटातील एक हुकमी कलाकार ठरले व असरानींनीही त्यांचा तो विश्वास खरा ठरवला हे ‘बावर्ची’, ‘नमक हराम’, ‘अभिमान’, ‘मिली’, ‘चुपके चुपके’, ‘आलाप’, ‘नौकरी’, ‘खुबसुरत’ या चित्रपटांत दिसले.
असरानींचे मृत्यूसमयी वय 84 वर्षे इतके होते. एकेका लहान-मोठय़ा संधीचा सदुपयोग करून वाटचाल केलेल्या अशा अतिशय मेहनती, चतुस्र व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. तब्बल 50-55 वर्षे चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेला असा हा गुणी कलाकार. असरानींनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले तेव्हा मेहमूद अतिशय लोकप्रिय असे विनोदी अभिनेता म्हणून स्थिरावले होते. जगदीप, मोहन चोटी, मुकरी, आगा, धुमाळ, सुंदर, केश्तो मुखर्जी, असित सेन, राज किशोर, व्ही. गोपाल, बिरबल, ब्रह्मचारी असे अनेक विनोदी अभिनेते कार्यरत होते. असरानींना स्वतःला सिद्ध करण्याशिवाय पर्याय नव्हताच. त्याच वेळेस पेंटल, जुगनू, जलाल आगा असे काही विनोदी अभिनेते चित्रपटसृष्टीत आले. असरानींनी अनेक दिग्दर्शकांचा विश्वास संपादन केला आणि आपली वाटचाल केली. गुलजार (‘मैरे अपने’), बासू चटर्जी (‘छोटीसीबात’), रवी टंडन (‘अनहोनी’), राजेन्द्र भाटीया (‘आज की ताजा खबर’), रमेश सिप्पी (‘शोले’), अशोक रॉय (‘कलाबाज’) अशा अनेक दिग्दर्शकांच्या चित्रपटांत असरानींना लहान-मोठय़ा भूमिका मिळत गेल्या. त्यांनी ‘हरे कांच’ या सिनेमात छोटेसे काम केले. कालांतराने असरानींनी ‘कोशिश’ आणि ‘तेरी मेहरबानी’ या चित्रपटांत त्यांनी गाणेही म्हटले. नागपूर येथील राजेश शर्मा यांच्या ‘फॅमिली 420’ या मराठी चित्रपटातसुद्धा असरानी यांनी काम केले आहे. असरानी यांच्या पत्नी मंजू बंसल असरानी यादेखील कलाकार आहेत. असरानींना सुरुवातीच्या काळात ‘गुरुजी’ म्हणत. विशेष उल्लेखनीय गोष्ट ‘बावर्ची’ (1972) च्या वेळेस राजेश खन्नाशी त्यांची दोस्ती झाली आणि मग राजेश खन्ना यांच्या ‘नमक हराम’, ‘छैला बाबू’, ‘अनुरोध’, ‘घर परिवार’ (1991) या चित्रपटांत काम केले. आपणही नायक व्हावे असे असरानींना चक्क तीनदा वाटले. चित्रपट दिग्दर्शनाची त्यांना समजही होती. ‘चला मुरारी हीरो बनने’ या नावाचाच चित्रपट त्यांनी निर्मित व दिग्दर्शित केला. तो फारसा यशस्वी ठरला नाही. तरीही नाउमेद न होता ‘सलाम मेमसाब’ (1979) आणि ‘हम नहीं सुधरेंगे’ (1980) असे चित्रपट दिग्दर्शित केले. त्यात तेच नायक होते. कालांतराने त्यांनी ‘उडान’ (यात रेखा नायिका होती. हा चक्क मारधाड चित्रपट होता.), ‘दिल ही तो है’ (यात जॅकी श्रॉफ दुहेरी भूमिकेत आहे आणि शिल्पा शिरोडकर व दिव्या भारती या दोन नायिका आहेत. मेहबूब स्टुडिओत या चित्रपटाचा मुहूर्त झाला.) या चित्रपटांचे दिग्दर्शन असरानींनी केले. असरानींनी चित्रपट दिग्दर्शक म्हणूनही वाटचाल केली ही गोष्ट दुर्लक्षित राहिली.
कसा योगायोग आहे बघा, रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ या चित्रपटाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल असरानींनी काही वृत्तवाहिन्यांना मुलाखती देताना परळ येथील राजकमल कला मंदिर स्टुडिओत आपण डबिंगचा घेतलेला अनुभव आणि या चित्रपटात साकारलेल्या जेलर हिटलर भूमिकेवर भाष्य केले. डिजिटल मीडियात तो भाग मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होत असताना काही चांगली माहितीही मिळतेय. ती रसिकांसमोर असतानाच असरानींचे निधन झाले.
असरानींच्या आणखी एक खास गोष्टीचा उल्लेख करायलाच हवा. दादा काsंडके अभिनित व दिग्दर्शित ‘पांडू हवालदार’
(1975) या चित्रपटाची हिंदीत केदार कपूर दिग्दर्शित ‘दो हवालदार’ या नावाने रिमेक करण्यात आली तेव्हा मूळ चित्रपटातील दादा काsंडके यांनी साकारलेली भूमिका असरानींनी, तर अशोक सराफ यांनी साकारलेली भूमिका जगदीप माने यांनी साकारली. विशेष उल्लेखनीय गोष्ट ‘पांडू हवालदार’ने रौप्य महोत्सवी आठवडय़ाचे यश संपादन केलेल्या गिरगावातील सेन्ट्रल चित्रपटगृहात ‘दो हवालदार’ प्रदर्शित झाला आणि आपण दादा कोंडके यांचे चाहते आहोत असे असरानींनी एका मुलाखतीत म्हटले होते. असरानींची वाटचाल सकारात्मक, यशस्वी व लक्षवेधक होती. अनेक भूमिकांसाठी असरानी आठवणीत राहतील!