
>> डॉ. सुरेंद्र चंद्रकांत हेरकळ, [email protected]
या वर्षीची वारी ही अलौकिक योगाची सांगड आहे. कारण इ.स. 1275 ते इ. स. 1296 असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे 21 वर्षांचे लौकिक आयुष्य आहे. म्हणजे हे वर्ष त्यांचे 750 वे जन्मोत्सवी वर्ष आहे. संत नामदेव महाराज यांचा इ.स. 1270 ते इ.स.1350 हा कालावधी असून संत नामदेव महाराज यांनादेखील विठ्ठलाशी एकरूप झाल्याला 675 वर्षे पूर्ण होत आहेत आणि इ. स. 1608 ते इ. स. 1650 असे जगद्गुरू संत तुकारामांचे लौकिक आयुष्य आहे, या वर्षी संत तुकारामांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला त्यांचे स्मरण करून त्याचप्रमाणे जीवन जगण्याची सुरुवात करण्याचे हे वर्ष आहे.
वारकरी संप्रदायात पाच ‘व’ महत्त्वाचे आहेत. पहिला ‘व’ म्हणजे ‘वाचन’. वाचनामुळे ज्ञानप्राप्ती होते आणि प्रत्येक वारकऱ्याने श्री ज्ञानेश्वरी व हरिपाठाचे नित्य वाचन करणे आवश्यक आहे. दुसरा ’व’ म्हणजे ‘व्रत’. वारकरी संप्रदायात दोन व्रतांना प्राधान्य आहे. एक व्रत म्हणजे तिसरा ‘व’ म्हणजे ’विठ्ठल’, ज्याला विठोबा, पांडुरंग किंवा पंढरीनाथ म्हणूनही ओळखले जाते, हे वारकरी संप्रदायाचे (भागवत धर्माचे) प्रमुख दैवत आहे. चौथा ’व’ म्हणजे ‘वारी’. वारी दोन प्रकारची असते. एक देवाची वारी व दुसरी संतांची वारी. दर महिन्याच्या पहिल्या एकादशीला, शुद्ध एकादशीला पंढरपूरला जाणे आणि देवाचे दर्शन घेणे ही देवाची वारी आणि संतांची वारी म्हणजे दुसऱ्या एकादशीला संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज किंवा कोणत्याही संतांच्या समाधी मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेणे. ही वारी जे करतात त्यांना महिन्याचे वारकरी असे म्हणतात. त्याचबरोबर चैत्र वारी, माघ वारी, कार्तिकी वारी व आषाढी वारी या वर्षातील प्रमुख चार वाऱ्या. यातील महावारी म्हणजे ‘आषाढी वारी’. या वारीची उपासना जो करतो तो वारकरी.
विठ्ठलाला पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरुराव, पांडुरंग, हरी इ. नावे भक्तांनी दिलेली आढळतात. आज प्रचलित नाव म्हणजे ‘पांडुरंग’ आणि ‘श्रीविठ्ठल’. बरेच लोक ‘विठ्ठल’ हा शब्द ‘विष्णू’ या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. कानडी शिलालेखातही जे ‘विठ्ठरस’, ‘विट्ट’ असे शब्द आले आहेत ते ‘विष्णू’ शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत. संत तुकोबारायांनी ‘विठोबा’ शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. ‘वि’ म्हणजे ज्ञान, ‘ठोबा’ म्हणजे आकार – ज्ञानाचा आकार किंवा ज्ञानाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा ‘वि’ म्हणजे गरूड आणि ‘ठोबा’ म्हणजे आसन. अर्थात गरुड ज्याचे आसन आहे तो विष्णू. तोच कटीवर कर ठेवूनी विटेवरी उभा आहे. श्रीकृष्ण, श्रीविष्णू आणि श्रीविठोबा हे एकच आहेत.
‘वारी’ म्हणजे देवाला विशिष्ट दिवशी भेटावयास जाणे. वारीची परंपरा कधीपासून सुरू झाली हे सांगता येत नाही, पण संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील व विठ्ठलपंत कुलकर्णी हेसुद्धा वारकरी होते. ते पंढरीची वारी करीत असत. या वारीचा मूळ पाया हा भक्ती आहे. उपवास, तप, पूजा, आरती हे कर्मकांड करणे म्हणजे भक्ती इतका मर्यादित अर्थ नाही, तर ‘जयांचे माझी नीती दिसे’. संत ज्ञानेश्वर महाराज नीती असल्याशिवाय भक्ती पूर्ण होत नाही असे म्हणतात, तर ‘भक्ती तों कठीण शूळावरील पोळी। निवडे तो बळी विरळा शूर। जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत। पायाविण भिंत तांतडीची, कामावलें तरि पाका ओज घडे। रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे। तुका म्हणे मना पाहिजे अंकुश। नित्य नवा दिस जागृतीचा।’ संत तुकाराम महाराज सांगतात, आपल्या प्रत्येक कृतीवर, विचारावर विवेकाचा अंकुश पाहिजे. वैयक्तिक जीवन जगताना समाजाबरोबर आपण निसर्गाचा घटक आहोत याचे भान असणे खरे भक्तिमय जीवन आहे. अगदी साधं उदाहरण म्हणजे जी व्यक्ती दैनंदिन आयुष्यात पाणी व अन्न जपून वापरते, वाया घालवत नाही ही एक प्रकारची भक्ती आहे. काहीही केले आणि परमेश्वराचे नाव घेतले की, भक्ती झाली आणि परमेश्वरावर आपली जबाबदारी दिली म्हणजे आपला उद्धार होतो हे खरे नाही.
