विज्ञान रंजन – नववर्षातील कृत्रिम ऊर्जा!

>> विनायक

नववर्षाची सुरुवात होऊन आठवडा उलटला आणि ‘विज्ञानरंजन’ लिहिताना गतवर्षी विज्ञानाने काय चांगलं प्राप्त केलं, असा प्रश्न पडला. कारण विज्ञानाचाच आधार घेऊन बनवलेल्या अनेक शास्त्रज्ञांनी जग युद्धाच्या खाईकडे कसं लोटलं जातंय आणि जागतिक राजकारणाच्या जंजाळात कसं गुरफटतंय याची चाहूल वर्षारंभीच लागली आहे. कोणी म्हणतं याची परिणती तिसऱया महायुद्धात होईल. तसं झालं तर मात्र तो मानवी बुद्धीचा पराभव ठरेल. कारण कोणीही जिंकलं तरी विनाश पृथ्वीचा आणि त्यावरच्या सजीवांचा होऊन निर्जीव गोष्टीही दूषित होतील, परंतु महासत्तांच्या सत्तेची झिंग काही और असते. जाऊ दे, तो आपला विषय नाही.

अशा काजळलेल्या वातावरणातही बरं काही घडतंय का याचा शोध घ्यायचा प्रयत्न करावा. अंधार दूर करते ती ऊर्जा. दिवसा सूर्याच्या ‘कृपे’ने प्रकाशाला तोटा नसतो, परंतु संध्याकाळ झाली की, कृत्रिम दिव्यांची गरज भासू लागते. दीडेकशे वर्षांपूर्वी विजेच्या बल्बचा शोधच लागला नव्हता तेव्हा मिणमिणत्या पणत्यांच्या प्रकाशात रात्र घालवण्याची सवय होती, परंतु विसाव्या शतकाच्या ‘उत्तरार्धात’ विजेच्या दिव्यांची आरास जगभर सर्वत्र पोहोचली. आता तर संध्याकाळ झाल्यानंतर पृथ्वीवर ‘रात्र’ शोधावी लागेल आणि कालांतराने ती ‘सापडणारच’ नाही अशी स्थिती होणार आहे.

रात्रीचा दिवस करणाऱया विजेच्या वापराने नंतर यंत्र चालवण्याचा वसा घेतला आणि थेट वापराच्या किंवा ‘बॅटरी’त साठवून वापरण्याच्या विजेची म्हणजेच ऊर्जेची मागणी वाढत गेली. 2024 संपलं त्या वेळी विजेची जागतिक गरज 30 हजार टेरावॉट 1 प्रतितास इतकी होती. 2025 मध्ये त्यात 3 टक्के वाढ झाली. 2026 संपेल तेव्हा विजेची मागणी प्रतितास 33 हजार टेरावॉटच्याही पलीकडे जाईल.

याचं कारण म्हणजे जगभर तळपते दिवे, इलेक्ट्रिक ट्रेन, मोटारी, बॅटरीत वीज साठवण्याची केंद्रं. वाढत्या तापमानामुळे ‘एसी’ची वाढती मागणी, शेतीचे वाढते पंप अशा अनेक कारणांनी विजेची मागणी वाढणारच आहे. अमेरिका (यूएस), चीन आणि हिंदुस्थान या तीन देशांना जगातली निम्मी वीज लागणार असून वीज निर्मितीचे नवनवे प्रयोग सुरू आहेत.

तशी वीज ही ‘क्लीन’ एनर्जी म्हणजे विजेच्या वापरामुळे प्रदूषण वाढत नाही. विजेच्या दिव्यांना कधी काजळी धरत नाही. त्यातून रॉकेलच्या पंदिलासारखा धूर निघत नाही. एका बटणावर खोली उजळण्याची किमया विजेचे दिवे करतात. या सर्व गोष्टी खऱया असल्या तरी विजेची निर्मिती मात्र प्रदूषणमुक्त, ‘स्वच्छ’ नाही. आपल्यासह अनेक देशांत वीज निर्मिती दगडी कोळशावर होते. या औष्णिक वीज निर्मितीसाठी लाखो टन कोळशाची होणारी राख आणि धूर वातावरणात मिसळून त्यातील कार्बन वाढवतो. हायडेल म्हणजे पाण्यावर जनित्र बसवून वीज निर्मिती ‘स्वच्छ’ असली तरी त्यासाठी प्रचंड धरणं उभारावी लागतात. छोटय़ा पावसाळी धबधब्यांवर जनित्र बसवून फारच कमी वीज निर्माण करता येते.

