सुपर इंटेलिजन्स : वरदान की धोका?

>> महेश कोळी

आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ही आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात एक क्रांतिकारी बदल घडवत आहे. ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमॅन यांनी स्पष्ट केले आहे की, एआय इतक्या वेगाने प्रगत होत आहे की, लवकरच ते सुपर इंटेलिजन्सच्या स्तरावर पोहोचू शकते. सुपर इंटेलिजन्स म्हणजे अशी यंत्रणा जी मानवी बुद्धीपेक्षा अधिक सक्षम असेल, वैज्ञानिक संशोधनात मानवी क्षमतांना मागे टाकेल आणि जीवनातील अनेक पैलूंमध्ये आमच्या समजुतीपेक्षा जास्त परिणामकारक ठरेल.

सध्या ओपनएआयने विकसित केलेले चॅटजीपीटी-5 हे काही बाबतीत मानवी बुद्धीपेक्षा अधिक सक्षम ठरत असल्याचे बोलले जात आहे. उदाहरणार्थ, माहितीचे विश्लेषण करणे, विविध भाषांमध्ये संवाद साधणे, गणिती आणि तांत्रिक समस्यांचे निराकरण करणे अशा अनेक कामांमध्ये हा चॅटबोट मानवापेक्षा वेगवान आणि अचूक ठरतो. अर्थात, काही साध्या कामांमध्ये मानवी बुद्धी अजूनही श्रेष्ठच आहे, परंतु एआयची प्रगती आणि विकास व त्याची गतिशीलता पाहता आगामी काही वर्षांत ती सर्वसाधारण कामातही मानवाला मागे टाकू शकते. आज शैक्षणिक किंवा वैज्ञानिक क्षेत्रासह आरोग्य, उद्योग, वाहतूक, वित्तीय सेवा, शिक्षण आणि रोजच्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये एआयची उपयुक्तता वाढत आहे. उदाहरणार्थ, रुग्णालयांमध्ये एआयआधारित प्रणाली रुग्णांच्या लक्षणांचे विश्लेषण करून डॉक्टरांना निर्णय घेण्यात मदत करत आहेत. तसेच आर्थिक व्यवहारांमध्ये एआय धोके ओळखून संभाव्य नुकसान टाळण्यास सक्षम ठरत आहे. यामुळे मानव आणि यंत्रणेमधील सहकार्याची नवी संकल्पना निर्माण होत आहे.

एआयच्या वाढीमुळे रोजगारावर काय परिणाम होईल, हा प्रश्न सतत चर्चेचा विषय ठरत आहे. काही लोकांचा अंदाज आहे की, एआय माणसांच्या नोकऱयांना पूर्णपणे विस्थापित करू शकते, परंतु ऑल्टमॅन यांच्या मते, एआय काही नोकऱया खरोखरच बदलेल किंवा समाप्त करू शकते, परंतु सर्व रोजगार नष्ट होतील असा अर्थ नाही. त्यांच्या अंदाजानुसार, पुढील काही वर्षांत अर्थव्यवस्थेतील सुमारे 30 ते 40 टक्के काम एआय करू शकेल. याचा अर्थ असा नाही की, सर्व लोक बेरोजगार होतील. उलट नवीन प्रकारच्या नोकऱया आणि उद्योग निर्माण होतील.

उदाहरणार्थ, डेटा विश्लेषक, एआय प्रशिक्षण तज्ञ, रोबोटिक्स अभियंते, सॉफ्टवेअर विकासक, तसेच एआय व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या नैतिक आणि कायदेशीर तज्ञांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे लोकांनी आपले कौशल्य वाढवणे, नवीन तंत्रज्ञान शिकणे आणि बदलत्या परिस्थितीसाठी तयार राहणे आवश्यक आहे. भविष्यातील कार्यसंस्कृती ही मानव आणि यंत्रणेमधील सहकार्यावर आधारित असेल.

ओपनएआय आता फक्त सॉफ्टवेअर विकसित करण्यापुरते मर्यादित राहणार नाही. कंपनी नवीन प्रकारच्या स्मार्ट डिव्हाईसवर काम करत आहे, जे आपल्याला वेगवेगळ्या अॅप्स आणि नोटिफिकेशनच्या गोंधळातून मुक्त करेल. या डिव्हाईसमध्ये फक्त एक कमांड दिल्यावर एआय आपले काम स्वयंचलितपणे करेल. ऑल्टमॅन यांच्या मते, ही तंत्रज्ञान संगणक क्षेत्रातील माऊस-कीबोर्ड आणि टचस्क्रीननंतरची तिसरी मोठी क्रांती ठरेल. या स्मार्ट डिव्हाईसमुळे व्यक्तीचा वेळ वाचेल, कार्यक्षमता वाढेल आणि दैनंदिन कामकाज अधिक सुलभ होईल. याशिवाय शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, कार्यालयीन कामकाज आणि घरगुती कामांमध्येदेखील एआयआधारित डिव्हाइस महत्त्वपूर्ण योगदान देतील.