स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील एक प्रसंग आहे ज्या वेळी स्वामीजींना पैसा, नोकरी हवी होती त्या वेळी त्यांना रामकृष्ण परमहंस यांना आपली अडचण सांगितली. रामकृष्ण परमहंस तेव्हा स्वामीजींना म्हणाले की, तुला जे हवे आहे ते तू कालीमातेकडे माग. तुला ते मिळेल. यावर स्वामीजी ज्या वेळी देवीला भेटून परत आले तेव्हा रामकृष्णांनी विचारले, ‘‘काय काय मागितले?’’ त्यावर विवेकानंद म्हणाले, ‘‘ज्या वेळी मी देवीकडे पाहिले तेव्हा माझ्या मनामध्ये या शूद्र इच्छा शिल्लकच राहिल्या नाहीत.’’ इतका त्याग करण्याची ज्याची तयारी आहे त्याला भक्ती म्हणतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत चोखामेळा महाराज, संत सावता महाराज, संत एकनाथ महाराज यांसारख्या अनेक संतांनी परमेश्वराची खरी भक्ती केली आहे. वारीची जशी सगळ्यांना ओढ लागलेली असते तशी भगवंतांनासुद्धा या वारीची ओढ लागलेली असते. श्रीमदभगवद्गीता ही श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली, पण ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ ही जनसामान्यांच्या उद्धारासाठी सांगितलेली आहे. देवांचा जन्म हा व्यक्ती उद्धारासाठी होतो, तर संतांचा जन्म हा जनसामान्यांच्या उद्धारासाठी होतो. म्हणून देवांनासुद्धा संतांच्या सहवासाची व भेटीची ओढ लागलेली असते याची अनेक उदाहरणे आणि दाखले आपल्याला संत चरित्रामध्ये पाहावयास मिळतात. जशी ‘ज्ञानेश्वरी’ जितक्या वेळा वाचू, तितक्या वेळा वेगवेगळ्या प्रकारे भावते, अर्थ लागतो तशीच पंढरीची वारीसुद्धा अनुभवते.
वारीची सुरुवात ज्या दिवशी होते त्या दिवसाला ‘प्रस्थान’ हा शब्द आहे. ‘प्रस्थान’ या शब्दाचा अर्थ निघणे किंवा सुरुवात करणे असा आहे, तर दुसरा अर्थ, ज्या ठिकाणी प्रकर्षाने स्थिर राहिले जाते, त्याला प्रस्थान असे म्हणतात. वारी शिस्त, नम्रता, संयम, भक्ती आणि सेवा या मूल्यांचे संवर्धन करते. वारी हा एक आध्यात्मिक अनुभव आहे. वारीतील शिकवण म्हणजे ईश्वर सर्वत्र आहे, प्रत्येक जीवात परमेश्वर आहे, वारी म्हणजे संत संगतीची अनुभूती. वारीचे फळ म्हणजे मन स्थिर होते, अहंकाराचा नाश होतो, जन्मोजन्मीचा फेरा चुकतो अर्थात मोक्षाची प्राप्ती होते. ही वारी करणारा म्हणजे वारकरी (माऊली).
‘वारकरी’ शब्दात ‘वारी’ म्हणजे यात्रा आणि ‘करी’ म्हणजे कार्य करणारी व्यक्ती, म्हणजे यात्रा करत जाणारे भाविक. वारकरी हा एक प्रकारचा संप्रदाय आहे. या संप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त पुंडलिक समजला जातो. वारीसह संतांची पादुका घेऊन जाण्याची परंपरा संत तुकाराम महाराजांचे सर्वात लहान अपत्य नारायण महाराजांनी 1685 मध्ये सुरू केली होती. वारकरी गळ्यात तुळशीमाळ घालतात आणि त्याच्याने सतत जप करत असतात. कारण ती माळ त्यांना देव पांडुरंगाचे विस्मरण होऊ देत नाही आणि तुळशीमाळ घातली नाही तर वारी पूर्ण होत नाही असे मानले जाते. वारीच्या काळात वारकरी सगळे भेद सोडून, सामाजिक जीवनाला न बघता देवाला परमसत्य समजून त्याच्या भक्तीमध्ये लीन होऊन जातात. त्या देव पांडुरंगाला पुजतात. त्याच्या भक्तीमध्ये गीत, अभंग गातात आणि एकासमोर वाकून नमन करतात. कारण ‘सगळे ब्रह्म आहेत’ असा त्यांच्या विश्वास असतो. ‘एक तरी वारी अनुभवावी’ अशा या वारीचा अनुभव आयुष्यात एकदा तरी घेतला पाहिजे.
(लेखक गोखले एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्यु. अॅण्ड रिसर्च, परळचे प्राचार्य आहेत.)