तिसरा सर्वात स्वच्छ पर्याय सौर ऊर्जेचा. मात्र फोटोव्होल्टेक सेलद्वारे किंवा अन्य प्रकारे मिळणाऱया सौर ऊर्जेची ‘ऊर्जा’ क्षमता इतर प्रकारे निर्माण होणाऱया विजेसारखी झटपट आणि स्वस्त नाही. ऊर्जा वैज्ञानिक जगात सगळीकडेच यावर प्रयोग करतायत आणि कमीत कमी प्रदूषण करणारी अधिकाधिक क्षमतेची वीज निर्मिती कशी करता येईल, यावर संशोधन करतायत.

या परिस्थितीत आशेचा किरण म्हणजे जगात दिवसेंदिवस ‘स्वच्छ विजे’चं प्रमाण वाढत आहे. 2023 मध्ये एकूण जागतिक गरजेच्या तुलनेत अपारंपरिक किंवा रिन्युएबल स्वच्छ ऊर्जेची निर्मिती 30 टक्के होत होती. ती आता 40 टक्क्यांवर पोचल्याचं वृत्त आहे. यात सौर-विद्युत आणि पवन ऊर्जेचा वाटा मोठा आहे.

याशिवाय बायोएनर्जी म्हणजे वनस्पतींपासून मिळणारी ऊर्जाही महत्त्वाची आहे. 2030 पर्यंत एकूण जागतिक ऊर्जा निर्मितीच्या 45 टक्के वाटा या अपारंपरिक पद्धतीच्या ‘स्वच्छ’ ऊर्जेचा असावा हे उद्दिष्ट चांगलं आहे. 2024 मध्ये ग्लोबल रिन्युएबल एनर्जी किंवा जागतिक अपारंपरिक ऊर्जेचे ‘मार्पेट’ एक ट्रिलियन डॉलरवर पोचलं. 2025 मध्ये त्यात निश्चितच वाढ झाली असेल.

अपारंपरिक ऊर्जा निर्मितीमध्ये आघाडीवर असलेले देश म्हणजे डेन्मार्क, ऑस्ट्रिया, स्वीडन आणि आइसलॅन्ड. या देशांतील 75 ते 90 टक्के ऊर्जा निर्मिती स्वच्छ, प्रदूषणमुक्त आहे. चीन अपारंपरिक ऊर्जेचे मोठे प्रकल्प उभारतोय. जर्मनी, यूएस, ब्राझील आणि हिंदुस्थानसुद्धा अपारंपरिक ऊर्जा निर्मिती मोठय़ा प्रमाणावर वाढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आपल्या देशाचा क्रमांक याबाबतीत चौथा लागतो ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल.

आपल्याकडे ‘सूर्यघर’ योजनेतून सौर ऊर्जेच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येतं. पवन ऊर्जेची निर्मिती वाढवण्यावर भर देण्यात येतो. याव्यक्तिरिक्त ‘बायोमास’, ‘ग्रीन हायड्रोजन’ असेही प्रकल्प आहेतच.

अशा प्रकल्पांचं वाढतं यश त्यांच्या ऊर्जा निर्मिती क्षमतेवर आणि ग्राहकाला मिळणाऱया संभाव्य घटत्या किमतीवर अवलंबून आहे. 2050 पर्यंत जगाने सर्वच ऊर्जा प्रकल्प अपारंपरिक ऊर्जेवर चालवण्याचं उद्दिष्ट पूर्ण करावं अशी अपेक्षा आहे. एकविसाव्या शतकाचं पहिलं पाव शतक तर संपलं. आता अर्धशतक गाठेपर्यंत ऊर्जेची समस्या दूर होऊन ती ‘स्वच्छ’ आणि ‘स्वस्त’ झाली तर माणसाने खऱया अर्थाने ‘उजेड’ पाडला असं म्हणता येईल.