वाचावे असे काही- मानवी वर्तनाचे रहस्य

>> धीरज कुलकर्णी

मराठीत विज्ञानविषयक लेखनाची चांगली परंपरा आहे. डॉ. जयंत नारळीकर, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर यांनी विज्ञानातील महत्त्वाच्या विषयांवर लिहून साहित्यात मोलाची भर घातली आहे. सध्या इंटरनेटवर बरीचशी माहिती घरबसल्या उपलब्ध होते, तरी त्यातील कोणती माहिती आपल्याला उपयोगी हे सामान्य माणसाला समजत नाही आणि त्याचा गोंधळ उडतो. त्यामुळे एका विषयावर सुसूत्रपणे माहिती असलेलं पुस्तक हाताशी असणे केव्हाही चांगले.

मानवी मेंदू आणि मानवाचे वर्तन हा जगभरातील शास्त्रज्ञांचा अनेक वर्षांपासून अभ्यासाचा विषय. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मेंदूची अनेक रहस्ये आपल्याला उलगडली आहेत. मेंदूचे रचनाशास्त्र, त्यातील वाहणारे केमिकल्स, हॉर्मोन्स आणि माणसाचे वर्तन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करणारे नवीन पुस्तक आहे, ‘माणूस असा का वागतो?’ अंजली चिपलकट्टी यांनी गेल्या काही वर्षांच्या अथक मेहनतीने हे शिवधनुष्य पेलले आहे.

मानवी मेंदू हा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक. सभोवताली असलेल्या विश्वाचे ज्ञान करून घेण्यासाठी पंचेंद्रिये आणि मेंदू आयुष्यभर काम करत राहतात. हे कुतूहल शमवत असतानाच त्याचे परस्परांशी असलेले गुंतागुंतीचे संबंध हेही महत्त्वाचे असतात. माणसाला असलेल्या प्रेम, द्वेष, ाढाsध आदी भावनांचा उगम काय? मेंदूचा कोणता भाग कोणती भावना नियंत्रित करतो, कोणती रसायने त्यास सहाय्यकारी होतात, या रसायनांचे संतुलन बिघडले तर काय परिणाम होतात, ही सर्व रोचक माहिती आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. मानवी उपांतीमध्ये मेंदूला मोठे स्थान आहे. गेल्या कित्येक हजार वर्षांत मानवाची जी प्रगती झाली, ती मेंदू अधिक प्रगत झाल्यानेच. इतर प्राणी आणि माणूसप्राणी यांच्यात असणारा हा मोठा फरक. हा फरक का आहे हे येथे आपल्याला समजते.

नैतिकता, आध्यात्मिकता, साहित्य, कला, ाढाrडा असे मानवी वर्तनाचे अनेक पैलू आहेत. उपांतीशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, जेनेटिक्स अशा विविध ज्ञान शाखा या मानवी वर्तनाचा अभ्यास करतात. प्रेम, सौहार्द, परोपकार इत्यादी गुण सद्गुण कधी ठरले? हिंसा, ाढाwर्य, द्वेष, मत्सर हे दुर्गुण कधी ठरले? मानवी वसाहती अधिकाधिक एकमेकांशी बांधल्या जाऊ लागल्या, तेव्हा मानवाने स्वतमध्ये अनेक बदल केले.

मानवाची प्रगती होत असताना ती कधीही एकात्मिक होत नाही, तर समूहानेच होते हे मानवाच्या लक्षात आल्यानंतर मानवाने नियम प्रणाली विकसित केली. समूहाच्या दृष्टिकोनातून तसेच एकात्मिक दृष्टिकोनातून या वर्तनाचा अभ्यास आणि त्याचा इतिहास फार रंजक आहे. या पुस्तकात आपल्याला काही विभागांमध्ये मानवी वर्तनाची ओळख होते. बरेवाईट निर्णय घेण्याची क्षमता, एखाद्या गोष्टीबद्दल मत पक्के करणे, त्याबाबतीत सर्वसहमती घेणे, अस्तित्वाबद्दल माणसाच्या कल्पना, संस्कृती, प्रेम, लैंगिक वर्तन, नीतिमत्ता, धर्म, कर्मकांड, आध्यात्मिकता, ताणतणाव, नैराश्य अशा अनेक आयामांतून आपल्याला मानवी वर्तनाचे रहस्य उलगडते. याच बरोबरीने यापुढे वर्तनाचा टप्पा कोणता असेल याचाही लेखिका गांभीर्याने विचार करते.

वेगवेगळ्या संशोधनांतून जी माहिती आपल्या समोर आली आहे, ती सर्वांसमोर मांडण्यासाठी लेखिकेने भरपूर मेहनत घेतली आहे. मराठीत असे प्रयोग कमी झालेले असले तरी लक्षणीय आहेत नक्की. हिंदुस्थानसारख्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे तसे आव्हानात्मक काम आहे.

कर्मकांड, परंपरा, अनिष्ट प्रथा यांमध्ये आजही बराच मोठा समाज गुरफटलेला आहे. मंत्रतंत्र, बुवाबाजी यांचे अक्षरश पेव फुटलेले दिसते. आजही अंधश्रद्धेपायी अघोरी कृत्य करीत बळी देण्याच्या, चेटुक केल्याच्या बातम्या आपण वाचतो. हे सर्व थांबवण्यासाठी समाजात विज्ञान शिक्षणाचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे आणि ते फक्त शालेय स्तरावर न होता अशा पुस्तकांमधून सामाजिक स्तरावरही झाले पाहिजे.

2021 साली लेखमाला स्वरूपात प्रकाशित झालेले हे लेख संपादित करून पुस्तक रूपाने आणण्याचे कसब राजहंस प्रकाशनाच्या डॉ. सदानंद बोरसे यांचे. चंद्रमोहन कुलकर्णी यांचे प्रश्नचिन्हांकित मुखपृष्ठ पुस्तकाला साजेसे आहे. नेमक्या शब्दांत आणि आटोपशीर आकारात हे पुस्तक अधिक वाचनीय होते. आपल्या विचारांची दिशा पुढील जगण्यात अधिक वैज्ञानिक, अधिक सजग करण्यासाठी अशी पुस्तके आवश्यक आहेत.