सुपर इंटेलिजन्स म्हणजे अशी यंत्रणा जी मानवी बुद्धीपेक्षा अधिक वेगवान, अचूक आणि व्यापक विचारक्षम असते. याचे परिणाम केवळ तांत्रिक नाहीत, तर सामाजिक, आर्थिक, नैतिक आणि राजकीय क्षेत्रातही भयंकर प्रभाव टाकू शकतात. 2030 पर्यंत हे तंत्रज्ञान पाहायला मिळण्याची शक्यता असल्यामुळे मानवजातीने यासाठी तयारी करणे अत्यावश्यक आहे.

सुपर इंटेलिजन्सच्या युगात, वैज्ञानिक संशोधनात, औषधनिर्मितीत, अंतराळ संशोधनात आणि जल, अन्न, ऊर्जा यांसारख्या मूलभूत क्षेत्रांमध्ये मानवपेक्षा जास्त परिणामकारक यंत्रणा कार्यरत राहू शकते. यामुळे मानवी जीवनाची गुणवत्ता वाढेल, परंतु त्याच वेळी नैतिक, सामाजिक आणि कायदेशीर नियमांची आवश्यकता भासेल. एआयद्वारे सृष्टीच्या संसाधनांचा उपयोग अधिक न्याय्य आणि कार्यक्षम पद्धतीने केला जाऊ शकतो.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही आजच्या आणि उद्याच्या जगातील सर्वात मोठी क्रांती ठरत आहे. ही मानवी बुद्धीला वाढवणारी, रोजगाराच्या स्वरूपात बदल करणारी आणि जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये सुधारणा करणारी साधन आहे.

ऑल्टमॅन यांच्या मते, 2030 पर्यंत एआय सुपर इंटेलिजन्सच्या स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे. यासाठी मानवजातीने नवीन काwशल्ये आत्मसात करणे, नैतिक मूल्यांची जपणूक करणे आणि एआयचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे.

हिंटन यांचा इशारा

नोबेल पारितोषिक विजेता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील अग्रगण्य संशोधक जिओफ्री हिंटन यांनी यापूर्वीच इशारा दिला आहे की, एआय सुपर इंटेलिजन्स मानवतेसाठी अस्तित्वाशी संबंधित धोका निर्माण करू शकते. हिंटन यांना अनेक जण कृत्रिम बुद्धिमत्तेचे गॉडफादर असेही म्हणतात. 2024 मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकही मिळाले. त्यांनी मानवतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता संभाव्य धोका ठरू शकतो, याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. हिंटन यांचा सुपर इंटेलिजन्सबाबतचा दृष्टिकोन 1970 च्या दशकापासून खूप बदलला आहे. त्यांनी पूर्वी असा विश्वास केला की, खरी सुपर इंटेलिजन्स अजून अनेक दशकांनी येईल. मात्र चॅटजीपीटीसारख्या लार्ज लँग्वेज मॉडेलच्या विकासामुळे हिंटन आता मानतात की, यासाठी आता 5 ते 10 वर्षांचा कालावधी पुरेसा आहे.

मानवी मेंदू, ऊर्जा कार्यक्षमतेसाठी ऑप्टिमाईज्ड आहे, पण ज्ञान मिळवण्याची आणि शेअर करण्याची मर्यादा आहे. मानवी मेंदूत सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलपेक्षा जास्त कनेक्शन्स असले तरी आपला मर्यादित जीवनकाल व अनुभवांची संख्या या गोष्टी ज्ञान गोळा करणे आणि शेअर करणे यामध्ये अडथळा निर्माण करतात. या तुलनेत डिजिटल मॉडेल मानवापेक्षा जास्त हुशार ठरू शकतात. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. हिंटन यांचे 2023 च्या सुरुवातीला झालेल्या निरीक्षणानुसार, डिजिटल मॉडेल आधीच मानवी मेंदूच्या क्षमतांपर्यंत पोहोचत आहेत आणि त्याला पार करण्याची तयारी करत आहेत. यामुळे त्यांनी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींच्या विकासाला लगाम घातला पाहिजे, जेणेकरून नियंत्रण यंत्रणा विकसित करता येतील आणि संभाव्य धोके समजून घेतले जातील. हिंटन मानतात की, कृत्रिम बुद्धिमत्ता औद्योगिक क्रांतीसारखे रोजगार विस्थापित करू शकते, जिथे यंत्रांनी मानवी श्रमाची जागा घेतली. त्यांनी भविष्यवाणी केली की, बौद्धिक श्रमाच्या नोकऱया प्रभावित होतील. यामुळे मोठय़ा प्रमाणावर बेरोजगारी निर्माण होऊ शकते.